मंगलवार, 15 सितंबर 2020

रांगेत या रांगेत...

*रांगेत  या......रांगेत..!!* 
====================
                  अनिकेतला म्हणजेचं मोठया भावाच्या मुलाला घेऊन उस्मानाबादला ‘जिल्हा रूग्णालयात‘ गेलो होतो. साथीचे आजार वाढल्यामुळे रूग्णालयात येणा-यांची संख्या नेहमीपेक्षा जरा जास्तचं दिसत होती. आठवडी बाजार किंवा यात्रा, जत्रा भरल्यासारखी तोबा गर्दी! जिकडं बघावं तिकडं माणसचं. लहान मुले, तरूण, महिला व जेष्ठ नागरिक असे सगळेचं रूग्ण उपचारासाठी आले होते. डाॅक्टरांच्या समोर ही भली मोठी रांग. त्यातून पाठीमागच्यांना डाॅक्टर ही दिसत नव्हते. त्यात ही पुन्हा विभागणी महिलांची व पुरूषांची वेगळी तपासणी रूम. तीला वैदकिय भाषेत ‘ओ.पी.डी‘ म्हणतात. इतर अनेक तज्ञ विभाग. पण एखादयाचं तज्ञ विभागात ‘डाॅक्टर‘ हजर. कान,नाक,घसा तज्ञांच्या बाहेर आठ-दहा रूग्ण उभे. मात्र डाॅक्टर राऊंडला गेल्याचे ‘सरकारी उत्तर‘ तयार.....
          प्रत्येक ठिकाणी ‘रांगेत या'...असं माणसं ऐकमेकांना सांगत होती. रांगे शिवाय दुसरं कायचं दिसत नव्हतं. बहुतेक सगळया विभागात रांगचं...रांग...ती हि लांबलचक..!! शेवटी प्रत्येक रूग्णाला रांगे शिवाय पर्याय नव्हता. रांग नि लोक असचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र रांगेत जेष्ठ नागरिकांचे हाल व्हायचे. म्हणून अबालवृध्द माणसं समोरच्याला ‘इंथ माझा नंबर आहे.' असं सांगून मिळेल त्या बाकडावर गर्दी करत होते. लहान मुलं रांगेत थांबून वैतागली होती. रांगेमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
     शेवटी पुतण्याचा नंबर आला. डाॅक्टरांनी तापसलं. औषधे लिहून दिली. काय-काय पथ्य पाळा. हे एका मिनीटात सांगून मोकळं केलं. रांग मोठी असल्यानं डाॅक्टर ही रूग्णांचे ऐकून औषधे लिहून देत होते. हल्ली सरकारी डाॅक्टर फक्त लिहूनचं देत असतात. या ऐकलेल्या वाक्याचा मीच साक्षीदार ठरलो होतो. रांगेतून सुटलो या आवेशात मी औषधे मिळण्याच्या ‘काऊंटर‘वर आलो.....तर तिथे ही पुन्हा भली मोठी रांगचं! आता मात्र चक्रावलो. या रांगेतून सुटका नाही. अशी मनाची तयारी केली. नि रांगेच्या शेवटी जाऊन थांबलो. सोबत लहान पुतण्या ही रांगेतचं!
             औषधे मिळण्याच्या काऊंटर पासून रूग्णालयाच्या आवारा प्रर्यंत रांगने जागा घेतलेली. रांगेतली माणसं केव्हा मोकळा होतोय. याचाचं विचार करीत होती. औषधे घेण्यासाठी येणारा प्रत्येक रूग्ण ‘रांग‘ पाहून पुन्हा आजारी पडल्यासारखा चेहरा करत होते. रांग मात्र वाढतचं चालली होती. मी विचार करीत होतो कि, रांग मागूनचं  वाढतेय. पण पुढून कमी का होत नाहीय? तेव्हा लक्षात आलं. की रांगेतही ‘वशिलेबाजी‘ सुरू होती. येणारा माणूस ‘रांग‘ पाहून आपल्या ओळखीचा माणूस शोधायचा व त्याच्या जवळ औषधे घेण्याची चिठ्ठी देत होता. ओळखीचा माणूस ही अशावेळी धावून येत होता. नि चिठ्ठी घेऊन समोरच्याला दिलासा देत होता....
                येणारा रूग्ण रांगेत कुणी आपला ओळखीचा. कुणी नातेवाईक. कुणी मित्र. कुणी पाव्हणा. कुणी गाववाला. तर कुणी इतर माणूस शोधत होते. त्यामुळे रांगेच्या मध्य भागात असणा-या प्रत्येकाकडे किमान तीन-चार चिठ्ठया गोळा झाल्या होत्या. म्हणूनचं पुढची रांग सरकतचं नव्हती. आणि मागची लांबचं लांब होत होती. हा सगळा प्रकार मी जवळून बघितला. नि गर्दीतल्या काही माणसांना सांगितला. हे ऐकून एक वयोवृध्द आजोबा पुढे आले. त्यांनी मधूनचं वशिला लावणा-यांना मागे लावले. तिथे येणा-या प्रत्येकांना आजोबा सांगत होते. ‘रांगेत या...रांगेत...!! पण आजोबांची ‘नजर‘ चुकवून काही ‘महाभाग‘ रांगेत मध्येचं ‘वशिला‘ लावून घुसत होते. तर काही लोक ‘इमाने इतबारे‘ ओळख काढून चिठ्ठी हातात देत होते. हि ‘वशिलेबाजी‘ थांबल्या शिवाय आपला ‘नंबर‘ लागणार नाही. याची ‘जाणीव‘ झाल्याने मी हि पुढे झालो. आजोबांच्या संगतीनं सगळयांना सांगत होतो कि, ‘रांगेत या...रांगेत...!! 
पण समाज कुठेही ‘पळवाटा‘ शोधत असतो. अशीच पळवाट रूग्णालयाच्या रांगेतही लोकांना सापडली होती. त्यामुळे ‘रांगेत या...रांगेत‘ या आजोबांच्या विनंतीला कुणीही दाद देत नव्हतं. शेवटी औषधे देणा-या कर्मचा-यांकडे मी वळालो. तर तो औषधे देण्यात गुंग झाला होता. प्रत्येक रूग्णाची चिठ्ठी वाचून पेनाने राईट नि गोल करत होता. राईट केलेली औषधे दिल्याचे सांगत होता. सोबतचं ‘गोल‘ केलेली औषधे ‘बाहेरून‘ घ्या म्हणत होता. हल्ली सगळीचं औषधे रूग्णालयात उपलब्ध नसतात. पाच पैकी किमान तीन तरी बाहेरूनचं घ्यावी लागतात.  त्यांच्या समोर जाऊन खिडकीतूनचं नमस्कार केला. नि त्यांना सांगितलं की रांग फारचं वाढली आहे. रूग्णालयाच्या आवारात पोहचली आहे. पुढं वशिलेबाजी सुरू आहे. मागचा मागेचं राहतोय. तेव्हा माझी विनंती आहे कि, रांगेत येणा-यानांच औषधे द्या. माझ्या बोलण्यावर ते संतापले. आणि मलाच म्हणाले की, ‘वशिलेबाजी सुरू आहे. त्याला मी काय करू? तुम्ही मला का सांगताय? लोकांनाचं रांगेनं यायचं कळत नाही का? आता मी औषधे देऊ? का रांग लावीत बसू? तुम्हाला काय जातंय सांगायला? इंथ रोजचं असं होतंय......‘त्या‘ सरकारी कर्मचा-याचं ते ‘रोखठोक‘ उत्तर ऐकून ‘रांगेत या..रांगेत..‘ असं सांगणारे आजोबांही ‘निराश‘ झाले. शेवटी तो तरी काय करणार? कारण तो ‘सरकारी कर्मचारी‘ आहे. त्यानं तसचं उत्तर देणं अपेक्षित आहे. त्याशिवाय तो ‘सरकारी माणूस‘ तरी कसा वाटणार. बहुतेक सरकारी कर्मचा-यांकडे कमी-जास्त प्रमाणात असाच ‘रूबाब‘ बघायला मिळतो. अर्थात याला अपवाद नाहीत असं नाही. पण त्यांची संख्या कमी आहे. हे मात्र सत्य आहे. 
                 खरं तर औषधांच्या ‘त्या‘ रांगेची काळजी घ्यायला तिथं एक ‘सुरक्षारक्षक‘ असायला हवा होता. पण सगळे सुरक्षारक्षक नको ‘त्या‘ ठिकाणी दिसले. आवारात गाडया नीट लावा, हे सांगण्यासाठी किमान पाच सुरक्षारक्षक बसले होते. पण रांग नीट लावा हे सांगण्यासाठी कुणीही सुरक्षारक्षक उपलब्ध नव्हता. औषधाच्या या रांगेजवळचं एक छोटीसी काचेची केबीन होती. त्यावर ‘ठळक‘ अक्षरात लिहिलं होतं कि, ‘मे आय हेल्प यू‘ याचा अर्थ ‘सर्वसामान्यांना‘ कळावा म्हणून मराठीत ‘बोल्ड‘ करून लिहिलं होत....‘आपणांस मदत हवी आहे का?‘ मी आशेनं ‘त्या‘ केबीनकडे बघितलं तर...आत मध्ये कुणीचं नव्हतं. कुणाकडे मदत मागणार. परंतु ‘त्याचं‘ केबीन समोर काही माणसं कुणी तरी येईल याची वाट पाहत उभी राहिलेली दिसली. 
                 तसं बघायला गेलं तर रांगेच आणि सर्वसामान्य माणसाचं जुनचं नातं आहे. नि त्या नात्यानं किमान शतकाची तरी वाटचाल केली आहे. रांग नि माणूस या समीकरणानं अनेक क्षेत्र व्यापली आहेत. ‘रेशन‘च्या दुकानात रांग. ‘राॅकेेल‘च्या वाटपात रांग. ‘राजीव गांधी‘ योजनेच्या पगाराची रांग. ‘रमाई आवास‘ योजनेच्या लाभासाठी रांग. ‘कर्जमाफी‘चे अर्ज भरण्यासाठी रांग. ‘विमा‘ भरण्यासाठी रांग. ‘स्कूल चले हम‘ म्हणणा-या पोरांच्या खिचडीची रांग. ‘शिष्यवृत्ती‘च्या चेक वाटपाची रांग. ‘वसतीगृह‘ प्रवेशासाठी रांग. ‘इंग्लिश मिडियम‘च्या प्रवेशाला रांग. ‘विद्यापीठा‘त प्रवेशाची रांग. ‘हागणदारी मुक्ती‘च्या योजनेचा चेक घेण्यासाठी ग्रामपंचायत बाहेर रांग. ‘पेन्शन‘ धारकांची रांग. ‘जात प्रमाणपत्र‘ काढण्यासाठी तहसील बाहेर रांग. ‘मोफत शिक्षणा‘ची पाठयपुस्तके मिळवण्यासाठी शाळेत रांग. ‘शिक्षकांच्या बदल्या‘साठी नेट कॅफे बाहेर रांग. ‘मनेरगा‘चा पगार घेण्यासाठी रांग. मध्यतंरी ‘नोटाबंदी‘ नंतर तर ‘रांग‘ फारचं चर्चेत आली होती. एटीएम बाहेर रांग. बॅकेत रांग. रात्र-रात्र रांग. आणि या रांगेनं काही ‘बळी‘ही घेतले. तेव्हा एक राष्ट्रीय नेते असं म्हणाले होते कि, रेशनच्या रांगेत ही लोक मरतातचं की! आणि या रांगेनचं ‘देशभक्ति‘ची नवी व्याख्या जन्माला घातली. रांगेत निमूटपणे उभे राहणारे ‘खरे देशभक्त‘ आणि रांग आहे म्हणून संताप व्यक्त करणारे ‘देशद्रोही‘ असं म्हटलं जातं होतं. तर अशी ‘भयानक‘ आहे रांग. कारण ती कधी काय जन्माला घालेल हे सांगता येत नाही. रांगेतूनचं राग, संताप, चिडचिड, निराशा जन्माला येते. झालचं तर रांगचं ‘व्यवस्था विरोध‘ वाढवते. रांगचं माध्यमांना ‘ब्रेकिंग न्युज‘ देते. मागे पैठणच्या एका शेतक-यांचा मृत्यु ‘सोयाबीन‘ नोंदविण्याच्या रांगेत झाला. नि त्यातून आरोपांचं ‘राजकारण‘ सुरू झालं. पुन्हा बातम्या...पुन्हा ब्रेकिंग न्युज....पुन्हा स्पेशल रिपोर्ट...पुन्हा ग्राऊंड रिपोर्ट...पुन्हा तेचं ते...
 पण ‘सरकार कुणाचंही‘ किंवा ‘कोणतंही‘ असो रांगेचे प्रश्न तेचं. रांगेची अवस्था तशीचं. रांगेचा संताप तोच. अक्रोश तोच....म्हणूनचं रांगेतूनचं योजना पुढे येतात. रांगेतून राजकारण जन्माला येत. रांगेतून घोषणा येतात. 90 च्या दशकातही रांगेतूनचं ‘गरीबी हटाव‘ घोषणा पुढे आली. लोकांनी भरपूर ‘मतं‘ दिली. पुन्हा रांग तशीचं. 2014 पुन्हा ‘गरीबी हटाव‘ ला आधुनिक नावं मिळालं ‘अच्छे दिन‘ पुन्हा त्यानांही भरपूर ‘मतं‘ मिळाली. पुन्हा रांग तशीचं. रांग अशीचं आहे. तीचा अंदाज बांधता येत नाही. तीला संपविता येत नाही. किंवा म्हटलं तर तीचा वेध ही घेता येत नाही. सारं काही अनाकलनीय...
       ...तर मी सांगत होतो औषधांच्या रांगेचं. त्या आजोबांचा नि त्याच्याचं मागे माझा नंबर येईपर्यंत तब्बल 2 तास गेले होते. शेवटी मला नि आजोबांना औषधे मिळाली. आम्हा दोघांच्याही चिठ्ठीवर दोन-दोन औषधे मिळाली. बाकीचे तीन ‘गोल‘ करून ठेवली होती. ‘गोल‘ केलेली बाहेरून घ्या. असं सांगून ‘सरकारी‘ कर्मचारी मोकळा झाला. आम्ही औषधांचं ‘काऊंटर‘ सोडलं. माझ्याकडे दुचाकी गाडी होती. म्हणून आजोबांना म्हटलं कुठं सोडू? ते म्हणाले एस.टी. स्टॅन्डला सोडा. मी त्याना गाडीवर बसविलं आणि निघालो... आजोबा म्हणाले एस.टी.नं गावाकडं जाण परवडतं. अर्धे तिकीट हाय. घरी जातो नि पोराला चिठ्ठी देतो. राहिलेली औषधे एैतवारच्या बाजारला आला की पोरगा आणिलं. लै येळ झाला बघ. लोकं कशी वागतात बघ की....आजोबांना बस स्टॅन्डवर सोडून घरी आलो. केस कापण्यासाठी गावातल्या दुकानात गेलो. तर तिथेही रांग. केस कापणारा म्हणाला...'सहा नंबर आहेत पुढं'.... निमूटपणे 'होय' म्हणून बसलो. शेवटी रांग काय पिछा सोडायला तयार नाही. असं समजून म्हणातल्या मनात हसलो....    
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
                                        
©️ *धनंजय मोहन झोंबाडे.*
📝📝📝📝📝📝📝📝

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें