रविवार, 13 जून 2021

मनातलं काही....


 निकाल हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. आयुष्यातल्या अनेक सकारात्मक घडामोडी या निकालाशी निगडीत असतात. त्यात उद्या पाच राज्यांचा निकाल आहे. तर असो, पण... मी आपल्या निकाला विषयी बोलतोय. अर्थात सर्वस्पर्शी फाउंडेशनच्या भाषण (वक्तृत्व) स्पर्धेच्या निकाला विषयी....
तर आज स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे. त्यात विजेते ठरतील. मात्र माझ्यासाठी तर सहभागी सगळेचं स्पर्धेक विजेते आहेत. अगदी 53 च्या 53. हो गुजरातचा स्पर्धेक सुध्दा विजेताचं आहे....
त्यामुळे मी सहभागी सर्व स्पर्धेकांचं *मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो. कोरोनाच्या महामारीत अवघं जग सापडलं आहे. देवळां पासून ते शाळांपर्यंत टाळेबंदी करण्याची वेळ आपणांवर आली आहे. त्यामुळे पुस्तक-पाटीपासून मुलं दूर जाताहेत. आँनलाईन शिक्षणाच्या नावाखाली 'पुढचं पाठ मागचं सपाट' असं चित्र तयार झालंय. कधी नव्हे ती इतकी मोकळीक मुलांना मिळालीय. म्हणूनचं ते सगळेचं छंद जोपासताहेत. डोरोमँन ते पोकोमँन यांची मुलांसोबत चांगलीचं गट्टी जमलीय. जोडीला सापसीडी, लुडो, पब्जी, थ्री फायर, झोंबी, कार पार्किंग अशी भलीमोठी लिस्ट आहे. असं हे वातावरण तयार होत असल्याचं काळात सर्वस्पर्शी फाउंडेशन या सामाजिक संस्थेनं एक अभूतपूर्व उपक्रम आयोजित करून तो यशस्वी सुध्दा केला. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजू पोखर्णीकर, उपाध्यक्ष गुरूवर्य प्रा.डॉ.महदेव रोकडे, सचिव गुरूबंधु प्रा.समिंदर घोक्षे यांच्यासह राबलेल्या प्रत्येक हातांचे मनापासून आभार....
कोरोना काळ लक्षात घेवून मुलांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी हा शब्दपंढरीचा यज्ञ (वक्तृत्व स्पर्धा) आयोजित करण्यात आला होता. त्यात वैखारीचे अनेक वारकरी आनंदाने सहभागी झाले. त्या वारकऱ्यांनी प्रगल्भ शब्दांच्या समिधा वाहिल्या. त्या वारकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचा आजचा दिवस. शिवखेरा म्हणतो की, आयुष्यात विजय होईल किंवा पराजय पण पाऊल पुढं टाकण्यात खरा विजय दडलेला असतो, हा विचार सहभागी चिमुकल्यांनी व त्याच्या आई-वडीलांनी लक्षात घ्यावा. आपल्या खूपचं छान प्रयत्न केलेत. मी स्वतः काही व्हिडीओ पाहिलेत. परंतु जय-पराजयाचे काही निकष असतात. सुरूवात, हावभाव, स्पष्टीकरण, सभाधीटपणा, आत्मविश्वास, उच्चारणं, मांडणी, शेवट असे काही मापदंड असतात. त्यात कमी जास्त प्रमाण असते. त्यामुळे काही विजेते ठरत असतात. पंरतु त्यामुळे नाउमेद व्हायचे नसते. हरायचे नसते. खचून जायचे नसते. तर कविवर्य भटांच्या शब्दांत...
 'प्रत्येक वादळ पेलवीन मी
 माझ्यात आत्मविश्वास आहे,
 पायाखाली जमिन...
 पाठीवरती आभाळ आहे,
 जाऊन सांगा त्या वादळांना 
 आता माझ्याशी गाठ आहे...
असे आव्हान द्यायचे असते. निर्धारपूर्वक लढा द्यायचा असतो. कारण लक्षात ठेवा, अपयश दु:ख पचविल्या शिवाय यशाची चव चाखता येत नाही.चार्ली चँपलिनची 39 नाटके फेल गेल्या नंतरचं 40 वे नाटक गाजले होते. त्यामुळे खिलाडूव्रत्तीने विजेत्यांचे अभिनंदन करूया. जिंकण आणि हरणं हा केवळ तीन अक्षरांचा खेळ आहे. मात्र यातूनचं आयुष्याला कलाटणी मिळत असते. परंतु जिंकलेल्यांनी सुध्दा विवेकी राहायला हवं. अगदी जमिनीवर. कारण हरलेले होते म्हणूनचं तुमच्या जिंकण्याला अर्थ आहे. त्यामुळे सहभागी सर्वाचेचं मनपूर्वक अभिनंदन...
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक दिवा ज्ञानाचा - एक दिवा संविधानाचा होय. या दोन्ही महापुरूषांच्या जंयती दिनानिमित्त आपणाला आपले विचार प्रकट करण्याची संधी मिळालीय यातचं तुम्ही जिंकलात....!!!
सगळेजण स्पर्धेचा आनंद घ्या. लहानपणी मी सुध्दा राजर्षी शाहू महाराज जंयती च्या वेळी एका स्पर्धेत बोललो होतो. बक्षिस मिळालं नव्हतं पण दांडगा आत्मविश्वास मिळाला होता. पुन्हा सातत्याने बोलत राहिलो. कधी जिंकलो तर कधी हरलो. हजारो स्पर्धा केल्या. कधी राज्यात तर कधी राज्या बाहेर. हजारो जिंकल्या शेकडो हरल्या. मात्र प्रत्येक वेळी नव्याने सुरूवात केली. पण त्यातून बरचं काही शिकता आलं. चांद्या पासून ते बांद्यापर्यंत मित्र परिवार मिळाले. नावं झालं. कौतुक झालं. पण नेहमी जमिनीवर राहिलो. निकालाचा आदर केला. संयोजक आणि परीक्षक यांच्याशी कधीचं वाद घातला नाही. नेहमी सकारात्मक राहिलोय....
आज महाराष्ट्रभर व्याख्यानं करतोय. नामांकित स्पर्धांना परीक्षक बसतोय पण सारं काही पारदर्शक. हे सारं आदरणीय गुरूवर्य प्रा.डॉ.महादेव रोकडे यांच्यामुळे शक्य झालं. अनेकवेळा खिशात पैसे नसतानाही काँलेजचे पत्र आणि शर्टच्या वरच्या खिशात पैसे टाकून सरांनी महाराष्ट्राभर स्पर्धांना पाठविले. मी स्पर्धा जिंकल्यांचा आनंद माझ्यापेक्षा सरांनाचं अधिक व्हायचा. जिंकून काँलेजला पोहचण्यापूर्वी सरांनी त्यांच्या वळणदार अक्षरात अख्खा फळा रंगविलेला असो. त्यातं माझं टोपलंभर कौतुक. त्यामुळे काळीज सुपाएवढं मोठ्ठं व्हायचं....
हे सगळं कौतुक म्हणून लिहित नाही तर... निकाल काय असतो. किंवा त्यांची उत्सुकता काय असते, हे मला चागलंचं ठावूक आहे. निकालाच्या उत्सुकेतेपोटी आम्ही मान्यवर पाहुण्यांची (बक्षीस वितरणाची) भाषणं टाळ्यांनी अगदी हानून पाडलीत. तरीही सांगतोय की, सहभागी सर्वचं स्पर्धेक विजेतेचं आहेत.... 
स्पर्धेला परिक्षक म्हणून बसल्यावर खूप काळजी घ्यावी लागते. स्पर्धेकांच्या शंका- कुशंका आणि प्रश्नांना स्पष्टीकरणासह उत्तरे द्यावी लागतात. निकाल पारदर्शक लावावे लागतात. तरीही काहीचं समाधान होत नाही. त्याचं वाईटही वाटतं.... 
लाँकडाऊनच्या काळात असाचं काही स्पर्धांना संयोजकांच्या विनंतीवरून परिक्षक झालो होतो. व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहून निकाल लावले. शाळकरी मुलांची भाषणं ऐकून आनंदही वाटला. पण निकाला नंतर वाईट प्रतिक्रिया अनुभवयास मिळाल्या. कोणत्याही पालकांचं (आई-वडीलाचं) आपल्या मुलावर-मुलीवर खूपचं प्रेम असतं. खूपचं कौतुक असतं. त्यातून माझा मुलगा किंवा मुलगी म्हणजेचं ग्रेट. दुसरं कुणी त्याच्या सारखं नाहीचं, हि भावना वाढते. त्यातूनचं काही पालकांनी चुकीचा विचार केला. संयोजकाच्या जवळच्यांना बक्षिसं दिलीत. पाहुण्यांना नंबर दिलेत. ओळखीच्यांना प्राधान्य दिलंय. गावातले जपलेत. शेजाऱ्यांना झुकतं माप दिलंय. पालकांच्या ओळखीमुळे मुलाला बक्षीस दिलंय. असो अशा किती तरी प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातून निरपेक्षपणे स्पर्धा आयोजित करणाऱ्या संयोजकांचे मनोबल खचते. त्यांना वाईट वाटते. दु:ख होतंं. याचा विचार पालकांनी करायला हवा. मुलं खिलाडू असतात पण काही पालक त्यांना स्पर्धेक करतात. त्यांच्या आडून नाहक प्रश्न उभे करतात. ज्यामुळे परिक्षक ही दुखावले जातात. पण लक्षात ठेवा, परिक्षक सुद्धा एक माणूस आहे. त्यालाही भावभावना आहेत. त्यालाही परिवार आहे. त्यालाही मुलं, पुतणे, भाचे आहेत. तो तुमच्या मुलांवर अन्याय कशाला करेल??? 
असो, या सगळ्यांचा विचार करून आजच्या निकालाचा आनंद घ्या. मुलांना आणखी तयारी करायला लावा. पहिल्यादाचं भाषणं केलेल्या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाका. मुलांना वाचण्यासाठी चांगली पुस्तके द्या. दुसऱ्यांच्या मुलांचेही कौतुक करूया..... सर्व स्पर्धेकांचे मनपूर्वक अभिनंदन करूया....
 आदरणीय गुरूवर्य प्रा.डॉ. महादेव रोकडे सर यांनी 2008 साली त्यांचा 'थोडं ऊन थोडी सावली' हा कविता संग्रह भेट दिला होता. त्यातल्या कविता अनेक स्पर्धांमधून मी महाराष्ट्राभर मांडल्यात. त्यामुळे माझ्या मनातला 'ऊन-सावली' चा कवडसा या स्पर्धेच्या निमित्ताने मांडलाय. आपण तो गोड मानून घ्यावा...
 सर्वांना महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा....
शेवटी बाबा आमटेंच्या शब्दांत  इतकचं की, 
 श्रंखला पायी असू दे
 मी गतीचे गीत गाई,
 दुःख उधळावयास आता
 आसवांना वेळ नाही....

©️ धनंजय झोंबाडे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कवीमनाचा माणूस...

शब्दांना अनुभवाची जोड देऊन कवेत घेताना वाचकांच्या मनाला भिडणारी जाणीवासंपन्न कविता लिहिणारे संवेदनशील, माणुसकीचं बोन्साय होत असताना हातातल्या कुंचल्याप्रमाणे माणसाचे बेगडी रंग ओळखून मानवतेसाठी झटणारे कवी, पोरांना दांडगा आत्मविश्वास देणारे कार्यकर्ते, लिहित्या हातांना बळ देणारा माणूस, जाती-धर्माच्या भिंती तोडणारा वाटसरू, प्रबोधन आणि परिवर्तनाच्या वाटेवरचा वाटाड्या, विद्रोह, व्यथा आणि वेदना टिपणारा सजग कलमवीर, संकटाच्या काळातही 'आत्मनिर्भर' राहिलेला माणूस झालचं तर 'कविताजीवी' माणूस, देश 'कँशलेस' नको तर 'कास्टलेस' करा हे ठणकावून सांगणारा साथी... आणि हो सदैव जमिनीवर राहाणारा अवलिया माणूस......
अशी कितीतरी मोठी ओळख असणारे आमचे मित्र, मार्गदर्शक, मितवा, वाटाड्या मा.श्री. Sunil Ubale  यांना वाढदिवसाच्या बक्कळ (अगदी ग्लोबल टेडर काढून) शुभेच्छा.....
असेचं लिहित राहा...नेहमी आनंदी राहा...
मनभरून जगा... तुमच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्नांना ट्रकभर सदिच्छा... पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
#HappyBirthday
कवितेचारंगारी
#कविताजगणारामाणूस

बोलत्या ओठांना बळ देणारा माणूस - प्रा.डॉ. पांडूरंग कंद


अरे..तुम्ही खूप छान बोललात. संदर्भही छान दिलेत. पण या विषयावर असंही बोलता आलं असतं. हे ही मांडता आलं असतं.  एखाद्या विषयाची तयारी करताना हे वाचा. मी काय म्हणतोय..तुम्हाला यावर्षी  अमुक-तमुक विषयांवर बोलायचंय. त्यासाठीचे संदर्भ ग्रंथ आणि काही पुस्तके मी पाठवितो...अशी बरीच वाक्य माझ्यासह अनेक तरूणांना आणि तरूणींना ऐकविणारा वैखारीच्या वर्तुळातला अवलिया माणूस म्हणजे..निखळ...मनस्वी आणि स्वच्छंदी मनाचे आमचे मार्गदर्शक अभ्यासू संशोधक, प्रेमळ प्राध्यापक मा.डॉ. पांडूरंग कंद सर होय. समाज, साहित्य, कला, संस्कृती, लाइफस्टाइल अशा विविधांगी क्षेत्रात आपल्या नव्या दृष्टीकोनातून ते नेहमी मांडणी करीत असतात. गावखेड्यातल्या बोलणाऱ्या पोरांना नेहमीचं बळ देवून त्याच्या पाठीमागे ते सदैव उभे आहेत. याची प्रचिती सहज कोणालाही येवू शकते. एखाद्याला मान-सन्मान देण्याची कला त्यांच्याकडून शिकली पाहिजे. 'हे असं करा किंवा असं करायला हवं...हे करता येईल...असं हक्काने सांगणारा माझ्या आयुष्यातला वाटाड्या, मार्गदर्शक, सोबती म्हणजे पांडूरंग कंद सर. त्याच्या पुढाकाराने आणि प्रेमळ वागण्यातून वाड्या- वस्त्यांसह गावखेड्यातल्या अनेक पोरांना बोलण्याचं बळ मिळो, सरांची झेप उंच जावो, याचं सदिच्छेसह Pandurang Kand सर यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा...!!
🎂🎁🧁💐🎈🎊🎉

भूमिका घेणारा माणूस...

पुणे विद्यापीठात एम.ए ला असताना प्रा.डॉ.भगवान गव्हाडे सर होते. ते आधुनिक गद्य, आधुनिक पद्य आणि भारतीय साहित्य शिकवायचे. शिकवताना सतत गझलेचा किंवा चित्रपटांचा संदर्भ द्यायचे. त्यांचा आवाज सुध्दा घरंदाज गायकी प्रमाणे मंजुळ आणि सुरेख होता. मनोरंजातून साहित्य शिकवण्याची त्यांची कला विद्यार्थी वर्गावर प्रभाव टाकत होती. त्यामुळे ते विभागातील शिक्षकांसह ते सर्व विद्यार्थ्यांचे लाडके झाले होते. त्यात भर म्हणजे विद्यापीठाच्या 'फँकल्टी हाऊस' ला ते एकटेचं राहायचे. (त्यांचे कुटुंब औरंगाबादला होते.) त्यामुळे रात्री-अपरात्री त्यांच्या सोबत आमचे दिग्दर्शक मित्र जयशिल मिजगर, प्रमोद आव्हाड, Kumar Muthe  प्रफुल्ल कांबळे Nitin Mane  Sandeep Kale  Manohar Lote Dnyaneshwar Bagnar Kiran Sonwalkar Satish Harpade अशी मोठी मैफील रंगायची अगदी खुलके बात...खुल्लम खुल्ला इजहार..सर ही रोमँटिक होऊन गझला म्हणायचे. साहित्य, समाज, कला, मनोरंजन, चळवळ, अभ्यासक्रम, प्रेम, चित्रपट, गाणी अशी चौफेर चर्चा रंगायची. विद्यार्थी आणि शिक्षक  याच्या पलिकडचं नातं गव्हाडे सर आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालं होतं. कोणत्याही विद्यार्थ्यांविषयी सरांच्या मनात आपुलकी आणि जिव्हाळा जाणवायचा. विद्यापीठाच्या बाहेर अनेक कार्यक्रम, मोर्चा, आंदोलनात सरांसोबत मी आणि जयशिलनं प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. अगदी शनिवार-रविवारचे चित्रपट पाहाण्याचाही योग अनेकदा जुळून आला. 'कविता' करण्यात त्यांचा विशेष हातखंडा. त्यातूनचं 'आदिवासी विमर्श' हा कविता संग्रह आकारास आला. कितीतरी संगोष्टी आणि चर्चासत्रे मी आणि लाडके मित्रवर्य  प्रा.डॉ.अरूणकुमार सोनकांबळे, Ravindra Nirgude Patil  यांनी गव्हाडे सरांसोबत अनुभवलीत. त्यांची साहित्यिक मांडणी नेहमीचं भावली. पिशपाँन्ड, ट्रँडिशनल डेज, गँदरींग मध्ये तर सरांची फुल्ल टू धम्माल. 'चलाओं ना नैनोसे बान रे...' या गाण्यावर प्राँ.डाँ.महेश दवंगे आणि गव्हाडे सरांनी Devram Dagale  ला सोबत घेऊन केलेला डान्स अजूनही प्रत्येकाच्या मनात आहे. प्रो.डॉ.तुकाराम पाटील सर सेवानिवृत्त होताना गव्हाडे सर खूपचं भावूक झाल्याचेही आठवतंय. पुढे गव्हाडे सर पुणे विद्यापीठ सोडून औरंगाबादला 'घरवापसी' करीत असताना लिपीक शिवाजी कोकणे आणि Abhijeet Chobhe prakash Prakash M. Maghade  सुध्दा  भावूक झाले होते. एम.ए च्या निरोप कार्यक्रमसाठी लघुपट बनविताना गव्हाडे सरांचे बहुमोल मार्गदर्शन जयशिल नि मला मिळाले होते. त्यामुळेचं पुढे काही लघुपट करता आले. जयशिलने तर पुढे ग्रामीण प्रेमाचा कानोसा घेणारा ह्रदयस्पर्शी 'पाटील' नावाचा मराठी सिनेमा केला. असो तर....
गव्हाडे सरांच्यामुळे त्या वयात 'दुनियादारी' कळाली. ते नेहमी 'आजचा दिवस माझा' म्हणत सकारात्मकता शिकवित राहिले. त्यामुळे ते आम्हाला आमचे 'मितवा' वाटायचे. 'क्लासमेंट' आणि 'फ्रेंडस'ची जाणीव सरांनी आम्हाला करून दिली. त्या बळावरचं काहींनी 'प्यारवाली लव्हस्टोरी' साकार केली. 'पुणे मुंबई पुणे' हा प्रवासही त्यांच्या सोबत करता आला. त्याचं प्रश्नांशी 'धडाकेबाज' भिडणं मनाला नवी उमेद देऊन गेलं. अभ्यासाचा 'टायमपास' करू नका, नाही तर 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' करावा लागेल, याचीही जाणीव सरांमुळे झाली. आयुष्याचा 'नटरंग' होऊ द्यायचा नसेल तर 'आयत्या घरात घरोबा' होऊ नका, असा सल्लाही ते देत होते. 'अशी ही बनवाबनवी' टाळली तर माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठ्ठा होतो, यावर त्यांची विशेष श्रध्दा आहे. वाचण्या- लिहण्यातले संदर्भ जर जगण्यात आणता आले तर आयुष्य फारचं सुंदर वाटायला लागतं. असं त्यांनी खूपदा सांगितलंय. आम्हाला साहित्याकडे पाहाण्याची वेगळी नजर प्रो.डॉ. तुकाराम पाटील, प्रो.डॉ.भालेराव  Sadanand Bhosale Balasaheb Sonawane शशिकला राय, Prerana Ubale प्रा.डॉ.महेश दवंगे यांनी दिली पण काव्यातून साहित्याकडे बघण्याची कला गव्हाडे सरांमुळे मिळाली. त्यांच्या सहवासाने आमच्या जगण्यात  'सैराट'पणा आला. अगदी जगणंचं 'लय भारी' वाटू लागलं. सरांचा सहवास असाचं मिळत राहावा असं वाटत असतानाचं त्यांनी 'घरवापसी'चा अनाकलनीय निर्णय घेतला. आम्ही आदरापोटी त्यांची 'मन की बात' समजून घेतली. आणि जड मनाने त्यांना निरोप दिला. तरीही संपर्क कायम आहे. सुख-दु:खाच्या अनेक गोष्टी, आयुष्यातले खचखळगे त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येतात. त्यांच्याशी बोललं की मन हलकं होतं. आजही ते त्याचं आपुलकी आणि प्रेमातून सल्ले देतात. मार्गदर्शन करतात. विचारपूस करतात. मधल्या काळात 'कोरोना'शी दोन हात करण्याची लढाई ते निष्टेनं अगदी चिवटपणे लढले. लोकांचे प्रबोधन करीत राहिले. मदत करीत राहिले. तसेच 'माझं कुटुंब माझी जबाबदारी'ही सांभाळत राहिले. असा हा मुलखावेगळा माणूस.भूमिका घेणारा मास्तर. वास्तव मांडणारा कवी. जगतो तेचं बोलतो म्हणणारा वक्ता. आमच्या आयुष्यात आहे. याचा हेवा वाटतोय. तर या अवलिया माणसाचा आज वाढदिवस आहे. त्यांची सगळी स्वप्ने, इच्छा आणि आकांक्षा पूर्ण व्हाव्यात. त्यांच्यातला माणूस असाचं गोड, मनस्वी आणि निखळ राहावा. आणि हो, आमच्या डोईवरचा हात असाचं कायम राहावा याचं सदिच्छेसह आदरणीय प्रा.डॉ.भगवान गव्हाडे Ajay Gavhade  सरांना वाढदिवसाच्या बक्कळ, मोक्कार, जबराट आणि ट्रकभर शुभेच्छा....!!
#जुगजुगजिओ
#सालगिराहमुबारक
#हँप्पीवालाबड्डे