रविवार, 13 जून 2021

मनातलं काही....


 निकाल हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. आयुष्यातल्या अनेक सकारात्मक घडामोडी या निकालाशी निगडीत असतात. त्यात उद्या पाच राज्यांचा निकाल आहे. तर असो, पण... मी आपल्या निकाला विषयी बोलतोय. अर्थात सर्वस्पर्शी फाउंडेशनच्या भाषण (वक्तृत्व) स्पर्धेच्या निकाला विषयी....
तर आज स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे. त्यात विजेते ठरतील. मात्र माझ्यासाठी तर सहभागी सगळेचं स्पर्धेक विजेते आहेत. अगदी 53 च्या 53. हो गुजरातचा स्पर्धेक सुध्दा विजेताचं आहे....
त्यामुळे मी सहभागी सर्व स्पर्धेकांचं *मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो. कोरोनाच्या महामारीत अवघं जग सापडलं आहे. देवळां पासून ते शाळांपर्यंत टाळेबंदी करण्याची वेळ आपणांवर आली आहे. त्यामुळे पुस्तक-पाटीपासून मुलं दूर जाताहेत. आँनलाईन शिक्षणाच्या नावाखाली 'पुढचं पाठ मागचं सपाट' असं चित्र तयार झालंय. कधी नव्हे ती इतकी मोकळीक मुलांना मिळालीय. म्हणूनचं ते सगळेचं छंद जोपासताहेत. डोरोमँन ते पोकोमँन यांची मुलांसोबत चांगलीचं गट्टी जमलीय. जोडीला सापसीडी, लुडो, पब्जी, थ्री फायर, झोंबी, कार पार्किंग अशी भलीमोठी लिस्ट आहे. असं हे वातावरण तयार होत असल्याचं काळात सर्वस्पर्शी फाउंडेशन या सामाजिक संस्थेनं एक अभूतपूर्व उपक्रम आयोजित करून तो यशस्वी सुध्दा केला. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजू पोखर्णीकर, उपाध्यक्ष गुरूवर्य प्रा.डॉ.महदेव रोकडे, सचिव गुरूबंधु प्रा.समिंदर घोक्षे यांच्यासह राबलेल्या प्रत्येक हातांचे मनापासून आभार....
कोरोना काळ लक्षात घेवून मुलांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी हा शब्दपंढरीचा यज्ञ (वक्तृत्व स्पर्धा) आयोजित करण्यात आला होता. त्यात वैखारीचे अनेक वारकरी आनंदाने सहभागी झाले. त्या वारकऱ्यांनी प्रगल्भ शब्दांच्या समिधा वाहिल्या. त्या वारकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचा आजचा दिवस. शिवखेरा म्हणतो की, आयुष्यात विजय होईल किंवा पराजय पण पाऊल पुढं टाकण्यात खरा विजय दडलेला असतो, हा विचार सहभागी चिमुकल्यांनी व त्याच्या आई-वडीलांनी लक्षात घ्यावा. आपल्या खूपचं छान प्रयत्न केलेत. मी स्वतः काही व्हिडीओ पाहिलेत. परंतु जय-पराजयाचे काही निकष असतात. सुरूवात, हावभाव, स्पष्टीकरण, सभाधीटपणा, आत्मविश्वास, उच्चारणं, मांडणी, शेवट असे काही मापदंड असतात. त्यात कमी जास्त प्रमाण असते. त्यामुळे काही विजेते ठरत असतात. पंरतु त्यामुळे नाउमेद व्हायचे नसते. हरायचे नसते. खचून जायचे नसते. तर कविवर्य भटांच्या शब्दांत...
 'प्रत्येक वादळ पेलवीन मी
 माझ्यात आत्मविश्वास आहे,
 पायाखाली जमिन...
 पाठीवरती आभाळ आहे,
 जाऊन सांगा त्या वादळांना 
 आता माझ्याशी गाठ आहे...
असे आव्हान द्यायचे असते. निर्धारपूर्वक लढा द्यायचा असतो. कारण लक्षात ठेवा, अपयश दु:ख पचविल्या शिवाय यशाची चव चाखता येत नाही.चार्ली चँपलिनची 39 नाटके फेल गेल्या नंतरचं 40 वे नाटक गाजले होते. त्यामुळे खिलाडूव्रत्तीने विजेत्यांचे अभिनंदन करूया. जिंकण आणि हरणं हा केवळ तीन अक्षरांचा खेळ आहे. मात्र यातूनचं आयुष्याला कलाटणी मिळत असते. परंतु जिंकलेल्यांनी सुध्दा विवेकी राहायला हवं. अगदी जमिनीवर. कारण हरलेले होते म्हणूनचं तुमच्या जिंकण्याला अर्थ आहे. त्यामुळे सहभागी सर्वाचेचं मनपूर्वक अभिनंदन...
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक दिवा ज्ञानाचा - एक दिवा संविधानाचा होय. या दोन्ही महापुरूषांच्या जंयती दिनानिमित्त आपणाला आपले विचार प्रकट करण्याची संधी मिळालीय यातचं तुम्ही जिंकलात....!!!
सगळेजण स्पर्धेचा आनंद घ्या. लहानपणी मी सुध्दा राजर्षी शाहू महाराज जंयती च्या वेळी एका स्पर्धेत बोललो होतो. बक्षिस मिळालं नव्हतं पण दांडगा आत्मविश्वास मिळाला होता. पुन्हा सातत्याने बोलत राहिलो. कधी जिंकलो तर कधी हरलो. हजारो स्पर्धा केल्या. कधी राज्यात तर कधी राज्या बाहेर. हजारो जिंकल्या शेकडो हरल्या. मात्र प्रत्येक वेळी नव्याने सुरूवात केली. पण त्यातून बरचं काही शिकता आलं. चांद्या पासून ते बांद्यापर्यंत मित्र परिवार मिळाले. नावं झालं. कौतुक झालं. पण नेहमी जमिनीवर राहिलो. निकालाचा आदर केला. संयोजक आणि परीक्षक यांच्याशी कधीचं वाद घातला नाही. नेहमी सकारात्मक राहिलोय....
आज महाराष्ट्रभर व्याख्यानं करतोय. नामांकित स्पर्धांना परीक्षक बसतोय पण सारं काही पारदर्शक. हे सारं आदरणीय गुरूवर्य प्रा.डॉ.महादेव रोकडे यांच्यामुळे शक्य झालं. अनेकवेळा खिशात पैसे नसतानाही काँलेजचे पत्र आणि शर्टच्या वरच्या खिशात पैसे टाकून सरांनी महाराष्ट्राभर स्पर्धांना पाठविले. मी स्पर्धा जिंकल्यांचा आनंद माझ्यापेक्षा सरांनाचं अधिक व्हायचा. जिंकून काँलेजला पोहचण्यापूर्वी सरांनी त्यांच्या वळणदार अक्षरात अख्खा फळा रंगविलेला असो. त्यातं माझं टोपलंभर कौतुक. त्यामुळे काळीज सुपाएवढं मोठ्ठं व्हायचं....
हे सगळं कौतुक म्हणून लिहित नाही तर... निकाल काय असतो. किंवा त्यांची उत्सुकता काय असते, हे मला चागलंचं ठावूक आहे. निकालाच्या उत्सुकेतेपोटी आम्ही मान्यवर पाहुण्यांची (बक्षीस वितरणाची) भाषणं टाळ्यांनी अगदी हानून पाडलीत. तरीही सांगतोय की, सहभागी सर्वचं स्पर्धेक विजेतेचं आहेत.... 
स्पर्धेला परिक्षक म्हणून बसल्यावर खूप काळजी घ्यावी लागते. स्पर्धेकांच्या शंका- कुशंका आणि प्रश्नांना स्पष्टीकरणासह उत्तरे द्यावी लागतात. निकाल पारदर्शक लावावे लागतात. तरीही काहीचं समाधान होत नाही. त्याचं वाईटही वाटतं.... 
लाँकडाऊनच्या काळात असाचं काही स्पर्धांना संयोजकांच्या विनंतीवरून परिक्षक झालो होतो. व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहून निकाल लावले. शाळकरी मुलांची भाषणं ऐकून आनंदही वाटला. पण निकाला नंतर वाईट प्रतिक्रिया अनुभवयास मिळाल्या. कोणत्याही पालकांचं (आई-वडीलाचं) आपल्या मुलावर-मुलीवर खूपचं प्रेम असतं. खूपचं कौतुक असतं. त्यातून माझा मुलगा किंवा मुलगी म्हणजेचं ग्रेट. दुसरं कुणी त्याच्या सारखं नाहीचं, हि भावना वाढते. त्यातूनचं काही पालकांनी चुकीचा विचार केला. संयोजकाच्या जवळच्यांना बक्षिसं दिलीत. पाहुण्यांना नंबर दिलेत. ओळखीच्यांना प्राधान्य दिलंय. गावातले जपलेत. शेजाऱ्यांना झुकतं माप दिलंय. पालकांच्या ओळखीमुळे मुलाला बक्षीस दिलंय. असो अशा किती तरी प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातून निरपेक्षपणे स्पर्धा आयोजित करणाऱ्या संयोजकांचे मनोबल खचते. त्यांना वाईट वाटते. दु:ख होतंं. याचा विचार पालकांनी करायला हवा. मुलं खिलाडू असतात पण काही पालक त्यांना स्पर्धेक करतात. त्यांच्या आडून नाहक प्रश्न उभे करतात. ज्यामुळे परिक्षक ही दुखावले जातात. पण लक्षात ठेवा, परिक्षक सुद्धा एक माणूस आहे. त्यालाही भावभावना आहेत. त्यालाही परिवार आहे. त्यालाही मुलं, पुतणे, भाचे आहेत. तो तुमच्या मुलांवर अन्याय कशाला करेल??? 
असो, या सगळ्यांचा विचार करून आजच्या निकालाचा आनंद घ्या. मुलांना आणखी तयारी करायला लावा. पहिल्यादाचं भाषणं केलेल्या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाका. मुलांना वाचण्यासाठी चांगली पुस्तके द्या. दुसऱ्यांच्या मुलांचेही कौतुक करूया..... सर्व स्पर्धेकांचे मनपूर्वक अभिनंदन करूया....
 आदरणीय गुरूवर्य प्रा.डॉ. महादेव रोकडे सर यांनी 2008 साली त्यांचा 'थोडं ऊन थोडी सावली' हा कविता संग्रह भेट दिला होता. त्यातल्या कविता अनेक स्पर्धांमधून मी महाराष्ट्राभर मांडल्यात. त्यामुळे माझ्या मनातला 'ऊन-सावली' चा कवडसा या स्पर्धेच्या निमित्ताने मांडलाय. आपण तो गोड मानून घ्यावा...
 सर्वांना महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा....
शेवटी बाबा आमटेंच्या शब्दांत  इतकचं की, 
 श्रंखला पायी असू दे
 मी गतीचे गीत गाई,
 दुःख उधळावयास आता
 आसवांना वेळ नाही....

©️ धनंजय झोंबाडे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें