मंगलवार, 15 सितंबर 2020

माणूसचं मोठा हाय की.....

*माणूसचं मोठा हाय की.....!!!* 
----------------------------------------

संगमवाडी बसस्टॉप जवळ बराच वेळ उभा होतो. काही अंतरावर नदी असल्यामुळे कडाक्याची थंडी जाणवत होती. तेवढयात बस आली. विश्रांतवाडी-कोथरुड बसमध्ये चढलो. बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. बहुसंख्य महिलाच होत्या. वाहकाला सुट्टे पैसे दिले. त्याने दिलेले तिकीट घेऊन सीटवरती बसलो. बसमध्ये सर्वत्र नजर टाकली. तर २२ ते २५ महिलांची जोरजोरात चर्चा चालू होती. सगळे प्रवाशी 'त्यांच्या'कडे पाहत होते. इतरांना त्यांची भाषा कळत नव्हती. पण त्यांच्या भाषेवरुन त्या 'पारधी' समाजाच्या असल्याचं कळलं. आपण बसमध्ये आहोत याचा विसर पडलेल्या 'त्या' महिला मोठ-मोठ्याने ओरडून बोलत होत्या. जणू स्वातंत्र्याचं सुख त्या उपभोगत होत्या. मात्र बसमधील इतर प्रवाशी त्यांच्याकडे किळसवाण्या नजरेने बघत होते. गावढंळ, मुर्ख, भिकारी, नालायक यांना काय कळतंय की नाही? अशा शब्दात त्यांचा 'तिरस्कार' प्रवाशी करत होते. याचं भान त्या महिलांना नव्हतं. कारण 'सभ्यते'च्या व 'धर्मनिरपेक्षते'च्या गप्पा मारुन स्व:ताला सुशिक्षित म्हणवणाऱ्यांच्या जगापासून त्या खूपचं लांब होत्या.
स्वतंत्र भारताच्या वर्गवारीनुसार भटक्या विमुक्त या गोंडस नावाखाली प्रगतीपासून कोसो दूर असणारी ही जमात. इथल्या पोलिसगिरीनं 'गुन्हेगार' ठरवलेली ही जमात. पण मातृसत्ताक पध्दती स्विकारुन सामाजिक 'समता' जपणारी ही जमात.
सभ्य, 'सुसंस्कृत' आणि सुशिक्षित समाज त्यांच्याकडे 'माणूस' म्हणून बघतचं नाही.
 बस सुसाट सुटली होती. त्यांच्या गप्पाही रंगात आल्या होत्या. प्रवाशांचा जोरही वाढला होता. बसमध्ये मागच्या बाजूला बसलेली एक महिला सर्वांना बोलत होती. 'ती'च्या बोलण्याला सगळयाजनी गंभीर घेत होत्या. त्यामुळे ती मागे बसलेली महिला त्यांची मुखिया वाटत होती. अन तेवढयात 'मुखिया' असणा-या महिलेचा मोबाईल वाजला.....'दिल में मेरे हैं दर्दे डिस्को.... दर्दे डिस्को'.... या 'रिंगटोन्स'ने बसमध्ये शांतता पसरली. तेव्हा फोन न घेता त्या महिलेने माझ्याकडे वळून पाहिलं....आणि विचारलं आपुण कुठं हाय? साहेब. मी लगेचच शिवाजीनगर म्हणालो. तीने फोनवरती शिवाजीनगर असं सांगितलं. आणि फोन बंद केला. पुन्हा ती महिला गप्पात रंगली....बस संचेतीच्या सिग्नला थांबली. पुन्हा त्या महिलेचा फोन वाजला...तीने फोन घेतला. हॅलो...आमी शिवाजीनगरला हाय...आॅ...कोथरूड बस हाय...मग काय करू...कुठं...जिजाई गारडनं...वारजे माळवाडी...बरं हाय...!!
पलीकडून संवाद साधणा-या व्यक्तीच्या प्रश्नांना ती गंभीरपणे उत्तरे देत होती. इतर महिला तीच्याकडे आशेनं बघत होत्या. पुन्हा एकदा तीनं फोन ठेवला.
'त्या' फोनवर झालेल्या संभाषणांने माझ्या लक्षात आलं की, या सगळया महिला कुठल्यातरी मंगल कार्यालयात 'स्वयंपाक' करण्यासाठी जात आहेत. पण पलिकडच्या फोनवरील महिलेनं वारजे माळवाडी सांगितल्यानं त्या गोंधळात पडल्या. त्यांनी इतर प्रवाशांना जिजाई गार्डन वारजे माळवाडी असं विचारल्यावर सगळेचं हसायला लागले. त्यांनी आशेने 'वाहकां'कडे बघितले पण तोही मोठमोठयाने हसत होता. त्या महिला गोंधळून गेल्या. पण तेवढयात उतरण्यासाठी पुढच्या दारात गेलेला 'एक तरूण' मागे वळाला. त्याने त्या महिलांना  सांगितलं. घाबरू नका. माझ्या बरोबर मनपा ला उतरा. तिथून मी तुम्हाला वारजे माळवाडीला बसवतो. तरूणाच्या बोलल्याने त्या सुखावल्या. काही वेळात मनपा स्टाॅप आला. त्या महिलाही गडबडीने उतरल्या. आणि मी सुध्दा उतरलो. त्या तरूणाला त्यांनी विचारलं बस कुठं हाय? आता येईल. असं तोही म्हणाला. दोन-चार मिनीटांनी बस आली. वारजे माळवाडी बसमध्ये त्या तरूणांने सर्व महिलांनी बसवलं. बस निघाली... त्या मुखिया असणा-या महिलेनं त्याला हात उंचावून धन्यवाद दिले. आणि त्या निघून गेल्या.....!
थोडया वेळानं 'आकुर्डी रेल्वे स्टेशन' बस आली. मी बसमध्ये चढलो. तेवढयात तो तरूण हि बसमध्ये आला. बस सुरू झाली. मी त्याला विचारलं कुठं जायचंय? तो म्हणाला शिवाजीनगरला. मला आश्चर्य वाटलं. म्हणून मी त्याला म्हणालो..."अगोदरच्याचं बसने शिवाजीनगरला का उतरला नाहीस?"... उतरलो असतो तर 'त्या महिलांना' वारजे माळवाडीला कुणी बसवलं असतं. खरंतर मी मगाशीचं उतरणार होतो. पण सगळे प्रवासी त्या महिलांकडे बघून हसायला लागले. म्हणून मी उतरलो नाही. सरळ मनपाला आलो. 
मी म्हणालो पण तुझा वेळ गेला? तो म्हणाला त्या 22 ते 25 महिलांचा वेळ जर माझ्यामुळे वाचला असेल तर माझा वेळ गेलाचं कुठे? त्याला काय तरी बोलावं म्हणून उगीचंच म्हणालो पण तुला पुन्हा तिकीट काढून शिवाजीनगरला जावं लागणारं? किमान 5 रूपायांचा तरी तोटा होणार? माझ्या प्रश्नांवर तो खळखळून हसला. आणि म्हणाला. त्या महिलांच्या आनंदातचं माझे पैसे वसूल झाले. आणि मगाशी त्या महिलेनं गर्दीत हात उंचावून मला 'निरोप' दिला. त्यातचं मी खूप काही मिळवलं. मी म्हणालो तुझं शिक्षण किती? तो म्हणाला घरची गरीबी असल्यामुळे जास्त शिकता आलं नाही. 5 वी पास आहे. पण लिहिता वाचता येतं चांगलं. मला अप्रुप वाटलं म्हणून विचारलं, त्या महिलांना तु ओळखत होतास काय? तर तो म्हणाला 'वळक- पाळक' नाही. पण माणसाला ओळख लागतेचं कशाला. शेवटी...माणूसचं मोठा हाय की... मी म्हणालो काय करतोस? त्यानं सांगितलं. सिक्युरिटी गार्ड.... तेवढयात शिवाजीनगर स्टाॅप आला. तो गडबडीनं उतरू लागला. मी ओरडून विचारलं? तुझं नाव काय? सुरेश कांबळे असं सांगून तो उतरला. 
मी त्यांच्या पाठमो-या शरीराकडे बघत होतो. इतक्यात बस निघाली. थंड वा-याची झुळूक कानावरती पडली. आणि मी विचारात पडलो.
स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही आम्ही माणूस स्विकारला नाही. 'पारधी' समूहाला मान प्रतिष्ठा का देवू नये. मोठमोठया स्टेजवरून समतेचा, एकात्मतेचा घोष करणारे प्रवाशी सौजन्यशील का नाहीत? पदव्या न घेतलेला पण माणुसकीच्या शाळेत शिकलेल्या त्या तरूणाला संस्कारशील का म्हणू नये? 
विद्येच्या माहेरघरात संस्कतीचा ठेंभा मिरवणा-यांकडून त्या महिलांना 'सन्मान' का मिळू नये? शेवटी... 'माणूसचं मोठा हाय की?' असं म्हणणा-या त्या तरूणांला सर्व अर्थानं 'माणुसकी' कळली, असं म्हणता येणार नाही का?
मंगळावर स्वारी करणारा, संत महात्म्यांचा, शांतीचा पुरस्कर्ता, विविधतेत एकता असणारा, गुण्या गोंविदाने नांदणारा, सुजलाम सुफलाम असणारा, जागतिक महासत्ता होवू पाहाणारा, सोने की चिडीयाॅं असणारा, म.गांधी, विवेकानंद, डाॅ.आंबेडकरांचा असणारा, क्रांतीचा, शौर्याचा, त्यागाचा असा हा भारत देश. असं वर्णन शालेय पासून विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत सगळीकडेच दिसतं. पण हा भूतकाळ आहे. हे आता नव्यानं शिक्षण व्यवस्थेत रूजवलं पाहिजे. कारण माणसाला माणुसकीची वागणूक न देणारा समाज आणि देश समानता व एकात्मतेकडे कधीचं वाटचाल करू शकत नाहीत. हाच जगाचा इतिहास आहे. पण त्या तरूणानं निर्माण केलेलं आशादायी चित्र उद्याच्या भारताचं आहे. हे मात्र नक्की! त्याचा कृतीशील विचार किती जण करणार? हा सुध्दा संशोधनाचा विषय आहे. परस्थिती काहीही असो. मात्र दुस-याच्या सुखात आपलं सुख शोधणा-या 'त्या' तरूणांचा विचार ऐकून मलाही वाटलं...शेवटी.. माणूसचं मोठा हाय की... 
सोशल नेटवर्कीगमुळे जग जवळ आलं आहे. असे म्हणून परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या 'वाझंट बाजारू कमेंन्टस फेसबुक' आणि 'व्हाॅटसप'वर करणा-या किती जणांना त्या तरूणांमुळे जाग येईल? माहित नाही? का हा हि प्रसंग फक्त आणि फक्त...लाईक, गुड, व्हेरी गुड, थँक्यू याच शब्दात अडकेल? याचीही भीती मला वाटत होती. तेवढयात 'गोलमार्केट' आल्याचं वाहकानं सांगितलं. मी लगबगीने बसमधून उतरलो. त्याच विचारात रस्ता ओलांडला. रूमकडे निघालो. पण माझ्या मनात विचाराचं 'चक्र' तयार झालं होतं. त्या महिला वारजे माळवाडीला पोहचल्या असतील काय? त्यांना जिजाई गार्डन सापडलं असेल का? त्या तरूणाला कामावर जायला उशीर तर झाला नसेल ना? अशा एक ना अनेक प्रश्नांनी भेदक जाळं तयार केलं होतं. मात्र हे विश्वची माझे घर असं ज्ञानेश्वरी लिहून सांगणा-या ज्ञानदेवांच्या 'ज्ञानेश्वरी'चा अर्थ एकाचं वाक्यात सांगणा-या त्या तरूणाचा चेहरा मला तसाच स्पष्ट दिसत होता. म्हणूनचं इतरांना सांगावं म्हणून भराभरा लिहूलं 
शेवटी... 
माणूसचं मोठा हाय की...!!!!

 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

©️ धनंजय मोहन झोंबाडे.
हिंदी विभाग.
सावित्रीबाई फुले विदयापीठ, पुणे.
.....................................

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें