मंगलवार, 15 सितंबर 2020

मरीआईच्या नावानं चांगभलं...

मरीआईच्या नावानं चांगभलं...!!




 आव्वाज कुणाचा टिजे कॉलेजचा....हिप..हिप..हुर्रे..तरी पण..टिजे..टिजे..टिजे..मरीआईच्या नावानं चांगभलं...मरीआईच्या नावनं चांगभलं...असा जल्लोष पुन्हा एकदा 'भरत नाट्यगृहा'च्या प्रांगणात ऐकायला मिळाला. टाळया, शिट्टया, घोषणा, चेअरपने परिसर दणाणून गेला होता. आणि निमित्त होतं...टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविदयालय प्रस्तुत एकांकिका 'मरीआईचा गाडा' होय.
             'पुरूषोत्तम करंडक' म्हटलं की, जल्लोष, घोषणा, आनंद, उत्साह या गोष्टी परंपरेने आलेल्या आहेत. टिकाराम जगन्नाथ कॉलेज 2007 पासून 'एकांकिका' स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. त्याची ही एक अजब कहानी आहे. 2004 ते 2006 या काळात महाविदयालयात शिकत असणा—या हितेश दिवाडकर, सुनील जावीर, भरत बगाडे अशा 'अभिनयप्रेमी' पोरांना पथनाटय, एकांकिका, एकपात्री व नाटक बघून त्याविषयी आवड निर्माण झाली होती. इतर महाविदयालयां प्रमाणे आपण ही त्यामध्ये सहभागी व्हावे असं त्यांना वाटत होते. त्याच भावनेतून या सगळया समविचारी पोरांनी 2006 ला हितेश दिवाडकर व सुनिल जावीर लिखित 'स्त्रीभ्रृणहत्या' हे सामाजिक विसंगतीवर भाष्य करणारे एक 'पथनाटय' सादर केले. त्या पथनाटयाला भरपूर प्रसिध्दी मिळाली. सोबत 'पारितोषिक' सुध्दा मिळाले. हिचं घटना महाविदयालयात अभिनय कला रूजविण्यास कारणीभूत ठरली. त्या अगोदर ही महाविदयालयात अभिनयप्रेमी मुलं होती. पण हा 'सांघिक' प्रयत्न होता. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. पुढे 2007 मध्ये बळीराजाचं जीवन अधोरेखित करणारी सुनील जावीर लिखित 'बळी' हि एकांकिका प्रथम 'सकाळ करंडक' मध्ये सादर करण्यात आली. त्यानंतर याचं प्रश्नावर सुनील जावीरने 'प्रश्न' हि एकांकिका लिहिली नि ती सुध्दा पुन्हा 'सकाळा करंडक'लाचं सादर झाली. या संघात हितेश दिवाडकर, सुनील जावीर, भरत बगाडे, प्रिया चव्हाण, निलेश कांबळे, सत्यवान पवार, कृष्णा घाडगे अशी तगडी पोर होती. 2008 मध्ये हरहुन्नरी कलाकार आणि लेखक असणारा अशिष टिळक या 'मंडळात' सहभागी झाला. पुढे प्रशांत दरोडे, सागर जावळे, तुषार निघोजकर, क्षितीजा सावंत, अफरीन पठाण, संदीप आठवले, अमोल कांबळे, रोहित ढेरे, अश्विनी पाटोळे, विशाखा कांबळे, आनंद शिंदे, मयुर गजरमल, स्वप्निल, मंगेश कांबळे अशी अनेक कलागुणांनी परिपूर्ण असणारी मंडळी एकत्र येत गेली. त्यातचं 2009 ला 'तंत्रज्ञाना'ची जाण असणारा राहूल झेंडे आमच्याशी जोडला गेला. 2009 ते 2012 या काळात त्याचं 'उत्साहाने' एकांकिका सादर झाल्या. बळी, प्रश्न, अॅंटेन्शन प्लीज, आम्ही एकांकिका करणार, शाहा—या, आॅफ पिरीयड, भेळ हि नावे असलेल्या आणि विविध समस्यांवर प्रकाश टाकणा—या 'एकांकिका' सादर झाल्या होत्या. पण 2012 नंतर मात्र काही कारणाने या एकांकिकेच्या गाडीला 'ब्रेक' लागला. त्यानंतर तब्बल 5 वर्षानंतर 'मरीआईचा गाडा' मोठया जल्लोषात सादर झाली. एकूणचं काय तर 'बळी ते मरीआईचा गाडा' हि एक संघर्षगाथाचं आहे. असं म्हणायला काहीचं हरकत नाही...!
                     19 आँँगस्टला सायंकाळी झालेला 'मरीआईचा गाडा' हा प्रयोग किती तरी आठवणी आणि प्रसंगांना उजाळा देणारा ठरला. पुन्हा एकदा 'टि.जे'च्या स्पिरीटची चर्चा झाली. यावेळी मात्र वातावरण खूपचं 'सकारात्मक' होतं. एकांकिकेचा विषय नेहमी प्रमाणेचं 'सामाजिक' होता. अण्णा भाऊ साठेंच्या कथेवरील हि एकांकिका 'विज्ञानवादा'चा पुरस्कार करणारी ठरली. गावगाडयातल्या व्यवस्थेवर भाष्य करणा—या या 'प्रयोगा'ने सर्वांचीचं मने जिंकली. वाहवा झाली. चर्चा झाली. त्यामुळे 'टिम टिजे'चा आनंद व्दिगुणित झाला आहे. या आनंदात अशिष टिळक, हितेश दिवाडकर, भरत बगाडे, प्रशांत दरोडे, राहूल झेंडे, संदीप आठवले, सागर जावळे, स्वप्निल, विनय, अमोल कांबळे, प्रेम सोनवणे यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते. 
               एकांकिका संपल्या नंतर बाहेर खूपचं सकारात्मक चर्चा ऐकायला मिळाली. रास्ते सर व इतर सर्व जण खूप कौतुक करत होते. या निमित्ताने एका गोष्टीची नोंद घ्यावी लागेल की, पहिल्यादाचं संस्थेचे सर्व पदधिकारी 'प्रयोगाला' हजर झाले होते. त्यामध्ये खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष विलास पंगुडवाले, चिटणीस आनंद छाजेड, प्राचार्य अरूण मोकाशी सर,यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. सोबतचं सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.महादेव रोकडे सर, प्रा.गौरी माटेकर, डॉ.वीना मनचंदा, प्रा.रूपाली अवचरे ही हजर होते. 
      संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांना सांस्कृतिक क्षेत्राची जाण आहे. ते स्वता: अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष आहेत. प्रयोग पाहून त्यांना खूप समाधान वाटलं. त्यांनी आनंदाने सर्व कलाकारांना आपुलकीने चर्चा केली. सगळयांना चहापाणी केलं. आणि किमान एकदा तरी 'पुरूषोत्तम करंडक' आपला झाला पाहिजे हि इच्छा बोलून दाखविली. त्यातून कलाकारांचा हुरूप प्रचंड वाढल्याचे जाणवले. 
        आता थोडसं एकांकिके बद्दल...'मरीआईचा गाडा' हि अण्णा भाऊ साठेंची मुळकथा. ती साधारणता:ह 1956 ला लिहिली गेली आहे. अंधश्रध्देवर प्रहार करणारी हि कथा 'नाना' या धडपडया तरूणाला नायक म्हणून समोर आणते. या मुळ कथेचा विषय न सोडता आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात 'मरीआईचा गाडा' हि एकांकिका साकारली गेली आहे. आजच्या पिढीच्या संवादाची भाषा त्यामध्ये वापरण्यात आली आहे. विशेष करून 'चिंतनशील' प्रश्न या संवादाने उभे केले आहेत. 'सदा' जेव्हा 'नाना'ला म्हणतो की, 'आरं असं काय बी केलं की हि लोक एैकत नाहीत. तुला येडयात काढतील. तुला भांडतील. नाही तर...तुला गोळया घालतील' तेव्हा सारं सभागृह आवक् होवून पाहात राहतं. वर्तमान काळात विवेकांवर होणारे हिंसक हल्ले अगदी मोजक्या शब्दात पण तितक्याचं ताकदीने संवादाच्या रूपाने मांडण्यात 'संवाद लेखक' यशस्वी झाला आहे. विज्ञानाचा प्रसार आणि प्रचार आजची भाषा वापरून करावा लागेल याचा विचार करून संवाद लिहिताना कथेत नसलेले 'सदा' हे पात्र जोडण्यात आले आहे. प्रभावी संवाद, गरज तेथे गंभीरपणा, हजरजबाबी विनोद अशा आशयप्रधान संवाद लेखनामुळे 'संवाद लेखक' ऋतिक रास्ते याचं करावं तेवढं कौतुक कमीचं आहे. संवाद लेखना बरोबरचं त्याने स्वता: 'सदा'ची भूमिका अधिक प्रभावीपणे साकारली आहे. हे विशेष आहे. 
           आजच्या काळात अंधश्रध्देच्या अनेक घटना ऐकायला नि पाहायला मिळत आहेत. विवेकवादाचे बळी घेतले जात आहेत. धार्मिक लढाया लढल्या जात आहेत. सोशल माध्यमांचा एक वापर अंधश्रध्देच्या प्रसारासाठी वापरला जात आहे. तर दुसरीकडे दहशतवाद, सोशल मिडीया, शेतकरी, मोर्चा, आंदोलने, पर्यावरण या विषयांवर मोठया प्रमाणावर एकांकिका सादर केल्या जात आहेत. अशा कठीण काळात विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी निवडलेली 'मरीआईचा गाडा' हि एकांकिका फारचं महत्वपूर्ण आहे. वर्तमान काळात त्याचीच आवश्यकता आहे. त्यामुळे हि एकांकिका सादर करणं तसं जिकीरीचं काम आहे. पण संघप्रमुख रोहित माने आणि त्याच्या टिमने ती हिंमत दाखवली. म्हणून त्याचं कौतुक करावंचं लागेलं.  वास्तववादी एकांकिकेला अस्सलता प्राप्त करून देण्यात दिग्दर्शक म्हणून रोहित माने यशस्वी झाला आहे. या टिममधल्या प्रत्येकाचं हे यश आहे. प्रत्येकाचं काम आणि भूमिका अत्यंत मोलाची आहे. सटवू नाना—संतोष मोरे, केरू तात्या—ऋषिकेश पारखी, म्हादबा—आशुतोष मोहिते, भाऊ बाबाजी—अक्षय बहिरट, नाना—रोहित माने, सदा—ऋतिक रास्ते, शांतक्का—अपर्णा बहिरट, म्हातारी—श्वेता गायकवाड, घाबरट बाई—मिताली कळमकर, गावकरी—अक्षद पाईवाल, गावकरी—अजिंक्य मारटकर, डॉक्टर—रशीद शेख, हलगी वादक—अनिकेत राक्षे यांच्या सोबतचं प्रकाश योजना—अनुराग दुबळे आणि संगीत—रेणुका मदने अशा सगळयांची 'भूमिका' प्रयोगाच्या यशस्वीतेला कारणीभूत ठरली आहे. 
                  हे यश सगळया कलाकाराचं जसं आहे अगदी तसचं हि एकांकिका सादर करताना कशी करायची याची 'विना मोबदला' तब्बल 29 दिवस दिवस—रात्र राबणा—या अशिष टिळक नावाच्या आवलियाचं सुध्दा आहे. सोबतचं अशिषला मदत करणा—या हितेश दिवाडकर, राहुल झेंडे आणि हरहुन्नरी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.महादेव रोकडे व इतर काही सहका—याचं ही योगदान नाकारता येत नाही.
               प्रयोग चांगला झाला नि आम्ही रात्री महाविदयालयात पोहचलो. सर्व कलाकार नि आम्ही म्हणजे हितेश, अशिष, संदीप, प्रशांत आणि राहूल होतो. कलाकारांनी प्रामाणिकपणे आपले अनुभव सांगितले. चुका मान्य केल्या. प्रत्यक्ष आत गेल्यावर काय वाटते. हे ही नमूद केले. उपस्थितांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. रात्री 11.35 ला आम्ही निघालो. पण माझ्या डोक्यात वारंवार 'सदा' नि 'नाना' हि पात्र येत होती. असे युवक गावोगावी व्हावेत असेही वाटत होते. 'सदा'ने सांगितले की, 'मी आयुष्यात पहिल्यादा मेकअप केला होता' बापरे किती मोठं स्पिरीट...हा विचार करत असतानाचं त्यानं दुसरं वाक्य फेकलं..'मी काही वेळ ब्ल्यान्ग झालो होतो' तेवढयात कुणी तरी सांगितलं 'आमची खाली भांडणं झाली होती', 'मी अपोआप थरथर कापत होतो', 'आमचं लाईटर बंद पडला होता', 'हयाने गाडग्याची दोरीचं जाळली होती त्यामुळे ते गाडगं धरल्यावर हात खूपचं गरम झाला होता', 'हा जातचं नव्हता मग मी हयाला जोरात लाथ मारली', 'हा हालगीचं वाजवत नव्हता', 'माझ्या टाळाचाचं आवाज जास्त येत होता', 'मी माझा डायलॉगचं विसरलो होतो', 'मरीआईच्या ठिकाणी मी मरीआळीचं बोलले', 'हे सगळेचं निघून गेले मग मी ही मरीआईचं दर्शन घेवून विंगेत पळाले' अशी वाक्य सतत आठवत राहिलो. कधी काळी आमचं ही असचं व्हायचं. आमचा उत्साह, आनंद, जोश, अनुभव, भांडणं याच प्रकारची असायची याची ही आठवण झाली...!! 
               .... तर मी सांगत होतो की, आम्ही घरी निघालो प्रशांत मला बोपोडी पर्यत सोबत होता. 'तो म्हणाला तुला काय वाटतंय? आपण टॉप नाईन ला असू का?' यावर मी प्रशांत प्रतिप्रश्न केला 'तुला काय वाटतंय? यावर तो विचारात पडला. पण मी माझं उत्तर देवून मोकळा झालो की, 'हे बघ प्रशांत संघप्रमुख या नात्याने मी किमान 160 एकांकिका बघितल्या आहेत. तर मला असं वाटतं की, यावेळी आपण 100 टक्के टॉप नाईनला असू. माझ्या उत्तरावर प्रशांत हसला नि पुढे निघून गेला. दुस—या दिवशी रोकडे सरांना हाच आत्मविश्वास 'फेसबुक'वर देवून बसलोय. कारण मी फार 'सकारात्मक' आहे. कदाचित प्रा.महादेव रोकडे सरांच्या 'डोन्ट वेरी बी पॉझिटिव्ह' या वाक्याचा माझ्यावर फारचं परिणाम महाविदयालयीन काळात झाला आहे. 
          कुणाला काहीही वाटत असो. सर्वानाचं मतं असतात. प्रत्येकाला थोडी फार तरी जाण असते. या न्यायाने मी या एकांकिकेकडे पाहातो आहे. त्यामुळे मला केवळ आत्मविश्वासचं नाही तर खात्री सुध्दा आहे की, या वर्षीच्या 'टॉप नाईन' आपली 'मरीआईचा गाडा' हि एकांकिका असणार आहे. हे सारं लिहित असताना संदीप आठवलेंचं वाक्य ही आठवत आहे की, 'आँँफ पिरीयड'च्या वेळेस सुध्दा आपली अशीचं चर्चा झाली होती. पण आपण 11 व्या क्रमांकावर राहिलो होतो. 
        प्रयोगा नंतर प्रत्येक जण आपली मतं नोंदवित आहेत. कुणी चांगलं तर कुणी वाईट म्हणत आहे. बाहेरची ही मंडळी उत्साहाने प्रतिक्रिया नोंदवित आहेत. पण मी वेगळया दृष्टिने या एकांकिकेकडे पाहतो आहे. उपनगराच्या मुलांनी वर्तमानाला उत्तर देण्यासाठी असा विषय निवडणं. परिणामकारक मांडणं. टिमवर्क दाखविणं हे माझ्यासाठी फार मोलाचं आहे. खरं तर हि एकांकिका लिहिणारे, करणारे युवक—युवती पंचविशीच्या आतबाहेरचे आहेत. पण त्यांनी नाटय माध्यमाची प्रकट केलेली जाण आणि विषयाला भिडण्याची त्यांची सचोटी चकीत करणारी होती. या युवा कलाकरांनी आपापल्या व्यक्तिरेखांचे घेतलेले टायमिंग, साधलेला संवाद, वाचिक आणि शारिरीक अभिनयतून दाखविलेल्या छोटया—मोठया जागांना निश्चितचं सलाम करावा लागेल...!
            येत्या 28 तारखेला प्राथमिक फेरी संपणार आहे. आणि त्याचं दिवशी रात्री 9.30 ला 'टॉप नाईन' एकांकिकाचा निकाला 'संगणकाद्वारे प्रसिध्द होणार आहे. त्यामध्ये 'मरीआईचा गाडा' हि एकांकिका असणार आहे. याची खात्री मला आहे. 'टॉप नाईन' मध्ये आल्यास आम्ही तुला 'खास पार्टी' देणार असे प्रा.महादेव रोकडे आणि प्रशांत दरोडे म्हणाले आहेत. तेव्हा त्या दोघांनी पार्टीची तयारी करावी असं त्यांना सांगावसं वाटतं आहे. म्हणून लागा तयारीला. शेवटी 'आव्वाज कुणाचा...टिजे कॉलेजचा'...!!

  सर्व कलाकारांना उद्देशून इतकचं की,

'रख हौसला वो मंजर भी आयेगा,
प्यासे के पास चलकर
समदर भी आयेगा।
थक कर न बैठ ये मंजिल के मुसाफिर
मंजिल भी मिलेगी
और मिलने का मजा भी आयेगा।।

 

©श्री.धनंजय मोहन झोंबाडे
   माजी विदयार्थी
  टि.ज.महाविदयालय.
  खडकी, पुणे.

 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें