शनिवार, 28 अक्तूबर 2017

अकंल पुलिस आलाय......पुलिस....!!

             अकंल पुलिस आलाय......पुलिस....!!








परवा नेहमी प्रमाणे टि.व्ही. बघत बसलो होतो. बातम्यांमध्ये एकचं विषय चर्चिला जात होता. आणि तो म्हणजे...एस.टी.चा संप. सामान्यांची ‘लालपरी‘ थांबल्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा पाढा ‘स्पेशल रिपोर्ट‘ मध्ये वाचला जात होता. कर्मचा-यांनी सणाच्या वेळी संपाचं ‘हत्यार‘ उपसायला नको होतं. असा सूर चर्चातले शहरी मान्यवर ‘अभ्यासक‘ करीत होते. हे सारं पाहायचं नसताना ही पाहवं लागतं होत. कारण या शिवाय ‘दुसरी‘ बातमीचं नव्हती. माध्यमांच्या ‘बे्रकिंग न्युज‘ला. टि.व्ही.वरचे ‘पाहुणे‘ तावातावाने बोलत होते. एस.टी. कर्मचा-याचं कुठं चुकतं? त्यांनी काय करायला हवं? असं सारं सांगत होते. मला मात्र याचा ‘संताप‘ येत होता. आज एस.टी.ची अवस्था काय आहे? कर्मचारी कसे दिवस काढतायेत? राज्यातली 189 आगारे कशी आहेत? याची कोणतीही माहिती नसताना आपणालाचं ‘खूप‘ काही माहित आहे. असं दाखविणारे हे ‘अभ्यासक‘ पाहून चीड येत होती. तेव्हा सांगलीच्या पलूस आगारात 4200 रूपये पगारावर काम करणारा माझाचं वर्गमित्र कुमार मुठे आठवला. मुठे नेहमी सांगतो...एस.टी.च्या व्यथा व वेदना. सतत कामाविषयी चिंता व्यक्त करतो. वेठबिगार आणि एस.टी. कर्मचारी यांच्यात सहसा फरक नाही. हे तो ठासून सांगत असतो. मनात वाटत होतं कि, अशाचं रंगलेल्या एखादया ‘चर्चत‘ कुमार ला बोलवलं तर काय होईल? व्यवस्थेची ‘लक्तरे‘ बाहेर येतील. कामगारांच्या ‘स्वप्नां‘चा कसा चुराडा होतो. हे सगळं समोर येईल. कुमार तसा उच्च श्क्षिित बीए.एम.ए.नेट. पण इथली ‘सिस्टिमचं‘ डेंजर आहे. त्याला कुमार तरी काय करणार. भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यानं एस.टी. धरली. असा सगळा विचार करत होतो. त्याचं वेळी बाहेर रस्त्यावर दिवाळीचे फटाके वाजवत असलेली भावाची दोन्ही पोरं पळत आली. आणि जोरात सांगू लागली. अंकल पुलिस आलाय पुलिस........
            त्या दोघांपैकी मोठा असलेल्या अनिकेतला मी नीट विचारंल तर तो म्हणाला...खरं अंकल पुलिस आलाय पुलिस......मग मात्र मी जागेवरून उठलो नि बाहेर जाऊन बघितले तर....पोलिसांचा गणवेश घातलेला माणूस उभा होता. त्याला कुणी ‘बहुरूपी‘ तर कुणी ‘रायधन‘ म्हणतात. मला पाहून त्यानं अदबीनं नमस्कार केला. तो बोलू लागला....लग्नाला चला. कुत्री मांजरी घ्या सोबतीला. सासूचं लग्न आहे. तुमच्या विषयी कंम्पलेट आलीय. असं बरंच काही तो बोलत होता. परंपरेने आलेली सगळी वाक्य त्यांन बोलली. आई त्याला ‘गहू‘ वाढत होती. तर त्यानं सांगितलं की ते घेणं केव्हाचं बंद केलयं. पैसे द्या. मग मी आईला म्हणालो ‘फराळाचं‘ काय तरी दे. ती घरात गेली. मी त्याला दहा रूपये दिले. बसायला सांगितले. आईनं फराळाचं दिलं. व चहा करायला घरात गेली. मी त्यांच्याशी गप्पा मारू लागलो. त्याचा व्यवसाय. त्याचं कुटंुब. त्याचं आयुष्य. त्याचा प्रवास. त्यांचा संघर्ष. अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर करत होतो. तो सांगत होता. मी ऐकत होतो. त्याचं वेळी समाज म्हणून आपला ‘पराभव‘ झाल्याची भावना निर्माण होत झाली. त्याचा अंधारातला प्रवास थक्क करायला लावणारा होता. उजेडासाठीची त्याची धडपड प्रचंड वेदना देणारी होती. मी अस्वस्थ होऊन ऐकत होतो...............
                30-35 वर्शाचा हडकुळा, काळासावळा ‘संभाजी‘ अंगात मळालेला पोलिसी गणवेश. पायात दोन्ही बाजूला दो-याने शिवलेला बुट. मानेवर नटांसारखे रूळलेले केस. डोक्यावर फाटलेली पण रूबाबदार वाटणारी ‘हवालदार‘ टोपी. खांदयावर झोळी सारखी अडकवलेली कापडाची मळलेली पिशवी. गळयात काळा दोरा. असा त्याचा वेश. तर संभाजी सांगत होता. लातूर च्या एका झोपटपटटीत याचं लहानसं झोपडं. घरी आई, वडील एक भाऊ, बायको नि तीन मुलं. बहिणीचं लग्न झालेलं. वडीलांचा हा पिढीजात व्यवसाय. वारसा हक्काने याच्याकडे आलेला. मौसमात मागायला जायचं. नि इतर वेळी मोलमजुरी करून भागवायचं. वडील व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे घरची सगळी जबाबदारी यांच्यावरचं आलेली. त्यात हा घरात थोरला. आई आजरी असते. बायको आजही रोजंदारीवर जाते. भाऊ शाळा शिकतोय. आता तो आठवीत आहे. कुटंुबाचा गाढा ओढतोय. पण हरला नाही. निराश झाला नाही. खचला सुध्दा नाही. लढण्याची नि जगण्याची स्वप्ने उरात घेऊन दररोज नवा गाव जवळ करतोय. खुप काही त्याच्या मनात आहे. पण परिस्थितीपुढे ‘हतबल‘ आहे. संभाजी रामा रेडके असं त्याचं पूर्ण नावं....!
                   तो पुढे सांगत होता.....हाच आमचा पिढीजात व्यवसाय.पण सारं चित्र फार बदलून गेलयं. लोकं आता पहिल्या सारखं दान देत नाहीत. म्हणून एका दिवशी दोन-दोन गावं भटकंती करावी लागतेय. घरी गेल्यावर आशेनं बघणारी तोडं बघून मनाची कालवाकालव होते. जीव तुडतो. अपराध्या सारखं वाटतंय. मी म्हणालो.....वडीला नंतर तू.....पुढे नंतर तुझा भाऊ....नंतर तुझा मुलगा....पुढे त्याचा मुलगा......हे चक्र थांबणार कसं? तो मात्र हिमतीनं म्हणाला....भावानं हे करू नये. म्हणूनचं त्याला ‘शाळा‘
शिकवतोय. मुलाला ही शाळा शिकविन. मोठा करीन. दिवस रात्र मेहनत करीन....पण पुन्हा हि वाट घरच्यांना धरू देणारं नाही......मी त्याच्या स्वप्नांना शुभेच्छा दिल्या. काही गरज लागल्यास नक्कीचं आठवण कर असं म्हणालो. मोबाईल नंबर देत होतो. पण त्यांच्याकडे मोबाईल नावाचं ‘यंत्र‘चं नव्हतं. मध्येचं तो म्हणाला, साहेब...वेळ खूप झालायं...निघावं लागेल. आणखी पन्नास साठ तरी घरं फिरावी लागणार आहेत. येऊ का? मी त्याला ये म्हणालो. तो जाण्यासाठी उभा राहिला आणि म्हणाला....असं ‘आपुलकीनं‘ बोलणारं ही आता कुणी भेटत नाही? तुम्ही बोललात ‘झकास‘ वाटलं. आधार असला की माणूस डोंगराला ही फोडतो ओ...आणि तो लगबगीनं पाठीमागे वळून पुढच्या गल्लीकडे झपझप चालू लागला...
                      खरं तर नानाविध सोंगे धारून करून भिक्षा मागणा-या लोकांची एक जमात बहुरूपी. बहुरूप्यानांच वेगवेगळी नावं मिळाली आहेत. बहुरूपी, रायनंद, रायधनं, भोरपी, भैरूपी, बोहर्पी वैगरे वैगरे.....त्यांच्या अभिनयातील चढ उतार ग्रामीण भागात ‘मनोरंजना‘चा विशय आहे. या सोंगामुळे खेडया-पाडयात खरे पोलिस आल्याचे समजून अनेकांची ‘भंबेरी‘ उडते. ते हुबेहुब ‘पोलिस‘चं वाटतात. पण या समूहावर ‘भीक‘ मागायची वेळ आज आली आहे.
                साहित्य दरबारात ही अशा समूहांच्या नशिबी उपेक्षा पाहायला मिळते. बहुरूप्यांवर फारसं साहित्य उपलब्ध आहे. असं वाटतं नाही. मागे चिंतामणराव कोल्हटकर याचं पाॅप्युलर प्रकाशनाने प्रसिध्द केलेलं ‘बहुरूपी‘ पुस्तक वाचनात आलं होतं. मराठी विश्वकोशात ओजरता उल्लेख या ‘समूहा‘चा झाला आहे. ‘भटक्यांचा भाईबंद‘ म्हणून ज्यांना आम्ही वाचत, बोलत नि ऐकत आलो, त्या ‘रामानाथ चव्हाण‘ यांनी मात्र अशा उपेक्षित समूहाचा दस्तावेज पाच खंडात मांडून पुढच्या दहा पिढयांचं काम करून ठेवलंय. ‘सकाळ‘च्या ‘फिरस्ती‘मध्ये सुध्दा उत्तम कांबळे यांनी अशा विविध समूहांची ‘कैफियत‘ सांगून आपल्या मनातली ‘घालमेल‘ समाजापुढे ‘थोडसं वेगळं‘ वाटण्यासाठी मांडली आहे. ते संगळं वाचल्याचं आठवतंय...!
                         आधुनिक काळ झपाटयाने बदलतो आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळात आम्ही यंत्राशी बांधलो गेलो आहोत. अनेक भाषा, संस्कृती, चालीरिती, सण, व्यवसाय कालबाहय ठरत आहेत. घडयाळाच्या काटया प्रमाणे माणूस ‘भाकरी‘च्या शोधात पळतो आहे. अशा वेळी ‘बहुरूप्याचं‘ काय? याचं कुणालाचं काही देणं-घेणं नाही. लाल किल्यावरून घोषणा केलेल्या किती ‘योजना‘ त्यांच्या प्रर्यंत पोहचतात? ‘स्वतंत्रता‘ हे कुण्या गाढवीनीचं नावं आहे? हा प्रश्न नामदेव ढसाळांना व्यवस्थेतलं हे ‘विरोधाभासी‘ चित्र पाहून तर पडला नसेल ना? नारायण सुर्वेंच्या कविते प्रमाणे ‘भाकरी‘चा चंद्र शोधण्याची यांची भटकंती कधी थांबणार आहे का? 2020 प्रर्यंत आमच्या देशात प्रत्येकाला घर मिळणार आहे. पण रेशनकार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, बॅकेचं पासबुक, जनगणनेत नोंद नसणा-या या समूहाला ‘निवारा‘ मिळेल काय? ‘सौभाग्या‘चा प्रकाश 2022 प्रर्यत तरी यांच्या झोपडीत जाईल का? यांना वगळून आम्हाला ‘डिजीटल इंडिया‘ व्हायचंय का? यांच्या वाटयाला ‘सबका साथ, सबका विकास‘ कधी येईल? यांनी हि कधी काळी ‘अच्छे दिन‘ ची स्वप्ने बघितली होती. ती पूर्ण होणार का? अषा असंख्य प्रश्नाचं ‘चक्र‘ मनात निर्माण झालंय. त्याला भेदायचं तरी कसं. हा ही एक प्रश्नचं आहे.
              या समूहाचा ‘विकास‘ व्हावा असं वाटत असतानाचं ‘विकास वेडा झालाय?‘ ‘विकास हरवलाय?‘ ‘विकास पळून गेलाय?‘ अशा आशयांचे वेगवेगळे संदेश ‘व्हाटसप्‘वरचे अनेक मित्र पाठवत आहेत. सोबतचं ‘प्रकाश‘ आणि ‘प्रगती‘ गायब झाल्याचा ‘दावा‘ ते करताहेत. अर्थात फक्त सोशल माध्यमांवरचं. त्यामुळे संभाजी नि संभाजीचं आयुष्य डोळयां समोरून काही केलं तरी जात नाहीये. मागे एकदा मंकरंद अनासपुरेंचा ‘पुन्हा गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा‘ नावाचा चित्रपट बघण्यात आला होता. त्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी ‘बहुरूपी‘ लोेकांना बंदबोस्तासाठी नेमलं जातं. अर्थात पैशंाच्या वाटपासाठी. नंतर ते बहुरूपी असल्याचं समजतं. त्यावर तो बहुरूपी म्हणतो की,  ‘आम्ही रायधन हाय. पाचसे रूपय रोजानं आलोय‘. चित्रपटात हा प्रसंग पाहाताना ‘मनोरंजन‘ होतं. पण त्यांच्या ‘प्रतिष्ठेचं‘ काय या प्रश्नाचं कोणतचं उत्तर सापडत नाही?
              .........हा सगळा ‘विरोधाभास‘ पाहत असतानाचं मनात वाटलं की.....बहुरूप्यानीचं अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गरजांसाठी संपाचं हत्यार उपसलं तर काय होईल? लोकशाहीचा ‘चैथा स्तंभ‘ तरी दखल घेईल का? समाज म्हणून आम्ही तरी ‘संवेदनशील‘ होणार का? ‘आपलं सरकार, कामगिरी दमदार‘ची जाहिरात करणारे तेव्हा काय करतील? अशा अनेक प्रश्नाचं चक्र पुन्हा एकदा तयार होऊ लागलं. अर्थात त्यां प्रश्नांना ही उत्तर मिळत नाहीयेत.......!
               माणूस म्हणून ‘जिव्हारी‘ लागलेली हि ‘सल‘ लिहित असतानाचं...एस.टी.चा संप ‘हायकोर्टानं‘ बेकायदेशीर ठरवल्याची बातमी ‘संध्याकाळच्या बातम्यां‘ मध्ये येऊन धडकली...लगेच पलूसला कुमारला फोन केला. त्याला हि ‘बे्रकिंग न्युज‘ सांगितली. नि विचारलं पुढं काय रे? तो म्हणाला....आमच्या हातात काय आहे? संघटना बैठक घेईल. आणि कोर्टाचा ‘आदर‘ करायचाय म्हणून संप मागे घेईल. पुन्हा एस.टी. धावेल....!
          ....लालपरी सुरू झाल्यावर सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. खाजगी वाहनांकडून लोकांची होणारी ‘लूट‘ थांबेल. सरकार सुटकेचा श्वास घेईल...पण पुन्हा असाचं कधी तरी कुमारचा फोन येईल...श्वास कोंडतोय या नोकरीत. जीव गुदमरतोय. पगारात भागत नाही. दिवसाला दोन लाख मोजायचे. त्याचा हिशोब करायचा. नि महिन्याला 4200 बेसिक पगार घ्यायचा. कुंठ तरी बघा. सी.एच.बी. बघा. पर्मनंटला हवं तर गावाकडची दोन एकर शेती विकून 7-8 लाख देऊ? असं बरंच काही...मात्र त्याला कसं सांगणार आजच्या व्यवस्थेत ‘शिपाई‘ होण्यासाठीचं तेवढे मोजावे लागतात. 1800 रूपयांवर सी.एच.बी वर ‘ज्ञानदान‘ करावं लागतं. सोबतचं ‘एन.एस.एस.‘ किंवा ‘विदयार्थी कल्याण‘ संभाळावं लागतं. कधी-कधी तर...‘नॅक‘ सुध्दा....कुमारला कसं समजावून सांगावं कि, हा काळ श्री.म.माटेंचा नाही. मामाजी जगदाळेंचा नाही. बापूजी साळुकेंचा नाही. भाऊराव पाटलांचा नाही. किंवा सांगोला महाविदयालयाच्या बाबुराव गायकवाडांचा नाही.......
           पण आता ‘हिंमत‘ करून ठरवलंय की कुमारला ‘खोटा‘ धीर दयायचा नाही. व्यवस्था त्याला समजावून सांगायची.जमलचं तर त्याला उत्तम कांबळे सरांनी ‘फिरस्ती‘मध्ये ओळख करून दिलेल्या ‘सुगंधा सावंत‘ या डबल बीए.एम.ए.बी.एड.संगणक डिप्लोमा व टायपिंगचा कोर्स शिकून ‘जयसिंगपूर आगारात‘ शेवटी ‘कंडक्टर‘ झालेल्या महिलेची भेट घडवून आणण्याचा विचार करतोय...पण हे सगळं करण्यासाठी पुन्हा ‘कुमार‘चा फोन आला पाहिजे.  संभाजी नि कुमार यांचा विचार करत असताना ‘मेरा देश बदल रहा है। आगे बढ रहा है। असं जाहिरातीत आणि प्लेक्सवर मोठया अक्षरात छापून बदल होत नसतो. याचीही जाणीव होत आहे. सोबतचं 2जी, 3जी आणि 4जी च्या काळात आपली हि ‘मन की बात‘ कुणाला पटेल का? यावर उत्तरं मिळतील का? असं वाटतंय. कारण हा काळ ‘जिओ‘वाल्यांचा आहे. दुदैवानं, संभाजी नि कुमार सारख्यांचा नाही.........!!!
                                           -धनंजय मोहन झोंबाडे.
                                           संपर्क -  9604011328.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें