मंगलवार, 15 सितंबर 2020

रांगेत या रांगेत...

*रांगेत  या......रांगेत..!!* 
====================
                  अनिकेतला म्हणजेचं मोठया भावाच्या मुलाला घेऊन उस्मानाबादला ‘जिल्हा रूग्णालयात‘ गेलो होतो. साथीचे आजार वाढल्यामुळे रूग्णालयात येणा-यांची संख्या नेहमीपेक्षा जरा जास्तचं दिसत होती. आठवडी बाजार किंवा यात्रा, जत्रा भरल्यासारखी तोबा गर्दी! जिकडं बघावं तिकडं माणसचं. लहान मुले, तरूण, महिला व जेष्ठ नागरिक असे सगळेचं रूग्ण उपचारासाठी आले होते. डाॅक्टरांच्या समोर ही भली मोठी रांग. त्यातून पाठीमागच्यांना डाॅक्टर ही दिसत नव्हते. त्यात ही पुन्हा विभागणी महिलांची व पुरूषांची वेगळी तपासणी रूम. तीला वैदकिय भाषेत ‘ओ.पी.डी‘ म्हणतात. इतर अनेक तज्ञ विभाग. पण एखादयाचं तज्ञ विभागात ‘डाॅक्टर‘ हजर. कान,नाक,घसा तज्ञांच्या बाहेर आठ-दहा रूग्ण उभे. मात्र डाॅक्टर राऊंडला गेल्याचे ‘सरकारी उत्तर‘ तयार.....
          प्रत्येक ठिकाणी ‘रांगेत या'...असं माणसं ऐकमेकांना सांगत होती. रांगे शिवाय दुसरं कायचं दिसत नव्हतं. बहुतेक सगळया विभागात रांगचं...रांग...ती हि लांबलचक..!! शेवटी प्रत्येक रूग्णाला रांगे शिवाय पर्याय नव्हता. रांग नि लोक असचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र रांगेत जेष्ठ नागरिकांचे हाल व्हायचे. म्हणून अबालवृध्द माणसं समोरच्याला ‘इंथ माझा नंबर आहे.' असं सांगून मिळेल त्या बाकडावर गर्दी करत होते. लहान मुलं रांगेत थांबून वैतागली होती. रांगेमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
     शेवटी पुतण्याचा नंबर आला. डाॅक्टरांनी तापसलं. औषधे लिहून दिली. काय-काय पथ्य पाळा. हे एका मिनीटात सांगून मोकळं केलं. रांग मोठी असल्यानं डाॅक्टर ही रूग्णांचे ऐकून औषधे लिहून देत होते. हल्ली सरकारी डाॅक्टर फक्त लिहूनचं देत असतात. या ऐकलेल्या वाक्याचा मीच साक्षीदार ठरलो होतो. रांगेतून सुटलो या आवेशात मी औषधे मिळण्याच्या ‘काऊंटर‘वर आलो.....तर तिथे ही पुन्हा भली मोठी रांगचं! आता मात्र चक्रावलो. या रांगेतून सुटका नाही. अशी मनाची तयारी केली. नि रांगेच्या शेवटी जाऊन थांबलो. सोबत लहान पुतण्या ही रांगेतचं!
             औषधे मिळण्याच्या काऊंटर पासून रूग्णालयाच्या आवारा प्रर्यंत रांगने जागा घेतलेली. रांगेतली माणसं केव्हा मोकळा होतोय. याचाचं विचार करीत होती. औषधे घेण्यासाठी येणारा प्रत्येक रूग्ण ‘रांग‘ पाहून पुन्हा आजारी पडल्यासारखा चेहरा करत होते. रांग मात्र वाढतचं चालली होती. मी विचार करीत होतो कि, रांग मागूनचं  वाढतेय. पण पुढून कमी का होत नाहीय? तेव्हा लक्षात आलं. की रांगेतही ‘वशिलेबाजी‘ सुरू होती. येणारा माणूस ‘रांग‘ पाहून आपल्या ओळखीचा माणूस शोधायचा व त्याच्या जवळ औषधे घेण्याची चिठ्ठी देत होता. ओळखीचा माणूस ही अशावेळी धावून येत होता. नि चिठ्ठी घेऊन समोरच्याला दिलासा देत होता....
                येणारा रूग्ण रांगेत कुणी आपला ओळखीचा. कुणी नातेवाईक. कुणी मित्र. कुणी पाव्हणा. कुणी गाववाला. तर कुणी इतर माणूस शोधत होते. त्यामुळे रांगेच्या मध्य भागात असणा-या प्रत्येकाकडे किमान तीन-चार चिठ्ठया गोळा झाल्या होत्या. म्हणूनचं पुढची रांग सरकतचं नव्हती. आणि मागची लांबचं लांब होत होती. हा सगळा प्रकार मी जवळून बघितला. नि गर्दीतल्या काही माणसांना सांगितला. हे ऐकून एक वयोवृध्द आजोबा पुढे आले. त्यांनी मधूनचं वशिला लावणा-यांना मागे लावले. तिथे येणा-या प्रत्येकांना आजोबा सांगत होते. ‘रांगेत या...रांगेत...!! पण आजोबांची ‘नजर‘ चुकवून काही ‘महाभाग‘ रांगेत मध्येचं ‘वशिला‘ लावून घुसत होते. तर काही लोक ‘इमाने इतबारे‘ ओळख काढून चिठ्ठी हातात देत होते. हि ‘वशिलेबाजी‘ थांबल्या शिवाय आपला ‘नंबर‘ लागणार नाही. याची ‘जाणीव‘ झाल्याने मी हि पुढे झालो. आजोबांच्या संगतीनं सगळयांना सांगत होतो कि, ‘रांगेत या...रांगेत...!! 
पण समाज कुठेही ‘पळवाटा‘ शोधत असतो. अशीच पळवाट रूग्णालयाच्या रांगेतही लोकांना सापडली होती. त्यामुळे ‘रांगेत या...रांगेत‘ या आजोबांच्या विनंतीला कुणीही दाद देत नव्हतं. शेवटी औषधे देणा-या कर्मचा-यांकडे मी वळालो. तर तो औषधे देण्यात गुंग झाला होता. प्रत्येक रूग्णाची चिठ्ठी वाचून पेनाने राईट नि गोल करत होता. राईट केलेली औषधे दिल्याचे सांगत होता. सोबतचं ‘गोल‘ केलेली औषधे ‘बाहेरून‘ घ्या म्हणत होता. हल्ली सगळीचं औषधे रूग्णालयात उपलब्ध नसतात. पाच पैकी किमान तीन तरी बाहेरूनचं घ्यावी लागतात.  त्यांच्या समोर जाऊन खिडकीतूनचं नमस्कार केला. नि त्यांना सांगितलं की रांग फारचं वाढली आहे. रूग्णालयाच्या आवारात पोहचली आहे. पुढं वशिलेबाजी सुरू आहे. मागचा मागेचं राहतोय. तेव्हा माझी विनंती आहे कि, रांगेत येणा-यानांच औषधे द्या. माझ्या बोलण्यावर ते संतापले. आणि मलाच म्हणाले की, ‘वशिलेबाजी सुरू आहे. त्याला मी काय करू? तुम्ही मला का सांगताय? लोकांनाचं रांगेनं यायचं कळत नाही का? आता मी औषधे देऊ? का रांग लावीत बसू? तुम्हाला काय जातंय सांगायला? इंथ रोजचं असं होतंय......‘त्या‘ सरकारी कर्मचा-याचं ते ‘रोखठोक‘ उत्तर ऐकून ‘रांगेत या..रांगेत..‘ असं सांगणारे आजोबांही ‘निराश‘ झाले. शेवटी तो तरी काय करणार? कारण तो ‘सरकारी कर्मचारी‘ आहे. त्यानं तसचं उत्तर देणं अपेक्षित आहे. त्याशिवाय तो ‘सरकारी माणूस‘ तरी कसा वाटणार. बहुतेक सरकारी कर्मचा-यांकडे कमी-जास्त प्रमाणात असाच ‘रूबाब‘ बघायला मिळतो. अर्थात याला अपवाद नाहीत असं नाही. पण त्यांची संख्या कमी आहे. हे मात्र सत्य आहे. 
                 खरं तर औषधांच्या ‘त्या‘ रांगेची काळजी घ्यायला तिथं एक ‘सुरक्षारक्षक‘ असायला हवा होता. पण सगळे सुरक्षारक्षक नको ‘त्या‘ ठिकाणी दिसले. आवारात गाडया नीट लावा, हे सांगण्यासाठी किमान पाच सुरक्षारक्षक बसले होते. पण रांग नीट लावा हे सांगण्यासाठी कुणीही सुरक्षारक्षक उपलब्ध नव्हता. औषधाच्या या रांगेजवळचं एक छोटीसी काचेची केबीन होती. त्यावर ‘ठळक‘ अक्षरात लिहिलं होतं कि, ‘मे आय हेल्प यू‘ याचा अर्थ ‘सर्वसामान्यांना‘ कळावा म्हणून मराठीत ‘बोल्ड‘ करून लिहिलं होत....‘आपणांस मदत हवी आहे का?‘ मी आशेनं ‘त्या‘ केबीनकडे बघितलं तर...आत मध्ये कुणीचं नव्हतं. कुणाकडे मदत मागणार. परंतु ‘त्याचं‘ केबीन समोर काही माणसं कुणी तरी येईल याची वाट पाहत उभी राहिलेली दिसली. 
                 तसं बघायला गेलं तर रांगेच आणि सर्वसामान्य माणसाचं जुनचं नातं आहे. नि त्या नात्यानं किमान शतकाची तरी वाटचाल केली आहे. रांग नि माणूस या समीकरणानं अनेक क्षेत्र व्यापली आहेत. ‘रेशन‘च्या दुकानात रांग. ‘राॅकेेल‘च्या वाटपात रांग. ‘राजीव गांधी‘ योजनेच्या पगाराची रांग. ‘रमाई आवास‘ योजनेच्या लाभासाठी रांग. ‘कर्जमाफी‘चे अर्ज भरण्यासाठी रांग. ‘विमा‘ भरण्यासाठी रांग. ‘स्कूल चले हम‘ म्हणणा-या पोरांच्या खिचडीची रांग. ‘शिष्यवृत्ती‘च्या चेक वाटपाची रांग. ‘वसतीगृह‘ प्रवेशासाठी रांग. ‘इंग्लिश मिडियम‘च्या प्रवेशाला रांग. ‘विद्यापीठा‘त प्रवेशाची रांग. ‘हागणदारी मुक्ती‘च्या योजनेचा चेक घेण्यासाठी ग्रामपंचायत बाहेर रांग. ‘पेन्शन‘ धारकांची रांग. ‘जात प्रमाणपत्र‘ काढण्यासाठी तहसील बाहेर रांग. ‘मोफत शिक्षणा‘ची पाठयपुस्तके मिळवण्यासाठी शाळेत रांग. ‘शिक्षकांच्या बदल्या‘साठी नेट कॅफे बाहेर रांग. ‘मनेरगा‘चा पगार घेण्यासाठी रांग. मध्यतंरी ‘नोटाबंदी‘ नंतर तर ‘रांग‘ फारचं चर्चेत आली होती. एटीएम बाहेर रांग. बॅकेत रांग. रात्र-रात्र रांग. आणि या रांगेनं काही ‘बळी‘ही घेतले. तेव्हा एक राष्ट्रीय नेते असं म्हणाले होते कि, रेशनच्या रांगेत ही लोक मरतातचं की! आणि या रांगेनचं ‘देशभक्ति‘ची नवी व्याख्या जन्माला घातली. रांगेत निमूटपणे उभे राहणारे ‘खरे देशभक्त‘ आणि रांग आहे म्हणून संताप व्यक्त करणारे ‘देशद्रोही‘ असं म्हटलं जातं होतं. तर अशी ‘भयानक‘ आहे रांग. कारण ती कधी काय जन्माला घालेल हे सांगता येत नाही. रांगेतूनचं राग, संताप, चिडचिड, निराशा जन्माला येते. झालचं तर रांगचं ‘व्यवस्था विरोध‘ वाढवते. रांगचं माध्यमांना ‘ब्रेकिंग न्युज‘ देते. मागे पैठणच्या एका शेतक-यांचा मृत्यु ‘सोयाबीन‘ नोंदविण्याच्या रांगेत झाला. नि त्यातून आरोपांचं ‘राजकारण‘ सुरू झालं. पुन्हा बातम्या...पुन्हा ब्रेकिंग न्युज....पुन्हा स्पेशल रिपोर्ट...पुन्हा ग्राऊंड रिपोर्ट...पुन्हा तेचं ते...
 पण ‘सरकार कुणाचंही‘ किंवा ‘कोणतंही‘ असो रांगेचे प्रश्न तेचं. रांगेची अवस्था तशीचं. रांगेचा संताप तोच. अक्रोश तोच....म्हणूनचं रांगेतूनचं योजना पुढे येतात. रांगेतून राजकारण जन्माला येत. रांगेतून घोषणा येतात. 90 च्या दशकातही रांगेतूनचं ‘गरीबी हटाव‘ घोषणा पुढे आली. लोकांनी भरपूर ‘मतं‘ दिली. पुन्हा रांग तशीचं. 2014 पुन्हा ‘गरीबी हटाव‘ ला आधुनिक नावं मिळालं ‘अच्छे दिन‘ पुन्हा त्यानांही भरपूर ‘मतं‘ मिळाली. पुन्हा रांग तशीचं. रांग अशीचं आहे. तीचा अंदाज बांधता येत नाही. तीला संपविता येत नाही. किंवा म्हटलं तर तीचा वेध ही घेता येत नाही. सारं काही अनाकलनीय...
       ...तर मी सांगत होतो औषधांच्या रांगेचं. त्या आजोबांचा नि त्याच्याचं मागे माझा नंबर येईपर्यंत तब्बल 2 तास गेले होते. शेवटी मला नि आजोबांना औषधे मिळाली. आम्हा दोघांच्याही चिठ्ठीवर दोन-दोन औषधे मिळाली. बाकीचे तीन ‘गोल‘ करून ठेवली होती. ‘गोल‘ केलेली बाहेरून घ्या. असं सांगून ‘सरकारी‘ कर्मचारी मोकळा झाला. आम्ही औषधांचं ‘काऊंटर‘ सोडलं. माझ्याकडे दुचाकी गाडी होती. म्हणून आजोबांना म्हटलं कुठं सोडू? ते म्हणाले एस.टी. स्टॅन्डला सोडा. मी त्याना गाडीवर बसविलं आणि निघालो... आजोबा म्हणाले एस.टी.नं गावाकडं जाण परवडतं. अर्धे तिकीट हाय. घरी जातो नि पोराला चिठ्ठी देतो. राहिलेली औषधे एैतवारच्या बाजारला आला की पोरगा आणिलं. लै येळ झाला बघ. लोकं कशी वागतात बघ की....आजोबांना बस स्टॅन्डवर सोडून घरी आलो. केस कापण्यासाठी गावातल्या दुकानात गेलो. तर तिथेही रांग. केस कापणारा म्हणाला...'सहा नंबर आहेत पुढं'.... निमूटपणे 'होय' म्हणून बसलो. शेवटी रांग काय पिछा सोडायला तयार नाही. असं समजून म्हणातल्या मनात हसलो....    
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
                                        
©️ *धनंजय मोहन झोंबाडे.*
📝📝📝📝📝📝📝📝

अष्टपैलू अभियंता...अतिश ओहोळ..

अष्टपैलू  'अभियंता'.
---------------------
जिद्द,चिकाटी,मेहनत या ञिसूञीचा खरा अर्थ खूपचं 'व्यापक'  आहे. तो अर्थ माणसाला 'अनुभवातून' समजत असतो. पण या तिहेरी 'गुणां'चा उपयोग करून आपलं 'आयुष्य' सुकर केलेला आवलिया म्हणजे अतिश ओव्हाळ होय. मनात आणलं तर 'माणूस' काहीही करू शकतो. हा 'सिध्दांत' त्याने खरा करून दाखविला आहे. तो नेहमी म्हणतो की, यशस्वी होण्यासाठी 'सकारात्मक' असायला हवं. आयुष्यातल्या सुख दु:खाच्या  अनेक प्रसंगात त्याचा 'बाणेदार'पणा जवळून बघता आला.
शिक्षणासाठीचा त्याचा 'संघर्ष' आम्ही लहान वयापासून पाहतो आहोत. 'इंजिनिरिग'ला असताना अतिश सायकलहून महाविद्यालयात जायचा. खरं तर घर ते महाविद्यालय १० किलोमीटरचं अंतर तो भर उन्हात पावसात पार करायचा. रोज २० किलोमीटरचा ठरलेला प्रवास. पण त्यात त्याने कोणताही 'संकोच' बाळगला नाही. किंवा घरी तक्रार सुध्दा केली नाही. दहावी किंवा बारावी पास होण्या अगोदर फँशनबाज गाडी द्यावी लागते.हे घरच्याकडून  'कबूल' करून घेणारा आजचा काळ. या काळात अतिशचा 'सायकल' प्रवास बघून गावात प्रत्येकाला त्याचा 'हेवा' वाटायचा. आहे त्या परिस्थितीत लढलं पाहिजे. हा त्याचा बाणा आहे. अनेक 'अडचणी' वाट्याला आल्या. पण त्याने कधीचं बाऊ केला नाही.
कोणताही शैक्षणिक 'वारसा' घरात नसताना त्याने माञ शिक्षणाची कास धरली. त्याच्या शिक्षणाची टक्केवारी किंवा पदवीचा अर्थ अडाणी असल्यामुळे आई व वडिलांना कळत नव्हता. आमच्या सारख्या त्याच्या मिञांना ते विचारायचो तेव्हा आम्ही समजावून सांगायचो. आपला मुलगा किंवा मुलगी पाचवी सहावीला  गेल्यापासून त्याच्या मागे 'अपेक्षाचं' आेझं लादणार्यां पालकांमध्ये व अतिशच्या  आई वडिलांमध्ये 'फरक' आहे तो मानसिकतेचा. अडाणी असूनही त्याच्या आई वडिलांनी त्याला 'मुक्तपणे'  संचार करू दिला. त्याला हवा तो विषय घेऊ दिला. त्याला हव ते करू दिलं. महत्वाचं म्हणजे त्याला त्याचं 'स्वातंञ्य' दिलं. पण अतिशनंही कधीचं स्वातंञ्याचा 'स्वैराचार' केला नाही. त्याने नेहमीचं आई वडिलांचा सोबतचं नातेवाईक, पाहुणे व मिञांचा आदर केला. आपुलकीनं 'संवाद' साधला आहे. अतिश विषयीचं आणखी एक नोंद घ्यावी लागेल की, कोणतीही 'शिकवणी'  किंवा सोकॉल्ड 'क्लास'  न लावता तो 'गेट' परीक्षा पहिल्या प्रयत्नात 'उत्तीर्ण'  झाला आहे. आपल्या 'जिद्दी'च्या बळावर पुढील शिक्षणासाठी राज्याच्या 'राजधानीत' धडक मारली. मुंबई नगरीच्या 'धावपळीत' तो सामिल झाला. व्ही.जी.टी.आय. मध्ये त्याने शिकण्या बरोबरचं शिकवणं सुरू केलं. त्याच्यातला 'शिक्षक'  आता अभिव्यक्त व्हायला लागला होता. विषय 'समजून' देण्याची त्याची 'पध्दत' सगळ्यांना आवडत होती. मुंबईनं त्याला खुप काही शिकवल्याचं तो नेहमी सांगत असतो.
दोन वर्षांच एम.टेक चांगल्या गुणांनी पूर्ण करून तो पुण्यात परतला. पुण्यात 'आमच्या' भेटी गाठी वाढल्या. मी पुण्याबद्दल तर तो मुंबईबद्दल बोलायचा. दिवस दिवसभर आमच्या 'गप्पा'  रंगायच्या. अन अचानक त्याने मांजरी हडपसरचं अण्णासाहेब आवटे इंजिनिरिग कॉलेज जॉईन केलं. तिथं 'शिकवू' लागला. रोज नवनवीन 'प्रयोग' केल्याने त्याला माननारा विद्यार्थी वर्ग निर्माण झाला होता. त्याच्या तासाला बसावं असं वाटणार्यांची 'संख्या' वाढत होती. त्याची शिस्त फार कडक होती.विद्यार्थ्यांना तो खडे बोल सुनवायचा.लवकरचं तो लोकप्रिय 'प्राध्यापक'  झाला. तो तिथे स्थिरावतो आहे. असं वाटत असतानाचं एका दिवशी त्याचा 'फोन' आला. कॉलेजला ये असं सांगितलं. मी तडक निघालो. पोहचलो व चौकशी करून त्याचा वर्ग शोधून काढला. पाहतो तो तर काय वर्गात चारचं पोरं. सगळा वर्ग या 'पट्यानं' हाकालून दिलेला. कारण काय तर 'प्रोजक्ट अनकप्लिट'. मला वाटू लागलं असा 'मास्तर' असला पाहिजे. गंडगंज फि भरली म्हणजे आपण वाटेल तसं वागू हि भावना निर्मांण झालेल्या इंजिनिरिंगवाल्यानां कुणीतरी सुनावणारा आहे. याचं 'समाधान' मला वाटत होतं. तो याचं क्षेञात 'मोठा' व्हावा असं वाटत असतानाचं जरा खाली जाऊन येऊ असं तो म्हणाला. आम्ही नेहमीप्रमाणे आवटे कॉलेजच्या मागे 'टपरीवर' गेलो. तिथं आमच्या नेहमीच्या चायवाल्याकडून अतिशनं 'चहाची' आँर्डर दिली. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. चहा आला आणि अतिशनं बॉम्ब टाकला. मी 'राजीनामा'  दिलाय. अगदी थंडपणे त्यानं सांगितलं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. सॉलिट 'टरकलो' होतो. पण अतिश तेवढाचं 'कूल' होता. इन्फँक्ट त्याच्या चेहर्यांवर कधी नव्हे एवढा आनंद दिसत होता. अतिशचं ते ठेवणीतलं हासणं. अरे, पण असं तडकाफडकी? पुढं काय? माझा टिपकल मध्यमवर्गीय प्रश्न. माहीत नाही, अतिशचं बेफिकर उत्तर. अरे खरचं माहीत नाही. थोडा दिवस मस्तपैकी 'ब्रेक' घेतो.चेहर्यांवरील हास्याची रेषा बिघडू न देता तो सांगत होता. काहीही 'हातात' नसताना अतिशनं ए.जी.आवटे कॉलेज सोडलं. असा निर्णय घ्यायला सॉलिड 'डेअरिंग' लागतं बॉस.
पुढे तो 'फोर्स मोटार्स'ला जॉईन झाला. तिथंही तो नवनवीन 'प्रयोग' करत राहिला. त्याच्यात लपलेला 'इंजिनिअर' आता वेगळ्या स्वरूपाचं इंजिनिरिंग करत आहे. कुणी अडलं नडलं  तर अतिशचा 'आधार' तिथेही लोकांना वाटतो आहे. माञ त्याच वेळी 'सिनियर' म्हणून तो 'कडक' वागतो. म्हणजे मैञी बिञी सगळं ठिक, पण आधी नेमून दिलेलं 'काम' पार पाडायचं. कामचुकारपणा त्याला आवडत नाही. अगदी तुम्हाला सातच्या शिप्टला वेळेवर येणं जमत नसेल किंवा 'दांडी' मारायची असेल तर कसं बिनधास्त सांगायचं. पण 'खोटं'  बोललेलं किंवा टंगळमंगळ केलेली त्याला अजिबातचं खपत नाही. कुण्याच्या खांद्यावर हात ठेऊन काम काढून घ्यायचं, कुण्या शहाण्याला किती 'शब्दांचा'  मार द्यायचा आणि कुणाला चौदावं रत्न दाखवून काम करायचं, याचं त्याचं असं स्वत:चं 'लॉजिक' आहे. त्यामुळं सगळ्यांच्याच मनात त्याच्याबद्दल एक 'आदरयुक्त' दरारा आहे.
अतिशची धडाडी पाहूनचं 'फोर्स मोटार्स'ने त्याच्याकडे महत्त्वाची धुरा सोपविली आहे. तिथं तो स्वता:ची 'ओळख' निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे.
दुसर्यांचं कौतुक करण्यात तो नेहमी आघाडीवर असतो. मी चिंचवडला कै.गोपीनाथ मुंडे राज्यस्तरीय विजेता ठरलो. तेव्हा त्याला झालेला आनंद विस्मरणीय आहे. माझ्या वक्तृत्वावर त्याचं फारचं प्रेम. माझ्या सभा, व्याख्यानांना तो नेहमी हजर असतो. 
आमच्यातला समान धागा म्हणजे क्रिकेटप्रेम. पण तो आमचा फोर्थ अम्फायर. त्याला जगातल्या सगळ्या क्रिकेट टिमचे खेळाडू माहीत आहेत. त्याची क्रिकेटविश्वा विषयीची माहीती अफाट आहे. आम्हाला सांगितलेला त्याचा अंदाज चुकतचं नाही. परवा दक्षिण अफ्रिकेसोबत आपण जिंकू. हा त्याचा 'विश्वास' खरा  ठरलाय. सामन्यानंतर मी 'फोन' केला. तेव्हा आता 'करडंकचं' भारताचा. असं तो म्हणाला आहे. त्याचं हे 'निरीक्षण'  खरं ठरेल यात शंकाचं नाही. वास्तविक पाहता आमचं 'क्रिडाप्रेम' हे फक्त क्रिकेट पुरत मर्यांदित. पण अतिश त्याला अपवाद आहे. तो क्रिकेट इतकाचं फुटबॉल व टेनिसचा चाहता आहे. पुन्हा तोच प्रकार तो जगातल्या सगळ्या फुटबॉल व टेनिसपट्टूना ओळखतो. तो लहानवयात क्रिकेट खेळायचा. 'जाग्याहून सिक्स' मारणारा खेळाडू अशी त्याची ओळख आमच्या गावात आहे.
स्वयंपाक करण्यात अतिश हात कुणीही धरू शकत नाही. त्याने बनविलेली 'भाजी' एखादा  आचारी लाजेल अशी असते. चिकन 'दम बिर्यांनी'  बनविण्यात त्याचा विशेष 'हातखंडा' आहे. असा कोणताचं मिञ नाही की, ज्याने अतिशच्या हातची 'बिर्यांनी' खाल्ली नसेल.
त्याच्यात 'संवेदनशील' मनाचा माणूस लपला आहे. लहान थोरांना तो 'आदर' देत असतो. मैञीची मनस्वी जाण असणारा अतिश 'मिञांना' फार जपतो. 
खरं तर इंजिनियर हे व्यावहारिक व व्यवासाईक असतात. त्यांना भाव भावना नसतात. असा आपला समज आहे. पण हा समज 'चुकीचा' असल्याचं अतिश आणि त्याच्या मिञांनी दाखवून दिलं आहे. आम्ही केवळ 'यंञाची'  किंवा 'मशिनची' भाषा समजत नाही. तर 'समाजाची' व 'माणुसकीची' भाषा समजतो. याचं भावनेतून 'समविचारी' मिञांना घेऊन 'ममत्व' फाऊडेशन ची स्थापना केली. या फाऊडेशनच्या माध्यमातून समाजाचा 'चेहरा' बदलण्याचं पाऊल ते टाकताहेत. दुखितांचे 'अश्रू' पुसताहेत. अंधाराला 'आव्हान' देताहेत. मनाच्या 'समाधाना'साठी झटताहेत. समाजात 'उजेड' करण्यासाठी लढताहेत......
माणूस म्हणून तो 'ग्रेट' आहेचं. पण मिञ म्हणून तर भलताचं 'गोड' आहे. परवा ऑफिसच्या कामानिमित्त चेन्नई व इंदौरला 'विमाना'नं जाऊन आला आहे. अतिशने मला  'फोन' करून विमानाने जात असल्याचं सांगितलं. आणि मी भूतकाळात रमलो. तासाला उशिर होईल म्हणून जरा लवकर सायकलहून कॉलेजला निघणारा १५ वर्षांपूर्वीचा अतिश आठवला. सायकलहून इंजिनिरिंग पूर्ण करणारा हा माणूस 'विमाना'तून प्रवास करतोय. याचं 'समाधान' वाटलं. त्याच्याविषयीचा 'आदर' अधिकचं वाढला.
शहरात राहूनही त्याचं 'माती' आणि 'शेती'वर खूप प्रेम. मी झोपत असतानाचं 'फोन' करून पाऊस, पाण्याबद्दल हमखास विचारणारं. 
सर्वांना समजून घेणारा. मिळून मिसळून राहाणारा अवलिया. त्याचं नाव अतिश.
त्याच्या सोबतच्या कितीतरी 'आठवणी' मनात घर करून बसल्या आहेत.........!!
हे सगळं लिहीण्याचं कारण म्हणजे या गोड, मितभाषी अष्टपैलू अभियंत्याचा आज 'वाढदिवस' आहे.
अतिश, दोस्ता तुझ्या सोबतचा स्नेह व मैेञी अशीचं राहिलं.
तुझी सारी 'स्वप्न' व 'इच्छा' आणि  'आकांक्षा'  पूर्ण व्हाव्यात. हिचं सदिच्छा........
मिञा तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.👔💍🎂🍧
ता.क.- आता दम बिर्यांनीची पार्टी कधी देणार. 
©धनंजय मोहन झोंबाडे.
    हिंदी विभाग.
    साविञीबाई फुले विद्यापीठ. पुणे.
---------------------

मरीआईच्या नावानं चांगभलं...

मरीआईच्या नावानं चांगभलं...!!




 आव्वाज कुणाचा टिजे कॉलेजचा....हिप..हिप..हुर्रे..तरी पण..टिजे..टिजे..टिजे..मरीआईच्या नावानं चांगभलं...मरीआईच्या नावनं चांगभलं...असा जल्लोष पुन्हा एकदा 'भरत नाट्यगृहा'च्या प्रांगणात ऐकायला मिळाला. टाळया, शिट्टया, घोषणा, चेअरपने परिसर दणाणून गेला होता. आणि निमित्त होतं...टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविदयालय प्रस्तुत एकांकिका 'मरीआईचा गाडा' होय.
             'पुरूषोत्तम करंडक' म्हटलं की, जल्लोष, घोषणा, आनंद, उत्साह या गोष्टी परंपरेने आलेल्या आहेत. टिकाराम जगन्नाथ कॉलेज 2007 पासून 'एकांकिका' स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. त्याची ही एक अजब कहानी आहे. 2004 ते 2006 या काळात महाविदयालयात शिकत असणा—या हितेश दिवाडकर, सुनील जावीर, भरत बगाडे अशा 'अभिनयप्रेमी' पोरांना पथनाटय, एकांकिका, एकपात्री व नाटक बघून त्याविषयी आवड निर्माण झाली होती. इतर महाविदयालयां प्रमाणे आपण ही त्यामध्ये सहभागी व्हावे असं त्यांना वाटत होते. त्याच भावनेतून या सगळया समविचारी पोरांनी 2006 ला हितेश दिवाडकर व सुनिल जावीर लिखित 'स्त्रीभ्रृणहत्या' हे सामाजिक विसंगतीवर भाष्य करणारे एक 'पथनाटय' सादर केले. त्या पथनाटयाला भरपूर प्रसिध्दी मिळाली. सोबत 'पारितोषिक' सुध्दा मिळाले. हिचं घटना महाविदयालयात अभिनय कला रूजविण्यास कारणीभूत ठरली. त्या अगोदर ही महाविदयालयात अभिनयप्रेमी मुलं होती. पण हा 'सांघिक' प्रयत्न होता. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. पुढे 2007 मध्ये बळीराजाचं जीवन अधोरेखित करणारी सुनील जावीर लिखित 'बळी' हि एकांकिका प्रथम 'सकाळ करंडक' मध्ये सादर करण्यात आली. त्यानंतर याचं प्रश्नावर सुनील जावीरने 'प्रश्न' हि एकांकिका लिहिली नि ती सुध्दा पुन्हा 'सकाळा करंडक'लाचं सादर झाली. या संघात हितेश दिवाडकर, सुनील जावीर, भरत बगाडे, प्रिया चव्हाण, निलेश कांबळे, सत्यवान पवार, कृष्णा घाडगे अशी तगडी पोर होती. 2008 मध्ये हरहुन्नरी कलाकार आणि लेखक असणारा अशिष टिळक या 'मंडळात' सहभागी झाला. पुढे प्रशांत दरोडे, सागर जावळे, तुषार निघोजकर, क्षितीजा सावंत, अफरीन पठाण, संदीप आठवले, अमोल कांबळे, रोहित ढेरे, अश्विनी पाटोळे, विशाखा कांबळे, आनंद शिंदे, मयुर गजरमल, स्वप्निल, मंगेश कांबळे अशी अनेक कलागुणांनी परिपूर्ण असणारी मंडळी एकत्र येत गेली. त्यातचं 2009 ला 'तंत्रज्ञाना'ची जाण असणारा राहूल झेंडे आमच्याशी जोडला गेला. 2009 ते 2012 या काळात त्याचं 'उत्साहाने' एकांकिका सादर झाल्या. बळी, प्रश्न, अॅंटेन्शन प्लीज, आम्ही एकांकिका करणार, शाहा—या, आॅफ पिरीयड, भेळ हि नावे असलेल्या आणि विविध समस्यांवर प्रकाश टाकणा—या 'एकांकिका' सादर झाल्या होत्या. पण 2012 नंतर मात्र काही कारणाने या एकांकिकेच्या गाडीला 'ब्रेक' लागला. त्यानंतर तब्बल 5 वर्षानंतर 'मरीआईचा गाडा' मोठया जल्लोषात सादर झाली. एकूणचं काय तर 'बळी ते मरीआईचा गाडा' हि एक संघर्षगाथाचं आहे. असं म्हणायला काहीचं हरकत नाही...!
                     19 आँँगस्टला सायंकाळी झालेला 'मरीआईचा गाडा' हा प्रयोग किती तरी आठवणी आणि प्रसंगांना उजाळा देणारा ठरला. पुन्हा एकदा 'टि.जे'च्या स्पिरीटची चर्चा झाली. यावेळी मात्र वातावरण खूपचं 'सकारात्मक' होतं. एकांकिकेचा विषय नेहमी प्रमाणेचं 'सामाजिक' होता. अण्णा भाऊ साठेंच्या कथेवरील हि एकांकिका 'विज्ञानवादा'चा पुरस्कार करणारी ठरली. गावगाडयातल्या व्यवस्थेवर भाष्य करणा—या या 'प्रयोगा'ने सर्वांचीचं मने जिंकली. वाहवा झाली. चर्चा झाली. त्यामुळे 'टिम टिजे'चा आनंद व्दिगुणित झाला आहे. या आनंदात अशिष टिळक, हितेश दिवाडकर, भरत बगाडे, प्रशांत दरोडे, राहूल झेंडे, संदीप आठवले, सागर जावळे, स्वप्निल, विनय, अमोल कांबळे, प्रेम सोनवणे यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते. 
               एकांकिका संपल्या नंतर बाहेर खूपचं सकारात्मक चर्चा ऐकायला मिळाली. रास्ते सर व इतर सर्व जण खूप कौतुक करत होते. या निमित्ताने एका गोष्टीची नोंद घ्यावी लागेल की, पहिल्यादाचं संस्थेचे सर्व पदधिकारी 'प्रयोगाला' हजर झाले होते. त्यामध्ये खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष विलास पंगुडवाले, चिटणीस आनंद छाजेड, प्राचार्य अरूण मोकाशी सर,यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. सोबतचं सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.महादेव रोकडे सर, प्रा.गौरी माटेकर, डॉ.वीना मनचंदा, प्रा.रूपाली अवचरे ही हजर होते. 
      संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांना सांस्कृतिक क्षेत्राची जाण आहे. ते स्वता: अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष आहेत. प्रयोग पाहून त्यांना खूप समाधान वाटलं. त्यांनी आनंदाने सर्व कलाकारांना आपुलकीने चर्चा केली. सगळयांना चहापाणी केलं. आणि किमान एकदा तरी 'पुरूषोत्तम करंडक' आपला झाला पाहिजे हि इच्छा बोलून दाखविली. त्यातून कलाकारांचा हुरूप प्रचंड वाढल्याचे जाणवले. 
        आता थोडसं एकांकिके बद्दल...'मरीआईचा गाडा' हि अण्णा भाऊ साठेंची मुळकथा. ती साधारणता:ह 1956 ला लिहिली गेली आहे. अंधश्रध्देवर प्रहार करणारी हि कथा 'नाना' या धडपडया तरूणाला नायक म्हणून समोर आणते. या मुळ कथेचा विषय न सोडता आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात 'मरीआईचा गाडा' हि एकांकिका साकारली गेली आहे. आजच्या पिढीच्या संवादाची भाषा त्यामध्ये वापरण्यात आली आहे. विशेष करून 'चिंतनशील' प्रश्न या संवादाने उभे केले आहेत. 'सदा' जेव्हा 'नाना'ला म्हणतो की, 'आरं असं काय बी केलं की हि लोक एैकत नाहीत. तुला येडयात काढतील. तुला भांडतील. नाही तर...तुला गोळया घालतील' तेव्हा सारं सभागृह आवक् होवून पाहात राहतं. वर्तमान काळात विवेकांवर होणारे हिंसक हल्ले अगदी मोजक्या शब्दात पण तितक्याचं ताकदीने संवादाच्या रूपाने मांडण्यात 'संवाद लेखक' यशस्वी झाला आहे. विज्ञानाचा प्रसार आणि प्रचार आजची भाषा वापरून करावा लागेल याचा विचार करून संवाद लिहिताना कथेत नसलेले 'सदा' हे पात्र जोडण्यात आले आहे. प्रभावी संवाद, गरज तेथे गंभीरपणा, हजरजबाबी विनोद अशा आशयप्रधान संवाद लेखनामुळे 'संवाद लेखक' ऋतिक रास्ते याचं करावं तेवढं कौतुक कमीचं आहे. संवाद लेखना बरोबरचं त्याने स्वता: 'सदा'ची भूमिका अधिक प्रभावीपणे साकारली आहे. हे विशेष आहे. 
           आजच्या काळात अंधश्रध्देच्या अनेक घटना ऐकायला नि पाहायला मिळत आहेत. विवेकवादाचे बळी घेतले जात आहेत. धार्मिक लढाया लढल्या जात आहेत. सोशल माध्यमांचा एक वापर अंधश्रध्देच्या प्रसारासाठी वापरला जात आहे. तर दुसरीकडे दहशतवाद, सोशल मिडीया, शेतकरी, मोर्चा, आंदोलने, पर्यावरण या विषयांवर मोठया प्रमाणावर एकांकिका सादर केल्या जात आहेत. अशा कठीण काळात विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी निवडलेली 'मरीआईचा गाडा' हि एकांकिका फारचं महत्वपूर्ण आहे. वर्तमान काळात त्याचीच आवश्यकता आहे. त्यामुळे हि एकांकिका सादर करणं तसं जिकीरीचं काम आहे. पण संघप्रमुख रोहित माने आणि त्याच्या टिमने ती हिंमत दाखवली. म्हणून त्याचं कौतुक करावंचं लागेलं.  वास्तववादी एकांकिकेला अस्सलता प्राप्त करून देण्यात दिग्दर्शक म्हणून रोहित माने यशस्वी झाला आहे. या टिममधल्या प्रत्येकाचं हे यश आहे. प्रत्येकाचं काम आणि भूमिका अत्यंत मोलाची आहे. सटवू नाना—संतोष मोरे, केरू तात्या—ऋषिकेश पारखी, म्हादबा—आशुतोष मोहिते, भाऊ बाबाजी—अक्षय बहिरट, नाना—रोहित माने, सदा—ऋतिक रास्ते, शांतक्का—अपर्णा बहिरट, म्हातारी—श्वेता गायकवाड, घाबरट बाई—मिताली कळमकर, गावकरी—अक्षद पाईवाल, गावकरी—अजिंक्य मारटकर, डॉक्टर—रशीद शेख, हलगी वादक—अनिकेत राक्षे यांच्या सोबतचं प्रकाश योजना—अनुराग दुबळे आणि संगीत—रेणुका मदने अशा सगळयांची 'भूमिका' प्रयोगाच्या यशस्वीतेला कारणीभूत ठरली आहे. 
                  हे यश सगळया कलाकाराचं जसं आहे अगदी तसचं हि एकांकिका सादर करताना कशी करायची याची 'विना मोबदला' तब्बल 29 दिवस दिवस—रात्र राबणा—या अशिष टिळक नावाच्या आवलियाचं सुध्दा आहे. सोबतचं अशिषला मदत करणा—या हितेश दिवाडकर, राहुल झेंडे आणि हरहुन्नरी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.महादेव रोकडे व इतर काही सहका—याचं ही योगदान नाकारता येत नाही.
               प्रयोग चांगला झाला नि आम्ही रात्री महाविदयालयात पोहचलो. सर्व कलाकार नि आम्ही म्हणजे हितेश, अशिष, संदीप, प्रशांत आणि राहूल होतो. कलाकारांनी प्रामाणिकपणे आपले अनुभव सांगितले. चुका मान्य केल्या. प्रत्यक्ष आत गेल्यावर काय वाटते. हे ही नमूद केले. उपस्थितांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. रात्री 11.35 ला आम्ही निघालो. पण माझ्या डोक्यात वारंवार 'सदा' नि 'नाना' हि पात्र येत होती. असे युवक गावोगावी व्हावेत असेही वाटत होते. 'सदा'ने सांगितले की, 'मी आयुष्यात पहिल्यादा मेकअप केला होता' बापरे किती मोठं स्पिरीट...हा विचार करत असतानाचं त्यानं दुसरं वाक्य फेकलं..'मी काही वेळ ब्ल्यान्ग झालो होतो' तेवढयात कुणी तरी सांगितलं 'आमची खाली भांडणं झाली होती', 'मी अपोआप थरथर कापत होतो', 'आमचं लाईटर बंद पडला होता', 'हयाने गाडग्याची दोरीचं जाळली होती त्यामुळे ते गाडगं धरल्यावर हात खूपचं गरम झाला होता', 'हा जातचं नव्हता मग मी हयाला जोरात लाथ मारली', 'हा हालगीचं वाजवत नव्हता', 'माझ्या टाळाचाचं आवाज जास्त येत होता', 'मी माझा डायलॉगचं विसरलो होतो', 'मरीआईच्या ठिकाणी मी मरीआळीचं बोलले', 'हे सगळेचं निघून गेले मग मी ही मरीआईचं दर्शन घेवून विंगेत पळाले' अशी वाक्य सतत आठवत राहिलो. कधी काळी आमचं ही असचं व्हायचं. आमचा उत्साह, आनंद, जोश, अनुभव, भांडणं याच प्रकारची असायची याची ही आठवण झाली...!! 
               .... तर मी सांगत होतो की, आम्ही घरी निघालो प्रशांत मला बोपोडी पर्यत सोबत होता. 'तो म्हणाला तुला काय वाटतंय? आपण टॉप नाईन ला असू का?' यावर मी प्रशांत प्रतिप्रश्न केला 'तुला काय वाटतंय? यावर तो विचारात पडला. पण मी माझं उत्तर देवून मोकळा झालो की, 'हे बघ प्रशांत संघप्रमुख या नात्याने मी किमान 160 एकांकिका बघितल्या आहेत. तर मला असं वाटतं की, यावेळी आपण 100 टक्के टॉप नाईनला असू. माझ्या उत्तरावर प्रशांत हसला नि पुढे निघून गेला. दुस—या दिवशी रोकडे सरांना हाच आत्मविश्वास 'फेसबुक'वर देवून बसलोय. कारण मी फार 'सकारात्मक' आहे. कदाचित प्रा.महादेव रोकडे सरांच्या 'डोन्ट वेरी बी पॉझिटिव्ह' या वाक्याचा माझ्यावर फारचं परिणाम महाविदयालयीन काळात झाला आहे. 
          कुणाला काहीही वाटत असो. सर्वानाचं मतं असतात. प्रत्येकाला थोडी फार तरी जाण असते. या न्यायाने मी या एकांकिकेकडे पाहातो आहे. त्यामुळे मला केवळ आत्मविश्वासचं नाही तर खात्री सुध्दा आहे की, या वर्षीच्या 'टॉप नाईन' आपली 'मरीआईचा गाडा' हि एकांकिका असणार आहे. हे सारं लिहित असताना संदीप आठवलेंचं वाक्य ही आठवत आहे की, 'आँँफ पिरीयड'च्या वेळेस सुध्दा आपली अशीचं चर्चा झाली होती. पण आपण 11 व्या क्रमांकावर राहिलो होतो. 
        प्रयोगा नंतर प्रत्येक जण आपली मतं नोंदवित आहेत. कुणी चांगलं तर कुणी वाईट म्हणत आहे. बाहेरची ही मंडळी उत्साहाने प्रतिक्रिया नोंदवित आहेत. पण मी वेगळया दृष्टिने या एकांकिकेकडे पाहतो आहे. उपनगराच्या मुलांनी वर्तमानाला उत्तर देण्यासाठी असा विषय निवडणं. परिणामकारक मांडणं. टिमवर्क दाखविणं हे माझ्यासाठी फार मोलाचं आहे. खरं तर हि एकांकिका लिहिणारे, करणारे युवक—युवती पंचविशीच्या आतबाहेरचे आहेत. पण त्यांनी नाटय माध्यमाची प्रकट केलेली जाण आणि विषयाला भिडण्याची त्यांची सचोटी चकीत करणारी होती. या युवा कलाकरांनी आपापल्या व्यक्तिरेखांचे घेतलेले टायमिंग, साधलेला संवाद, वाचिक आणि शारिरीक अभिनयतून दाखविलेल्या छोटया—मोठया जागांना निश्चितचं सलाम करावा लागेल...!
            येत्या 28 तारखेला प्राथमिक फेरी संपणार आहे. आणि त्याचं दिवशी रात्री 9.30 ला 'टॉप नाईन' एकांकिकाचा निकाला 'संगणकाद्वारे प्रसिध्द होणार आहे. त्यामध्ये 'मरीआईचा गाडा' हि एकांकिका असणार आहे. याची खात्री मला आहे. 'टॉप नाईन' मध्ये आल्यास आम्ही तुला 'खास पार्टी' देणार असे प्रा.महादेव रोकडे आणि प्रशांत दरोडे म्हणाले आहेत. तेव्हा त्या दोघांनी पार्टीची तयारी करावी असं त्यांना सांगावसं वाटतं आहे. म्हणून लागा तयारीला. शेवटी 'आव्वाज कुणाचा...टिजे कॉलेजचा'...!!

  सर्व कलाकारांना उद्देशून इतकचं की,

'रख हौसला वो मंजर भी आयेगा,
प्यासे के पास चलकर
समदर भी आयेगा।
थक कर न बैठ ये मंजिल के मुसाफिर
मंजिल भी मिलेगी
और मिलने का मजा भी आयेगा।।

 

©श्री.धनंजय मोहन झोंबाडे
   माजी विदयार्थी
  टि.ज.महाविदयालय.
  खडकी, पुणे.

 

आम्ही एकांकिका करणारचं... आणि बरचं काही..!

आम्ही एकांकिका करणारचं आणि बरचं काही....!!!
 

परवा आदरणीय प्रा.महादेव रोकडे सरांचा फोन आला होता. ते म्हणाले की, आपल्या कॉलेजची अण्णा भाउ साठेंच्या कथेवर आधारित 'मरीआईचा गाडा' हि एकांकिका भरत नाटय मंदिरला 19 आॅगस्टला सायंकाळी 5.00 वाजता होणार आहे. तुला यावचं लागेल..! सरांच्या आज्ञेला'होकार' दिला. आणि भूतकाळाचा विचार करू लागलो. सात—आठ वर्षापूर्वीचा 'पट'एकदम डोळयांसमोर उभा राहिला. गेल्या आठ वर्षात काय—काय घडलं असेल आमच्या सगळयांच्या आयुष्यात. नाटकाचं'वेड' मनात घेवून परिस्थितीला 'पराभूत'करायला निघालेली आमची दोस्त मंडळी आज काय करत असतील? अजूनही त्यांच्या डोक्यात 'नाटकचं' असेल काय?त्यामधले काही जण 'प्रयोगिक' आणि'व्यावसायिक' रंगभूमीवर आज सुध्दा 'तग'धरून असल्याचे समाधान वाटते आहे. एकांकिकेच्या त्या काळात मन रमलं. एक—एक घटना आज घडल्या सारखी समोर येत होती. विचार करत होतो की, आज काय अवस्था असेल नाटकवाल्या मंडळीची? अनुकूल वातावरण असेल का?पैसे मुबलक असतील का? कलाकार कसे असतील? पुन्हा—पुन्हा असा सगळा विचार करत होतो. त्याचं वेळेस रोकडे सरांचा पुन्हा 'मेसेज' आला. उदया 'रंगीत तालीम' आहे. तुला यायला जमेल का?त्यांना 'नाही' म्हणता आलं नाही. पण कामाचा व्याप म्हणून जाता ही आलं नाही. मग मात्र आम्हाला एकांकिका व नाटकाचं वेड लावणा—या 'हितेश दिवाडकर' या माणसाला फोन लावला.सवयीप्रमाणे 'तो' उचलला गेला नाही. पुन्हा केला पण पुन्हा ही उचलला गेला नाही. परंतु काही वेळाने 'त्यांचा'च फोन आला. मी मात्र फोन उचलला नि भरभरून बोललो. एकांकिके बद्दल विचारलं. जुन्या दोस्तांविषयी विचारलं. कॉलेजच्या नि एकांकिकेच्या अनेक गोष्टी ऐकून समाधान वाटलं. बदललेल्या काळात कॉलेजचा एकांकिका 'संघा'कडे पाहाण्याचा दृष्टिकोन सुध्दा 'अनुकूल'झाल्याचं हितेश सांगत होते. मला मात्र संकटांचा, अपु—या साधनांचा,नकारात्मक विचारांचा काळ आठवत होता....!!

 हितेशला तब्बल दिड—दोन वर्षांनी बोललो होतो. त्यांच्याकडूनचं अशिष टिळकचा नंबर घेतला. त्याला ही बोललो तब्बल तीन वर्षांनी. पण अशिष नेहमी सारखाचं विनोदी आणि गंभीर बोलला. 'प्रयोगा'ला या असं त्यानेही आग्रहाने सांगितलं आहे...त्याला ही 'हो'चं म्हणालोय...!!

    हे संगळ घडत असताना मला जुना काळ आठवत होता. 'आम्ही एकांकिका करणारचं' आणि 'शाहा—या'या दोन एकांकिकेच्या दरम्यान घडलेले सगळा प्रवास. जो प्रवास आयुष्याला ही एक वेगळं वळण देवून गेला. अनेक जीवाभावाचे मित्र जोडले गेले. सहकार्य,आदर, नम्रता, संयम, सकारात्मकता अशा अनेक गुणांचा विकास सुध्दा झाला. आनंद मिळाला. समाधान भेटलं. भांडण झाली. रूसवे—फुगवे झाले. अडचणी आल्या. अपमान झाले. पण सगळयांना पुरून उरेल असा दांडगा आत्मविश्वास'टिम'मध्ये होता. म्हणून चांगलं काही करू शकलो. कमी बजेट, मुलींनी काम करू नये अशी घरची मानसिकता, यांना काय कामचं नाही? असं म्हणणारा एक वर्ग. प्रॅक्टिसला जागा नाही. हिशोबनीसां कडून नेहमीचं अडवणूक? अगदी शिपाई सुध्दा हसायचे. पण अशा ही वातावरणात'उजेडाची स्वप्ने' घेवून आमच्यातला प्रत्येक जण पुढे जात होता. हे स्पिरीट फक्त आणि फक्त 'परिस्थिती'ने दिले होते. मात्र या ही वातावरणात तेव्हाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.शुभश्री काळे,प्रा.महादेव रोकडे, प्रा.प्रदिप जटाळ यांची तळमळ आजही प्रेरणा देते. सोबतचं प्रा.पी.बी.पुराणिक, प्रा.सीमा देशपांडे,प्रा.गौरीमाटेकर, प्रा.विनायक मोरे,ग्रंथपाल अरूण चव्हाण, लिपीक रामभाउ बारगजे, डामसे,  सेवक अंगद कानडे यांची झालेली मदत कधीचं विसरता येत नाही. प्रा.रोकडे सर तर 'बी पॉझिटिव्ह...डोन्टवेरी' असं म्हणून आत्मविश्वास दयायचे. महाविदयालयात उत्साह निर्माण व्हावा म्हणून आनंदाने'फलक लेखन' करायचे. प्रयोगाला यायचे. दिवस बदलतील याची हमी दयायचे....खरं तर एकांकिका, कला आणि कौशल्यां विषयी 'उपनगरात' जसा उत्साह नसतो तसाचं विचार'उपनगरातल्या महाविद्यालया' विषयी'आयोजकां'नी ही केलेला असतो. याची जाणीव पदोपदी होत असे. 'संघप्रमुख'म्हणून 'मिटींग'ला हजर झालो की हमखास याची प्रचिती येत असे. पण पोराचं स्पिरीट बघायचे नि रात्रीची मिटींग विसरून कामला लागायचो.

          तसं पाहिलं तर इतर महाविदयालयाकडे 'चेअरप' करायला तगडी टिम सज्ज असायची. पण आमच्याकडे बोटावर मोजता येतील इतकीचं स्नेही मंडळी. त्यामुळे आम्हाला'खालून' चेअरप मिळायचं नाही. खरं म्हणजे आम्ही एकांकिकेत काम करणा—या प्रत्येकाच्या मित्राने किंवा नातेवाईकाने तिकीट घेतलेले असायचे. फार—फार तर25 ते 30 तिकीटे खरेदी व्हायची. तिकीटांचा हिशोब घेवून 'भरत'ला गेलो तर गेटवर उभा असलेला 'वॉचमन' सुध्दा विचारायचा 'खडकी कॉलेज का?' मग मात्र निराशा वाटायची...पण करणार तरी काय?

   कॉलेज मधून 'प्रॉक्टिस'ला जागा मिळत नसायची. एकचं जिमखाना हॉल. तिथेही रोजचं एखादा कार्यक्रम असायचा. ज्या दिवशी हॉल मध्ये कार्यक्रम असायचा. त्या दिवशी तयारीचे तीनतेरा व्हायचे. मग अशिष, प्रशांत आणि हितेश ची धावपळ सुरू व्हायची. मग कधी लाल बहादूर शास्त्री विदयालयाचे प्रांगण, तर कधी बुध्द विहार, कधी राणी लक्ष्मीबाई उदयान, तर कधी ग्रंथालया समोरील मोकळी जागा. पण प्रॉक्टिस जोरदार व्हायची. अशा अवस्थेतून नाटकाची जास्तचं तळमळ असणारा 'राहूल झेंडे'एका माणसांशी कडाक्याचं भांडला होता. हे ही आज आठवत आहे.

    कॉलेज कडून अत्यंत कमी पैसे मिळायचे. त्यामध्ये सगळे बसवावे लागायचे. म्हणून कमी पैशात 'संगीत'करून मिळावे म्हणून मी, हितेश, अशिष आणि राहूल मुसळधार पावसात सुध्दा'गाडी नं 11' ने   अनेक 'स्टुडिओ'च्या पाय—या पालथ्या घालायचो. कमी बजेट आणि मुलांची मागणी जास्त त्यामुळे माझे आणि त्यांचे 'शीतयुध्द' सुध्दा होत असे. अनेकदा इच्छा असूनही मी पोरांना'वडापाव' शिवाय दुसरं काही खावू घालू शकलो नाही. त्याची 'खंत' आजही वाटत आहे. अशिषची इच्छा ब—याच वेळा'नॉनव्हेज'ची असायची. अशा वेळी मी प्रशांत आणि स्वप्निल ला पाठवून गरमागरम वडापाव मागवायचो. त्या गरमागरम वडापावमुळे अशिष ही'नॉनव्हेज' विसरून जायचा.
                        
                          सादरीकरण करताना'टिमवर्क' गरजेचे असते. सर्वांनी वेळेवर यावं. गंभीरपणे घ्यावं. या हेतून मी अनेकांवर 'रागवायचो' नंतर लगेच प्रेमाने बोलायचो. आणि एकत्र  येवून एकांकिकेचा विचार करायचो.
त्याचा परिणाम होवून आमचं 'आम्ही एकांकिका करणारचं' चा प्रयोग बराच गाजला. अपेक्षेप्रमाणे अशिषला'अभिनया'चं पारितोषिक मिळाले. नितीन चंदनशिवेची भूमिका विशेष गाजली. अर्थात 'टिमवर्क'चं ते यश होतं. यामध्ये हितेश दिवाडकरांच दिग्दर्शन, राहूल झेंडेचं संगीत, रोहित ढोरेची लाईटस आणि मंगेश कांबळेंच नैपथ्य या सगळया गोष्टी जुळून आल्या होत्या.

         नंतर 'शाहा—या' करताना इतक्या अडचणी आल्या नाहीत. टिम चांगली मिळाली. नव्याने काही मंडळी सहभागी झाली होती. त्यामुळे शाहा—या करताना अनेक गोष्टी सोप्या झाल्या. पण प्रॉक्टिसला जागा 'न' मिळणं तेव्हा ही कायम होतं. स्र्किप्ट सगळयांना पाठ झाली होती. कमी बजेट असल्यामुळे स्वत:चे दोन पैसे घालून किंवा घरची साधने वापरून खर्च कमी करण्यास मदत करू शकणारा पोरगा 'बॅकस्टेज' साठी शोधत होतो. अशातचं वर्गमित्र मंगेश कांबळे भेटला. त्याला 'बॅकस्टेज' प्रमुख करून मोकळा झालो. ज्या हेतून मंगेशला पुढे केलं होतं. तो त्याने पूर्ण ही केला. मंगेश खरं तर फार शांत माणूस, प्रेमळ मित्र, संवेदनशील विदयार्थी, माणुसकी जपणारा तरूण. मंगेश घरून पाच—पाच पोरांचा डब्बा घेवून यायचा. घरी चारचाकी वापरून कामे सोपी करून दयायचा. पदरमोड करून गाडीत 'प्रेट्रोल' टाकून मिटींग व इतर व्यवस्थापनाच्या कामासाठी हजर असायचा. त्यामुळे खूप काही कामे बिना पैशाचीच व्हायची. म्हणून कधी—कधी स्वत:चीचं पाठ 'थोपवून' घ्यायचो की मंगेशला पुढे करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि त्याचा फायदा झाला.
       टिम मधल्या एका—एका पोरांविषयी असंख्य आठवणी आहेत. प्रशांत दरोडे चांगला गुणी कलाकार. पण त्याला टिममध्ये घेण्याचा हेतू की त्याच्याकडे गाडी आहे. आणि फोन सुध्दा....आजच्या सारखं 'जिओ' तेव्हा नव्हतं. त्यामुळे आमच्या टिमसाठी'अनलिमिटेड संवाद साधण्यासाठी मोबाईल देणारा' प्रशांतचं आमचा 'जिओ'किंवा 'फोरजी' झालचं तर 'मुकेश अंबानी'होता....!!
        'शाहा—या'च्या वेळेस आम्ही एक गोष्ट केली होती की, मी आणि मंगेश व चंदनने एन.एस.एसच्या मित्रांना'चेअरप'साठी येण्याची विनंती केली होती. त्याला प्रतिसाद देवून अनेक मित्रमंडळी'शाहा—या' बघायला आली होती. आम्ही'बॅल्कआवूट' मध्ये सेट उभारत होतो नि खाली'आव्वाजकुणाचा.....टिजे..टिजे...टिजे...हिप..हिप..हुर्रे..अशा घोषणांनी 'भरत'दणाणून गेलं होतं. दुसरं म्हणजे आमची तळमळ बघून महाविदयालयाने प्रत्येकी130 रूपये व आम्ही प्रत्येकी 100 रूपये घालून पुढे कॉलेजचे नाव असणारे 'टि शर्टस' छापून घेतले होते. त्यावर मी आणि काळे मॅडमने विचार करून 'विस्तारणारी क्षितीजे...उंचावणा—या आशा...असे आम्ही टिजेन्स' असा संदेश पाठीमागे टाकून घेतला होता. त्यामुळे ही टिम मध्ये उत्साह होता..!!
          टिम मध्ये असणा—या प्रत्येकाच्या असंख्य आठवणी आहेत. प्रत्येकाने दिलेला आदर, सन्मान आज ही स्मरणात आहे. अशिष टिळक, हितेश दिवाडकर, नितीन चंदनशिवे, प्रशांत दरोडे,विशाखा भालेराव, राहूल झेंडे, आनंद शिंदे, तुषार निघोजकर, विशाल देवकुळे,प्रिया चव्हाण, वाजेद बेग, स्वप्निल, सागर जावळे,  क्षितीजा सावंत, संदीप आठवले,मयुर गजरमल, अमोल कांबळे, अश्विनी पाटोळे, अफरीन पठाण, रोहित ढेरे, प्रेम सोनवणे, मंगेश कांबळे, आरती नरळे अशी खूप मोठी मित्र मंडळी नाटकाच्या माध्यमातून जोडली गेली होती.'संघप्रमुख' असल्या कारणाने अनेकांवर रागवावे लागत असे. पण मनात कोणतीचं'कटुता' नव्हती हे मात्र नक्की..!!
  मागे वळून पाहाताना 'तो'काळ फारचं कठीण वाटतोय. पण आज निर्माण झालेली सकारात्मक खूपचं बळ देणारी आहे. महाविदयालयात तयार झालेलं 'अनुकूल' वातावरण हि चांगली बाब आहे. अशिष सांगत होता की,महाविदयालयातील प्रत्येकाचा एकांकिका संघाकडे बघण्याचा दृष्टिकोन फारचं बदलला आहे. आता सगळे नाटकची आस्थेनं चौकशी करतात. मला व हितेशला 'सन्मानाने' बोलवलं जातं. प्रा.महादेव रोकडे सर 'सांस्कृतिक विभागप्रमुख' झाल्या पासून त्यांनी वातावरण बदलायला खूपचं प्रयत्न केले आहेत. आता ग्रंथालयाच्या समोर नाटकाच्या 'प्रॅक्ट्रिीस'साठी स्वतंत्र 'हॉल'आहे. सगळं कसं छान आहे....अशिष फोनवर सांगत होता..नि मला फार आनंद होत होता..तेव्हा मला प्रा.महादेव रोकडे सरांच वाक्य आठवयला लागलं की, हे दिवस जातील..दिवस काही घर बांधून राहत नसतो...!
             सामाजिक समतेची चळवळ पुढे घेवून जाणा—या साहित्यिकांमध्ये अण्णा भाउचां समावेश होतो. त्यांची'मरीआईचा गाडा' हि कथा विज्ञानवादाचा पुरस्कर करते. त्यातील 'नाना' नावाचे पात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात अंधश्रध्दा बाळगणाऱ्यांना 'चपराक' देतो. त्या दृष्टिकोनातून हि एकांकिका फारचं महत्वाची आहे. याची जाणीव 'परीक्षक'आयोजक आणि प्रेक्षकांना झाल्याशिवाय राहाणार नाही. असा आशावाद वाटतो आहे. बाकी विजय आणि पराजयात न पडता हि एकांकिका 'टॉप नउ' मध्ये येईल यात कोणतीचं शंका नाही...!!
         आता थोडं आताच्या नव्या'संघासाठी' की आपण एकजुटीनं राहा. ऐकमेकांविषयी आदर ठेवा. सकारात्मक राहा. 19 तारखेच्या प्रयोगाला भेटूचं. पुन्हा एकदा एकांकिका प्रयोगाला मनपूर्वक शुभेच्छा....!! तुम्हा सर्वांना चेअरप करण्यासाठी आम्ही सगळे येत आहोत.....
आव्वाजकुणाचा....टिजे....टिजे...टिजे...टिजे...टिजे...टिजे....!!
साहीर सुधीर लुधीयानवी लिहितो की,

 कौन कहता है की
आसमान में छेद नहीं होता
एक पत्थर तो 'तबीयत' से उचालो यारो...!!

 

 धनंजय झोंबाडे   
 माजी विदयार्थी 
टिकाराम जगन्नाथ महाविदयालय
खडकी, पुणे.

माणूसचं मोठा हाय की.....

*माणूसचं मोठा हाय की.....!!!* 
----------------------------------------

संगमवाडी बसस्टॉप जवळ बराच वेळ उभा होतो. काही अंतरावर नदी असल्यामुळे कडाक्याची थंडी जाणवत होती. तेवढयात बस आली. विश्रांतवाडी-कोथरुड बसमध्ये चढलो. बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. बहुसंख्य महिलाच होत्या. वाहकाला सुट्टे पैसे दिले. त्याने दिलेले तिकीट घेऊन सीटवरती बसलो. बसमध्ये सर्वत्र नजर टाकली. तर २२ ते २५ महिलांची जोरजोरात चर्चा चालू होती. सगळे प्रवाशी 'त्यांच्या'कडे पाहत होते. इतरांना त्यांची भाषा कळत नव्हती. पण त्यांच्या भाषेवरुन त्या 'पारधी' समाजाच्या असल्याचं कळलं. आपण बसमध्ये आहोत याचा विसर पडलेल्या 'त्या' महिला मोठ-मोठ्याने ओरडून बोलत होत्या. जणू स्वातंत्र्याचं सुख त्या उपभोगत होत्या. मात्र बसमधील इतर प्रवाशी त्यांच्याकडे किळसवाण्या नजरेने बघत होते. गावढंळ, मुर्ख, भिकारी, नालायक यांना काय कळतंय की नाही? अशा शब्दात त्यांचा 'तिरस्कार' प्रवाशी करत होते. याचं भान त्या महिलांना नव्हतं. कारण 'सभ्यते'च्या व 'धर्मनिरपेक्षते'च्या गप्पा मारुन स्व:ताला सुशिक्षित म्हणवणाऱ्यांच्या जगापासून त्या खूपचं लांब होत्या.
स्वतंत्र भारताच्या वर्गवारीनुसार भटक्या विमुक्त या गोंडस नावाखाली प्रगतीपासून कोसो दूर असणारी ही जमात. इथल्या पोलिसगिरीनं 'गुन्हेगार' ठरवलेली ही जमात. पण मातृसत्ताक पध्दती स्विकारुन सामाजिक 'समता' जपणारी ही जमात.
सभ्य, 'सुसंस्कृत' आणि सुशिक्षित समाज त्यांच्याकडे 'माणूस' म्हणून बघतचं नाही.
 बस सुसाट सुटली होती. त्यांच्या गप्पाही रंगात आल्या होत्या. प्रवाशांचा जोरही वाढला होता. बसमध्ये मागच्या बाजूला बसलेली एक महिला सर्वांना बोलत होती. 'ती'च्या बोलण्याला सगळयाजनी गंभीर घेत होत्या. त्यामुळे ती मागे बसलेली महिला त्यांची मुखिया वाटत होती. अन तेवढयात 'मुखिया' असणा-या महिलेचा मोबाईल वाजला.....'दिल में मेरे हैं दर्दे डिस्को.... दर्दे डिस्को'.... या 'रिंगटोन्स'ने बसमध्ये शांतता पसरली. तेव्हा फोन न घेता त्या महिलेने माझ्याकडे वळून पाहिलं....आणि विचारलं आपुण कुठं हाय? साहेब. मी लगेचच शिवाजीनगर म्हणालो. तीने फोनवरती शिवाजीनगर असं सांगितलं. आणि फोन बंद केला. पुन्हा ती महिला गप्पात रंगली....बस संचेतीच्या सिग्नला थांबली. पुन्हा त्या महिलेचा फोन वाजला...तीने फोन घेतला. हॅलो...आमी शिवाजीनगरला हाय...आॅ...कोथरूड बस हाय...मग काय करू...कुठं...जिजाई गारडनं...वारजे माळवाडी...बरं हाय...!!
पलीकडून संवाद साधणा-या व्यक्तीच्या प्रश्नांना ती गंभीरपणे उत्तरे देत होती. इतर महिला तीच्याकडे आशेनं बघत होत्या. पुन्हा एकदा तीनं फोन ठेवला.
'त्या' फोनवर झालेल्या संभाषणांने माझ्या लक्षात आलं की, या सगळया महिला कुठल्यातरी मंगल कार्यालयात 'स्वयंपाक' करण्यासाठी जात आहेत. पण पलिकडच्या फोनवरील महिलेनं वारजे माळवाडी सांगितल्यानं त्या गोंधळात पडल्या. त्यांनी इतर प्रवाशांना जिजाई गार्डन वारजे माळवाडी असं विचारल्यावर सगळेचं हसायला लागले. त्यांनी आशेने 'वाहकां'कडे बघितले पण तोही मोठमोठयाने हसत होता. त्या महिला गोंधळून गेल्या. पण तेवढयात उतरण्यासाठी पुढच्या दारात गेलेला 'एक तरूण' मागे वळाला. त्याने त्या महिलांना  सांगितलं. घाबरू नका. माझ्या बरोबर मनपा ला उतरा. तिथून मी तुम्हाला वारजे माळवाडीला बसवतो. तरूणाच्या बोलल्याने त्या सुखावल्या. काही वेळात मनपा स्टाॅप आला. त्या महिलाही गडबडीने उतरल्या. आणि मी सुध्दा उतरलो. त्या तरूणाला त्यांनी विचारलं बस कुठं हाय? आता येईल. असं तोही म्हणाला. दोन-चार मिनीटांनी बस आली. वारजे माळवाडी बसमध्ये त्या तरूणांने सर्व महिलांनी बसवलं. बस निघाली... त्या मुखिया असणा-या महिलेनं त्याला हात उंचावून धन्यवाद दिले. आणि त्या निघून गेल्या.....!
थोडया वेळानं 'आकुर्डी रेल्वे स्टेशन' बस आली. मी बसमध्ये चढलो. तेवढयात तो तरूण हि बसमध्ये आला. बस सुरू झाली. मी त्याला विचारलं कुठं जायचंय? तो म्हणाला शिवाजीनगरला. मला आश्चर्य वाटलं. म्हणून मी त्याला म्हणालो..."अगोदरच्याचं बसने शिवाजीनगरला का उतरला नाहीस?"... उतरलो असतो तर 'त्या महिलांना' वारजे माळवाडीला कुणी बसवलं असतं. खरंतर मी मगाशीचं उतरणार होतो. पण सगळे प्रवासी त्या महिलांकडे बघून हसायला लागले. म्हणून मी उतरलो नाही. सरळ मनपाला आलो. 
मी म्हणालो पण तुझा वेळ गेला? तो म्हणाला त्या 22 ते 25 महिलांचा वेळ जर माझ्यामुळे वाचला असेल तर माझा वेळ गेलाचं कुठे? त्याला काय तरी बोलावं म्हणून उगीचंच म्हणालो पण तुला पुन्हा तिकीट काढून शिवाजीनगरला जावं लागणारं? किमान 5 रूपायांचा तरी तोटा होणार? माझ्या प्रश्नांवर तो खळखळून हसला. आणि म्हणाला. त्या महिलांच्या आनंदातचं माझे पैसे वसूल झाले. आणि मगाशी त्या महिलेनं गर्दीत हात उंचावून मला 'निरोप' दिला. त्यातचं मी खूप काही मिळवलं. मी म्हणालो तुझं शिक्षण किती? तो म्हणाला घरची गरीबी असल्यामुळे जास्त शिकता आलं नाही. 5 वी पास आहे. पण लिहिता वाचता येतं चांगलं. मला अप्रुप वाटलं म्हणून विचारलं, त्या महिलांना तु ओळखत होतास काय? तर तो म्हणाला 'वळक- पाळक' नाही. पण माणसाला ओळख लागतेचं कशाला. शेवटी...माणूसचं मोठा हाय की... मी म्हणालो काय करतोस? त्यानं सांगितलं. सिक्युरिटी गार्ड.... तेवढयात शिवाजीनगर स्टाॅप आला. तो गडबडीनं उतरू लागला. मी ओरडून विचारलं? तुझं नाव काय? सुरेश कांबळे असं सांगून तो उतरला. 
मी त्यांच्या पाठमो-या शरीराकडे बघत होतो. इतक्यात बस निघाली. थंड वा-याची झुळूक कानावरती पडली. आणि मी विचारात पडलो.
स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही आम्ही माणूस स्विकारला नाही. 'पारधी' समूहाला मान प्रतिष्ठा का देवू नये. मोठमोठया स्टेजवरून समतेचा, एकात्मतेचा घोष करणारे प्रवाशी सौजन्यशील का नाहीत? पदव्या न घेतलेला पण माणुसकीच्या शाळेत शिकलेल्या त्या तरूणाला संस्कारशील का म्हणू नये? 
विद्येच्या माहेरघरात संस्कतीचा ठेंभा मिरवणा-यांकडून त्या महिलांना 'सन्मान' का मिळू नये? शेवटी... 'माणूसचं मोठा हाय की?' असं म्हणणा-या त्या तरूणांला सर्व अर्थानं 'माणुसकी' कळली, असं म्हणता येणार नाही का?
मंगळावर स्वारी करणारा, संत महात्म्यांचा, शांतीचा पुरस्कर्ता, विविधतेत एकता असणारा, गुण्या गोंविदाने नांदणारा, सुजलाम सुफलाम असणारा, जागतिक महासत्ता होवू पाहाणारा, सोने की चिडीयाॅं असणारा, म.गांधी, विवेकानंद, डाॅ.आंबेडकरांचा असणारा, क्रांतीचा, शौर्याचा, त्यागाचा असा हा भारत देश. असं वर्णन शालेय पासून विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत सगळीकडेच दिसतं. पण हा भूतकाळ आहे. हे आता नव्यानं शिक्षण व्यवस्थेत रूजवलं पाहिजे. कारण माणसाला माणुसकीची वागणूक न देणारा समाज आणि देश समानता व एकात्मतेकडे कधीचं वाटचाल करू शकत नाहीत. हाच जगाचा इतिहास आहे. पण त्या तरूणानं निर्माण केलेलं आशादायी चित्र उद्याच्या भारताचं आहे. हे मात्र नक्की! त्याचा कृतीशील विचार किती जण करणार? हा सुध्दा संशोधनाचा विषय आहे. परस्थिती काहीही असो. मात्र दुस-याच्या सुखात आपलं सुख शोधणा-या 'त्या' तरूणांचा विचार ऐकून मलाही वाटलं...शेवटी.. माणूसचं मोठा हाय की... 
सोशल नेटवर्कीगमुळे जग जवळ आलं आहे. असे म्हणून परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या 'वाझंट बाजारू कमेंन्टस फेसबुक' आणि 'व्हाॅटसप'वर करणा-या किती जणांना त्या तरूणांमुळे जाग येईल? माहित नाही? का हा हि प्रसंग फक्त आणि फक्त...लाईक, गुड, व्हेरी गुड, थँक्यू याच शब्दात अडकेल? याचीही भीती मला वाटत होती. तेवढयात 'गोलमार्केट' आल्याचं वाहकानं सांगितलं. मी लगबगीने बसमधून उतरलो. त्याच विचारात रस्ता ओलांडला. रूमकडे निघालो. पण माझ्या मनात विचाराचं 'चक्र' तयार झालं होतं. त्या महिला वारजे माळवाडीला पोहचल्या असतील काय? त्यांना जिजाई गार्डन सापडलं असेल का? त्या तरूणाला कामावर जायला उशीर तर झाला नसेल ना? अशा एक ना अनेक प्रश्नांनी भेदक जाळं तयार केलं होतं. मात्र हे विश्वची माझे घर असं ज्ञानेश्वरी लिहून सांगणा-या ज्ञानदेवांच्या 'ज्ञानेश्वरी'चा अर्थ एकाचं वाक्यात सांगणा-या त्या तरूणाचा चेहरा मला तसाच स्पष्ट दिसत होता. म्हणूनचं इतरांना सांगावं म्हणून भराभरा लिहूलं 
शेवटी... 
माणूसचं मोठा हाय की...!!!!

 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

©️ धनंजय मोहन झोंबाडे.
हिंदी विभाग.
सावित्रीबाई फुले विदयापीठ, पुणे.
.....................................