शनिवार, 3 अक्टूबर 2026

मनातलं काही....


 निकाल हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. आयुष्यातल्या अनेक सकारात्मक घडामोडी या निकालाशी निगडीत असतात. त्यात उद्या पाच राज्यांचा निकाल आहे. तर असो, पण... मी आपल्या निकाला विषयी बोलतोय. अर्थात सर्वस्पर्शी फाउंडेशनच्या भाषण (वक्तृत्व) स्पर्धेच्या निकाला विषयी....

तर आज स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे. त्यात विजेते ठरतील. मात्र माझ्यासाठी तर सहभागी सगळेचं स्पर्धेक विजेते आहेत. अगदी 53 च्या 53. हो गुजरातचा स्पर्धेक सुध्दा विजेताचं आहे....

त्यामुळे मी सहभागी सर्व स्पर्धेकांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो. कोरोनाच्या महामारीत अवघं जग सापडलं आहे. देवळां पासून ते शाळांपर्यंत टाळेबंदी करण्याची वेळ आपणांवर आली आहे. त्यामुळे पुस्तक-पाटीपासून मुलं दूर जाताहेत. आँनलाईन शिक्षणाच्या नावाखाली 'पुढचं पाठ मागचं सपाट' असं चित्र तयार झालंय. कधी नव्हे ती इतकी मोकळीक मुलांना मिळालीय. म्हणूनचं ते सगळेचं छंद जोपासताहेत. डोरोमँन ते पोकोमँन यांची मुलांसोबत चांगलीचं गट्टी जमलीय. जोडीला सापसीडी, लुडो, पब्जी, थ्री फायर, झोंबी, कार पार्किंग अशी भलीमोठी लिस्ट आहे. असं हे वातावरण तयार होत असल्याचं काळात सर्वस्पर्शी फाउंडेशन या सामाजिक संस्थेनं एक अभूतपूर्व उपक्रम आयोजित करून तो यशस्वी सुध्दा केला. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजू पोखर्णीकर, उपाध्यक्ष गुरूवर्य प्रा.डॉ.महदेव रोकडे, सचिव गुरूबंधु प्रा.समिंदर घोक्षे यांच्यासह राबलेल्या प्रत्येक हातांचे मनापासून आभार....

कोरोना काळ लक्षात घेवून मुलांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी हा शब्दपंढरीचा यज्ञ (वक्तृत्व स्पर्धा) आयोजित करण्यात आला होता. त्यात वैखारीचे अनेक वारकरी आनंदाने सहभागी झाले. त्या वारकऱ्यांनी प्रगल्भ शब्दांच्या समिधा वाहिल्या. त्या वारकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचा आजचा दिवस. शिवखेरा म्हणतो की, आयुष्यात विजय होईल किंवा पराजय पण पाऊल पुढं टाकण्यात खरा विजय दडलेला असतो, हा विचार सहभागी चिमुकल्यांनी व त्याच्या आई-वडीलांनी लक्षात घ्यावा. आपल्या खूपचं छान प्रयत्न केलेत. मी स्वतः काही व्हिडीओ पाहिलेत. परंतु जय-पराजयाचे काही निकष असतात. सुरूवात, हावभाव, स्पष्टीकरण, सभाधीटपणा, आत्मविश्वास, उच्चारणं, मांडणी, शेवट असे काही मापदंड असतात. त्यात कमी जास्त प्रमाण असते. त्यामुळे काही विजेते ठरत असतात. पंरतु त्यामुळे नाउमेद व्हायचे नसते. हरायचे नसते. खचून जायचे नसते. तर कविवर्य भटांच्या शब्दांत...

 'प्रत्येक वादळ पेलवीन मी
 माझ्यात आत्मविश्वास आहे,
 पायाखाली जमिन...
 पाठीवरती आभाळ आहे,
 जाऊन सांगा त्या वादळांना 
 आता माझ्याशी गाठ आहे...

असे आव्हान द्यायचे असते. निर्धारपूर्वक लढा द्यायचा असतो. कारण लक्षात ठेवा, अपयश दु:ख पचविल्या शिवाय यशाची चव चाखता येत नाही.चार्ली चँपलिनची 39 नाटके फेल गेल्या नंतरचं 40 वे नाटक गाजले होते. त्यामुळे खिलाडूव्रत्तीने विजेत्यांचे अभिनंदन करूया. जिंकण आणि हरणं हा केवळ तीन अक्षरांचा खेळ आहे. मात्र यातूनचं आयुष्याला कलाटणी मिळत असते. परंतु जिंकलेल्यांनी सुध्दा विवेकी राहायला हवं. अगदी जमिनीवर. कारण हरलेले होते म्हणूनचं तुमच्या जिंकण्याला अर्थ आहे. त्यामुळे सहभागी सर्वाचेचं मनपूर्वक अभिनंदन...

क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक दिवा ज्ञानाचा - एक दिवा संविधानाचा होय. या दोन्ही महापुरूषांच्या जंयती दिनानिमित्त आपणाला आपले विचार प्रकट करण्याची संधी मिळालीय यातचं तुम्ही जिंकलात....!!!

सगळेजण स्पर्धेचा आनंद घ्या. लहानपणी मी सुध्दा राजर्षी शाहू महाराज जंयती च्या वेळी एका स्पर्धेत बोललो होतो. बक्षिस मिळालं नव्हतं पण दांडगा आत्मविश्वास मिळाला होता. पुन्हा सातत्याने बोलत राहिलो. कधी जिंकलो तर कधी हरलो. हजारो स्पर्धा केल्या. कधी राज्यात तर कधी राज्या बाहेर. हजारो जिंकल्या शेकडो हरल्या. मात्र प्रत्येक वेळी नव्याने सुरूवात केली. पण त्यातून बरचं काही शिकता आलं. चांद्या पासून ते बांद्यापर्यंत मित्र परिवार मिळाले. नावं झालं. कौतुक झालं. पण नेहमी जमिनीवर राहिलो. निकालाचा आदर केला. संयोजक आणि परीक्षक यांच्याशी कधीचं वाद घातला नाही. नेहमी सकारात्मक राहिलोय....

आज महाराष्ट्रभर व्याख्यानं करतोय. नामांकित स्पर्धांना परीक्षक बसतोय पण सारं काही पारदर्शक. हे सारं आदरणीय गुरूवर्य प्रा.डॉ.महादेव रोकडे यांच्यामुळे शक्य झालं. अनेकवेळा खिशात पैसे नसतानाही काँलेजचे पत्र आणि शर्टच्या वरच्या खिशात पैसे टाकून सरांनी महाराष्ट्राभर स्पर्धांना पाठविले. मी स्पर्धा जिंकल्यांचा आनंद माझ्यापेक्षा सरांनाचं अधिक व्हायचा. जिंकून काँलेजला पोहचण्यापूर्वी सरांनी त्यांच्या वळणदार अक्षरात अख्खा फळा रंगविलेला असो. त्यातं माझं टोपलंभर कौतुक. त्यामुळे काळीज सुपाएवढं मोठ्ठं व्हायचं....

हे सगळं कौतुक म्हणून लिहित नाही तर... निकाल काय असतो. किंवा त्यांची उत्सुकता काय असते, हे मला चागलंचं ठावूक आहे. निकालाच्या उत्सुकेतेपोटी आम्ही मान्यवर पाहुण्यांची (बक्षीस वितरणाची) भाषणं टाळ्यांनी अगदी हानून पाडलीत. तरीही सांगतोय की, सहभागी सर्वचं स्पर्धेक विजेतेचं आहेत.... 

स्पर्धेला परिक्षक म्हणून बसल्यावर खूप काळजी घ्यावी लागते. स्पर्धेकांच्या शंका- कुशंका आणि प्रश्नांना स्पष्टीकरणासह उत्तरे द्यावी लागतात. निकाल पारदर्शक लावावे लागतात. तरीही काहीचं समाधान होत नाही. त्याचं वाईटही वाटतं.... 
लाँकडाऊनच्या काळात असाचं काही स्पर्धांना संयोजकांच्या विनंतीवरून परिक्षक झालो होतो. व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहून निकाल लावले. शाळकरी मुलांची भाषणं ऐकून आनंदही वाटला. पण निकाला नंतर वाईट प्रतिक्रिया अनुभवयास मिळाल्या. कोणत्याही पालकांचं (आई-वडीलाचं) आपल्या मुलावर-मुलीवर खूपचं प्रेम असतं. खूपचं कौतुक असतं. त्यातून माझा मुलगा किंवा मुलगी म्हणजेचं ग्रेट. दुसरं कुणी त्याच्या सारखं नाहीचं, हि भावना वाढते. त्यातूनचं काही पालकांनी चुकीचा विचार केला. संयोजकाच्या जवळच्यांना बक्षिसं दिलीत. पाहुण्यांना नंबर दिलेत. ओळखीच्यांना प्राधान्य दिलंय. गावातले जपलेत. शेजाऱ्यांना झुकतं माप दिलंय. पालकांच्या ओळखीमुळे मुलाला बक्षीस दिलंय. असो अशा किती तरी प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातून निरपेक्षपणे स्पर्धा आयोजित करणाऱ्या संयोजकांचे मनोबल खचते. त्यांना वाईट वाटते. दु:ख होतंं. याचा विचार पालकांनी करायला हवा. मुलं खिलाडू असतात पण काही पालक त्यांना स्पर्धेक करतात. त्यांच्या आडून नाहक प्रश्न उभे करतात. ज्यामुळे परिक्षक ही दुखावले जातात. पण लक्षात ठेवा, परिक्षक सुद्धा एक माणूस आहे. त्यालाही भावभावना आहेत. त्यालाही परिवार आहे. त्यालाही मुलं, पुतणे, भाचे आहेत. तो तुमच्या मुलांवर अन्याय कशाला करेल??? 

असो, या सगळ्यांचा विचार करून आजच्या निकालाचा आनंद घ्या. मुलांना आणखी तयारी करायला लावा. पहिल्यादाचं भाषणं केलेल्या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाका. मुलांना वाचण्यासाठी चांगली पुस्तके द्या. दुसऱ्यांच्या मुलांचेही कौतुक करूया..... सर्व स्पर्धेकांचे मनपूर्वक अभिनंदन करूया....

 आदरणीय गुरूवर्य प्रा.डॉ. महादेव रोकडे सर यांनी 2008 साली त्यांचा 'थोडं ऊन थोडी सावली' हा कविता संग्रह भेट दिला होता. त्यातल्या कविता अनेक स्पर्धांमधून मी महाराष्ट्राभर मांडल्यात. त्यामुळे माझ्या मनातला 'ऊन-सावली' चा कवडसा या स्पर्धेच्या निमित्ताने मांडलाय. आपण तो गोड मानून घ्यावा...

 सर्वांना महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा....
शेवटी बाबा आमटेंच्या शब्दांत  इतकचं की, 
 श्रंखला पायी असू दे
 मी गतीचे गीत गाई,
 दुःख उधळावयास आता
 आसवांना वेळ नाही....

©️ धनंजय झोंबाडे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

मातीशी नातं असणारा प्राध्यापक....


समाजजीवन सतत आंदोलित होत असते. सारं काही बिघडलं आहे,असे वाटत असताना सकारात्मक सृजनाचे धुमारे फुटताना दिसतात.त्यामुळे समाज एक पाऊल मागे जातो आहे,असे वाटत असतानाचं तो दोन पावले पुढेही सरकलेला दिसतो.फक्त सृजनाची दखल आपल्याला घेता आली पाहिजे. सदानंद भोसले यांचे कामही असेचं समाजाला दोन पावले पुढे नेणारे,सकारात्मक बळ देणारं, उत्साह वाढविणारं व 'माणुसकी'ची जाणीव करून देणारं आहे. 'देशमुखां'चा बालेकिल्ला म्हणून ओळख असणार्यां लातूर जिल्हयातील चाकूर तालुक्यातलं 'वाघोली' हे त्यांचं जन्मगांव. लहानपणापासूनचं गरीबीशी दोन हात करण्याचा त्यांचा प्रवास वाखाण्याजोगा आहे. समाज व परिस्थितीशी लढण्याचं 'बाळकडू' त्यांना घरातूनचं मिळालं. जिद्द,चिकाटी,अभ्यासू,कणखर,प्रामाणिक व मेहनती हे गुण अगदी बालपणापासूनचं. वाचन,चिंतन व काहीतरी करून दाखविण्याची 'धडपड' त्यांना स्वस्थ बसूचं देत नव्हती.म्हणूनचं त्यांनी शिशकी पेशात प्रवेश केला. आपले काम व लेखणीच्या बळावर लवकरचं ते 'प्राध्यापक' झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलेचं नाही. बांभूळगांव,नाशिक,औरंगाबाद,कोपरगांव अशा ठिकाणच्या महाविद्यालयात त्यांनी आपल्या 'जाणीवा संपन्न शिशकाची' चुणूक दाखवून दिली आहे. त्याचं वेळेस त्यांनी समाजातील दु:खितांची बाजू मांडली. अन्यायाला वाचा फोडली. शोषितांना आधार दिला. अनाथांना मायेनं जवळ घेतलं. आणि शञूवरही तितकचं प्रेम केलं हे विशेष. वयाच्या २२ व्या वष्री प्राध्यापक म्हणूनआगमन केलेल्या भोसले सरांचं विश्वचं 'प्राध्यापक'मय झालं आहे. यात शंकाचं नाही. आयुष्याच्या खचखळग्यात सुध्दा या माणसानं हार कधी मानलीचं नाही. तरूण पणात आलेल्या सगळ्या जबाबदार्यां तितक्याचं आनंदाने त्यांनी निभावल्या आहेत. कमी वयात अनेक मान-सन्मान  मिळूनसुध्दा या माणसाचे पाय सदैव जमिनीवरचं आहेत. म्हणूनचं की काय त्यांना आजप्रयंत महत्त्वाची 'पद'मिळाली आहेत. त्यांच्यातल्या 'सजग माणसानं'ने नेहमीचं 'वंचितांची बाजू' घेतली आहे. अन्याय व अत्याचारावर कटूर शब्दप्रहार केला आहे. काळानुसार शिकवण्याच्या पध्दतीत बदल होत गेले. आणि 'महाविद्यालयात'त प्रयोगशील काम करणारा हा माणूस 'विद्यापीठा' वरही 'अधिराज्य' गाजवू लागलायं. आपल्या माणसाचं,विद्यापीठाचं नावं झालं पाहिजे अशी भावना बाळगणार्यां या माणसानं 'सेट नेट'च्या काय्रशाळेचा पाया रोवून  आव्हानालाचं 'टक्कर' दिली आहे. विद्याथ्याचा आधारवड होऊ पाहाणारा त्यांच्यातला माणूस प्रेमळ व तितकाचं  हळवा सुध्दा आहे. शिशकी पेशातली व मुस्कटदाबी हा त्यांचा नेहमीचं 'चिंतेचा' विषय आहे.  शिकवणं हि एक चळवळ आहे.त्यांचा धंदा होऊ देणारं नाही? असा निश्चय त्यांनी केला आहे. माणसांना हक्क व आधिकार मिळवून देण्सासाठी धडपड करणारा त्यांच्यातला  लढवय्या काळालाचं आव्हान देतो. व कुसमाग्रजांच्या शब्दांत म्हणतो की..............
'मोडून पडला संसार
तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन
नुसतंचं लढ म्हणा.....!!
शिकवण्यानं त्यांना समृध्द केलेयं.अनेक अनुभव आले.पण मुठभर भाकरीसाठी त्यांनी 'स्वाभिमान' कधी सोडला नाही. माणसं जोडणं हा त्यांचा उपजत गुण. संवादानं प्रश्न सुटतो. यावर त्यांचा दृढ विश्वास.त्यांच्यातला करारी माणूस पाहाताना वामन निंबाळकरांच्या ओळी सतत आठवतात......................
'आयुष्य आमचं रोजचं
चिंध्या झालंयं,
आमच्या इतकं
कुणी फाटलचं नाही,
सोईनुसार सारेचं बदलले,
आम्ही माञ शब्दचं,
दुकान कधी थाटलंचं नाही.....
त्यांची धडपड सतत नवा अध्याय मांडत असते.माणूसकी जपत असते. संवादाची भूमिका घेत असते.त्यांना या वाढदिवशी नवी उमेद मिळवी.त्यातून त्याचं काम उजळून निघावं. त्याच्यातला जागरूक प्राध्यापक असाचं राहावा अशी अपेशा व्यक्त करतो. त्यांच्या आयुष्याचा सारा लेखाजोखा बाबा आमटेंच्या शब्दात माडतांना इतकचं म्हणता येईलं की,
श्रृंखला पायी असू दे
मी गतीचे गीत गाई
दु:ख उधळावयास आता
आसवांना वेळ नाही....!!!
✒ धनंजय मोहन झोंबाडे
      मु.पो. सांजा. ता व जि.
      उस्मानाबाद - ४१३५०१
     
💐💐💐🙏🙏🙏💐💐

प्रेमाच्या ओलाव्यात... धरणीमाय तापली!

प्रेमाच्या ओलाव्यात... धरणीमाय तापली!

परवा एका सामाजिक मोर्चासाठी मुंबईला गेलो होतो. सोबतीला मार्गदर्शक तथा प्रसिद्ध शाहिर, त्यांचा सुतारकाम करणारा पुतण्या, इतिहास संशोधक मित्र, शब्दांशी मैत्री जपणारे कवी-लेखक मित्र आणि त्यांचा लाडका मेहुणा असे वेगवेगळ्या स्वभावाचे, विचारांचे आणि अनुभवांचे सहप्रवासी होते. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने सुरू असलेला तो प्रवास केवळ सामाजिक मोर्चात सहभागी होण्यासाठीचा नव्हता, तर माणसांचे स्वभाव, विचारांची विविधता, सामाजिक जाणिवा आणि बदलत्या काळातील तरुणाईचे भावविश्व जवळून अनुभवण्याची एक संधीही होती. कारण माझ्यासह प्रत्येकाची जगाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होती. त्यामुळे प्रवासादरम्यान कोणाच्या बोलण्यात सामाजिक प्रश्नांची जाण होती, कोणाच्या विचारांत इतिहासाचे संदर्भ होते, तर कोणाच्या स्वभावात विनोदाची सहजता आणि प्रसंगावधान होते. त्यामुळे प्रवास सुरू झाल्यापासूनच गप्पांना विषयांची कमतरता नव्हती.

प्रवासात अनेकदा असे घडते की, एखादी छोटीशी घटना आपल्या मनात मोठ्या विचारांची खिडकी उघडते. मुंबईकडे जाताना टोल नाक्यांवरून आमची गाडी पुढे जात होती. सामाजिक मोर्चासाठी मुंबईत येणाऱ्या अनेक वाहनांना काही ठिकाणी टोलमाफीचा लाभ मिळत असल्याचे अनुभवायला येत होते. मात्र अटल सेतूचा टोल आमच्या वाहनासाठी वजा झाला आणि त्यासंदर्भातील संदेश आमच्यासोबत असलेल्या शाहिरांच्या मोबाईलवर आला. हा अगदी साधा आर्थिक व्यवहार होता. परंतु त्यावरून सुरू झालेल्या चर्चेने प्रवासातील वातावरण अधिकच रंगतदार झाले. सामाजिक चळवळी, सार्वजनिक सुविधा, नागरिकांची जबाबदारी आणि व्यवस्थेतील नियम यांवर आमच्यात चर्चा सुरू झाली. एखाद्या प्रवासात अशा छोट्या घटनाही विचारांची दिशा ठरवतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.

मुंबईत पोहोचल्यानंतर मोर्चाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या समाजबांधवांमध्ये आम्ही सहभागी झालो. विविध भागांतून आलेल्या लोकांच्या चेहऱ्यांवर अपेक्षा, अस्वस्थता, संघर्षाची जाणीव आणि आपल्या मागण्यांसाठी एकत्र उभे राहण्याचा निर्धार दिसत होता. त्यामुळे सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी लोक उन्हाची पर्वा न करता एकत्र आले होते. त्या गर्दीत माझ्या मावसभावाची आणि त्याच्या मित्राची भेट झाली. अशा मोठ्या सार्वजनिक अर्थात सामूहिक कार्यक्रमांमध्ये अचानक आपली माणसे भेटणे, काही क्षण त्यांच्यासोबत घालवणे आणि सामूहिक भावनेचा अनुभव घेणे, यामध्ये एक वेगळे समाधान असते.

मोर्चाच्या ठिकाणी विविध वक्त्यांची भाषणे सुरू होती. उन्हाचा कडाका प्रचंड होता. डोक्यावर तळपणारा सूर्य, सभोवताली जमलेली गर्दी आणि व्यासपीठावरून सुरू असलेले विचारांचे सादरीकरण, अशा वातावरणात आम्ही काही काळ भाषणे ऐकत राहिलो. वक्त्यांच्या मुद्द्यांना प्रतिसाद देत टाळ्या वाजवल्या, घोषणांमध्ये सहभागी झालो आणि मोर्चाच्या सामूहिक ऊर्जेचा अनुभव घेतला. तसंही सामाजिक चळवळींमध्ये भाषण हे केवळ शब्दांचे सादरीकरण नसते, तर ते अनेकदा लोकांच्या मनातील अस्वस्थतेला दिशा देण्याचे माध्यम असते. मात्र प्रत्येक भाषणातून नवा विचार, नवी माहिती किंवा पुढील वाटचालीसाठी ठोस दिशा मिळणेही तितकेच महत्त्वाचे असते.

पुढे काही वेळानंतर भाषणांमधील मुद्द्यांची पुनरावृत्ती जाणवू लागली. अनेकदा सार्वजनिक व्यासपीठांवर भावना तीव्र असतात. परंतु त्याच भावना पुन्हा पुन्हा व्यक्त होत राहिल्या, तर श्रोत्यांचे लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. आमच्याही बाबतीत काहीसे असेच झाले. उन्हाचा तडाखा, गर्दी आणि भाषणांमधील पुनरावृत्ती यांमुळे आम्ही तेथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ मोर्चाच्या उद्देशाबद्दल उदासीनता असा नव्हता. उलट, सामाजिक प्रश्नांवर होणाऱ्या चर्चेत आशयपूर्ण मांडणी, अभ्यासपूर्ण भूमिका आणि कृतीची दिशा यांना किती महत्त्व आहे, याची जाणीव अशा अनुभवांतून अधिक ठळक होते.

आमच्यासोबत असलेल्या शाहिरांनी पुढे इंडिया गेटला भेट देण्याचा प्रस्ताव मांडला. मुंबईत आलोच आहोत, तर शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देऊन तेथील वातावरण अनुभवावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या या प्रस्तावाला आम्ही सर्वांनी संमती दिली आणि पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली. सामाजिक मोर्चातील गंभीर वातावरणातून बाहेर पडून मुंबईच्या रस्त्यांवरून पुढे जाताना आमच्या गप्पांचा विषयही बदलला. शहराचा इतिहास, त्याची भौगोलिक रचना, सांस्कृतिक वारसा आणि बदलत्या जीवनशैलीविषयी चर्चा सुरू झाली. त्यामुळे या एकदिवसीय प्रवासातील प्रत्येक टप्पा हा जणू वेगळ्या अनुभवाची सुरुवात ठरत होता.

मात्र मुंबईचे हवामान आमच्यातील एका मित्रासाठी अर्थात कवी महाशयांसाठी मोठे आव्हान ठरत होते. तर आमचे ते कवी-लेखक मित्र स्वभावाने अत्यंत मोकळे, दिलखुलास आणि विनोदी स्वभावाचे. त्याच्या बोलण्यात सहजपणा होता आणि एखाद्या गंभीर प्रसंगातही ते आपल्या मिश्किल टिप्पणीने वातावरण हलके करू शकत असे. परंतु मुंबईतील दमट हवा आणि प्रचंड उकाड्याने त्याची चांगलीच दमछाक केली होती. त्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता आणि नेहमी उत्साहाने बोलणारा हा मित्र काहीसा शांत झाला होता. त्यांच्या या अवस्थेकडे पाहून आम्हाला गंमतही वाटत होती आणि त्याची काळजीही वाटत होती.

सकाळी प्रवासादरम्यान त्यांनी एक भन्नाट घोषणा अर्थात बातमीवजा टॅगलाईन तयार केली होती,'मांगांनी केली मुंबई जाम आणि विरोधकांना फुटला घाम!'. कारण सामाजिक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा त्याच्या विनोदी आणि कल्पक स्वभावातून सहजपणे बाहेर पडली होती. मात्र मुंबईच्या उकाड्यात ते स्वत: घामाघूम झाल्यानंतर त्यानी त्या घोषणेची स्वतःच दुरुस्ती केली की, 'मुंबई केली मांगांनी जाम आणि मांगांनाच फुटला घाम!'. स्वतःवर विनोद करण्याची ही वृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक महत्त्वाची बाजू होती. स्वतःचीच खिल्ली उडवण्याची तयारी असली की, विनोदात कटुता राहत नाही. उलट, तो अधिक जिवंत आणि मनमोकळा होतो. मात्र त्यांच्या या दुसऱ्या घोषणेवर आमच्यात पुन्हा एकदा हशा पिकला.

या कवी-लेखक मित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मनात आलेली गोष्ट ते फारशी आडकाठी न ठेवता बोलून दाखवत असतात. त्यांची विनोदबुद्धी तल्लख आहे. एखाद्या प्रसंगातील विसंगती टिपून त्यावर अचूक टिप्पणी करणे, किंवा एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून विनोदाचा धागा पकडणे आणि त्यातून सगळ्यांना हसवणे, हे त्यांना सहज जमते. मात्र त्यांच्या या मिश्किल स्वभावामुळे आमचे एक कंत्राटदार मित्र अनेकदा वैतागून जातात. असो, कवी मित्राच्या एखाद्या टिप्पणीचा आम्ही दररोज आनंद घेत असतो. त्यांच्या स्वभावातील ही भिन्नता प्रवासाला आणखी रंगत आणत होती. एकाच प्रसंगाकडे प्रत्येक जण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो, याचे हे छोटेसे उदाहरण होते.

उन्हामुळे आणि दमट हवेमुळे थकलेल्या आमच्या 'त्या' कवी मित्राला समुद्रकिनाऱ्यावरील थंड वाऱ्याची प्रतीक्षा होती. अखेर आम्ही मरीन ड्राइव्ह परिसरात पोहोचलो. समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण केला होता. दिवसभराच्या उकाड्याने त्रस्त झालेल्या आमच्या कवी मित्रांच्या चेहऱ्यावरही आता प्रसन्नता दिसू लागली. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले आणि त्यांची विनोदबुद्धीही पुन्हा जागी झाली. काही वेळापूर्वी शांत बसलेला हा मित्र पुन्हा पूर्वीसारखा बोलू लागले होते. त्यांच्या या बदललेल्या मूडने आमच्याही मनावरील प्रवासाचा थकवा काही प्रमाणात हलका केला होता.

मरीन ड्राइव्हचा परिसर म्हणजे मुंबईच्या सांस्कृतिक आणि नागरी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग. एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला शहराची गजबज, दूरवर पसरलेली इमारतींची रांग आणि समुद्रकिनाऱ्यावर निवांत वेळ घालवण्यासाठी जमलेली माणसे, असे तेथील वातावरण होते. आम्ही समुद्राकडे पाहत शहराच्या इतिहासाविषयी, मुंबईच्या विकासाविषयी आणि या शहराने विविध समाजघटकांना दिलेल्या संधींविषयी चर्चा करू लागलो. मुंबई हे केवळ आर्थिक व्यवहारांचे केंद्र नाही, तर विविध भाषा, संस्कृती, विचार आणि जीवनशैली यांचा संगम असलेले शहर आहे. या शहराने अनेकांना रोजगार दिला, स्वप्नांना आकार दिला आणि असंख्य संघर्षमय जीवनकथांना साक्षीदार म्हणून अनुभवले आहे.

समुद्राकडे पाहताना आमच्यासोबत असलेल्या शाहिरांनी समुद्राच्या पाण्याची पातळी पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्यासारखी वाटत असल्याची खंत व्यक्त केली. शिवाय समुद्राच्या बदलत्या स्वरूपाविषयी आणि पर्यावरणातील बदलांविषयी त्यांची निरीक्षणे नोंदवली. समुद्र हा केवळ निसर्गाचा देखावा नसतो, तर तो शहराच्या पर्यावरणाचा, अर्थव्यवस्थेचा आणि लोकजीवनाचा अविभाज्य भाग असतो. समुद्रकिनाऱ्यावरील बदल, वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि हवामानातील बदल यांसारखे विषयही अशा वेळी चर्चेत येतात. आमच्या गप्पा कधी सामाजिक प्रश्नांकडे, कधी इतिहासाकडे, तर कधी निसर्ग आणि मानवी जीवनाच्या परस्परसंबंधांकडे वळत होत्या.

संध्याकाळ हळूहळू गडद होत होती. पण मरीन ड्राइव्हवर गर्दी वाढू लागली होती. कुणी समुद्राच्या लाटांकडे पाहत निवांत बसले होते, कुणी मित्रमंडळींसोबत गप्पा मारत होते, तर कुणी आपल्या जोडीदारासोबत एकांताचे क्षण शोधत होते. तरुणाईचा उत्साह, प्रेमात असलेल्या जोडप्यांची जवळीक, कुटुंबांसोबत आलेल्या लोकांचा आनंद आणि शहराच्या धावपळीपासून काही काळ दूर जाण्याची इच्छा, हे सारे एकाच परिसरात दिसत होते. आम्हीही एका ठिकाणी बसून गप्पा मारू लागलो, काही छायाचित्रे काढली आणि त्या वातावरणाचा आनंद घेत राहिलो. पुढे घडलेल्या एका अनपेक्षित प्रसंगाने मात्र आमच्या या साध्याशा भेटीला वेगळेच वळण दिले.

मरीन ड्राइव्हवरची संध्याकाळ आता चांगलीच रंगात आली होती. दिवसभराच्या धावपळीनंतर समुद्राच्या काठावर निवांत बसलेली माणसे, समुद्राच्या लाटांचा आवाज, समोर उजळत जाणाऱ्या मुंबईच्या इमारती आणि रस्त्यावरची अखंड वाहतूक, या सगळ्यामुळे वातावरणाला एक वेगळीच जिवंतता आली होती. कुणी कुटुंबासोबत आले होते, कुणी मित्रमंडळींसोबत, तर कुणी आपल्या जोडीदारासोबत. तरुण मुलामुलींचीही मोठी गर्दी होती. कुणी हातात हात धरून बसले होते, कुणी एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेवले होते, कुणी गळ्यात हात टाकून गप्पा मारत होते, तर कुणी एकमेकांच्या सहवासात पूर्णपणे रमून गेले होते. मुंबईसारख्या महानगरात सार्वजनिक जागा या केवळ प्रवासासाठी किंवा पर्यटनासाठी नसतात, तर त्या शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आरसाही असतात.

आम्हीही समुद्राकडे पाहत, गप्पा मारत आणि अधूनमधून छायाचित्रे काढत निवांत बसलो होतो. आमच्या गप्पांमध्ये कधी राजकारण, कधी समाजकारण, कधी साहित्य, कधी इतिहास, तर कधी मुंबईच्या बदलत्या जीवनशैलीचा विषय येत होता. आमच्यासोबत असलेले कवी-लेखक मित्र पुन्हा एकदा आपल्या मूळ स्वभावात आले होते. काही वेळापूर्वी उकाड्याने त्रस्त झालेला हा माणूस आता समुद्राच्या वाऱ्यामुळे अगदी खुलला होता. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा मिश्कील भाव होते आणि प्रत्येक प्रसंगातून विनोदाचा धागा शोधण्याची त्याची नजर पुन्हा सक्रिय झाली होती. त्याचवेळी त्यांचे लक्ष आमच्या आसपास बसलेल्या एका तरुण जोडप्याकडे गेले. दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ बसले होते. आजूबाजूला लोकांची गर्दी होती. मात्र त्या दोघांचे लक्ष जणू स्वतःच्या जगातच होते. काही क्षणांनी त्यांनी एकमेकांचे चुंबन घेतले. आजूबाजूच्या काही लोकांचे लक्ष त्या दिशेने गेले, तर काहींनी ते पाहूनही दुर्लक्ष केले. शहरातील सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची जवळीक आज पूर्णपणे अनोळखी बाब राहिलेली नाही. मात्र आमच्या समूहातील काही जणांसाठी तो क्षण अचानक लक्षवेधी ठरला आणि पुढची काही मिनिटे आमच्या गप्पांचा विषयच बदलून गेला.

'त्या' कवी मित्रांच्या मेहुण्याने ते दृश्य पाहून सहज उद्गार काढले की, 'अरे हे काय? दिवसाच सुरू झाले!' त्याच्या आवाजात गंभीर आक्षेपापेक्षा अचानक दिसलेल्या प्रसंगाचे आश्चर्य आणि मिश्किलपणा अधिक होता. आम्ही सगळे त्या प्रतिक्रियेवर हसलो. मीही त्या क्षणी विनोदाच्या ओघात सांगितले की, 'ती मुलगी आग्रह करत आहे. पण मुलगा काहीसा संकोच करत आहे'. अर्थात, हा केवळ त्या क्षणाचे बाहेरून दिसलेले आमचे आकलन होते. त्या दोघांच्या मनात काय होते, त्यांची परिस्थिती काय होती किंवा त्यांच्या नात्याचे स्वरूप काय होते, हे आम्हाला माहीत नव्हते. आणि कदाचित माणसांच्या खासगी क्षणांबद्दल एवढेच लक्षात ठेवणे आवश्यक असते. बाहेरून दिसणाऱ्या काही सेकंदांवरून संपूर्ण कथा ठरवता येत नाही.

पण आमचे कवी-लेखक मित्र कुठे थांबणार होते? त्यांनी आजूबाजूच्या वातावरणाकडे पाहिले, आकाशाकडे नजर केली आणि अगदी निर्विकार चेहऱ्याने एकच वाक्य उच्चारले की, 'धरणीमाय तापली!'. परंतु त्या चार शब्दांनी आम्हाला अक्षरशः हसवून सोडले. समुद्रकिनाऱ्यावर उकाडा, तरुणाईचे प्रेम, जवळीक आणि वातावरणातील एक प्रकारची उष्णता या सगळ्याला त्यांनी निसर्गाच्या भाषेत एका वाक्यात पकडले होते. कारण त्यांच्या त्या वाक्यात कोणताही उपदेश नव्हता, कोणताही नैतिक निर्णय नव्हता. फक्त प्रसंगाचे विनोदी निरीक्षण होते. त्यामुळे मी त्यांना लगेच म्हणालो की, 'अरे, यार तुम्ही तर निसर्गकवी ना.धों.महानोर यांना सुध्दा केवळ एका ओळीत मागे टाकलं!'. माझ्या या वाक्यावर आमच्यात पुन्हा एकदा हशा पिकला. महानोरांच्या कवितेत निसर्ग, माती, ऋतू, प्रेम आणि ग्रामीण जीवन यांचा जो विलक्षण संगम आढळतो, त्याची आठवण अशा प्रसंगात होणे स्वाभाविकच होते. मात्र आमच्या मित्राने त्या क्षणी निर्माण केलेली 'धरणीमाय तापली' ही उपमा इतकी अनपेक्षित होती की, ती आमच्यासाठी 'त्या' संपूर्ण प्रवासाचीच एक लक्षात राहणारी आठवण बनली.

या प्रसंगात विशेष गंमत अशी होती की, काही क्षणांपूर्वी आम्ही समाजव्यवस्था, इतिहास, साहित्य आणि सार्वजनिक प्रश्नांवर गंभीर चर्चा करत होतो. आणि अचानक एका चुंबनामुळे आमची चर्चा प्रेम, जवळीक, तरुणाई आणि सार्वजनिक वर्तनापर्यंत येऊन पोहोचली होती. तसंही माणसाच्या आयुष्यात असेच असते. एका क्षणी आपण मोठ्या सामाजिक प्रश्नांवर चिंतन करत असतो आणि दुसऱ्याच क्षणी एखादा छोटासा प्रसंग आपल्या विचारांची दिशा बदलतो. कधी एखादा शब्द, कधी एखादा चेहरा, कधी एखादी घटना आणि कधी एखादे हास्य या सगळ्यांतून आयुष्य आपल्याला काहीतरी शिकवत असते.

थोड्याच वेळात आम्ही रस्ता ओलांडण्यासाठी उभे राहिलो. सिग्नल बदलण्याची वाट पाहत आम्ही सर्वजण एकत्र होतो. रस्ता ओलांडल्यानंतर पुढे जाताना अचानक लक्षात आले की, आमचे कवी मित्र पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत आहेत. ते ज्या जोडप्याकडे आधी पाहत होता, त्याच दिशेने त्याची नजर पुन्हा पुन्हा जात होती. आम्ही पुढे चाललो होतो. पण त्याचे कुतूहल अजून मागेच अडकले होते. एकदा ते थांबले, पुन्हा मागे पाहिले. मग वाहनांच्या मधून डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना हाक मारली, तरी त्यांची नजर काही क्षण त्या दिशेनेच होती. अखेर ते आमच्यात येऊन मिसळले. पुढे 'त्या' जोडप्याचे चुंबन कधी संपले? माहिती नाही.

मात्र या घटनेकडे केवळ विनोद म्हणून पाहणे पुरेसे नाही. कारण एका सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या छोट्याशा प्रसंगातून समाजातील बदलत्या मूल्यव्यवस्थेचा, प्रेमाकडे पाहण्याच्या बदलत्या दृष्टिकोनाचा आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या मर्यादांचा प्रश्नही समोर येतो. आजच्या तरुण पिढीसाठी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत मागील पिढ्यांपेक्षा वेगळी असू शकते. हातात हात घेणे, मिठी मारणे, एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेवणे किंवा चुंबन घेणे, या गोष्टी अनेक तरुणांसाठी प्रेम आणि जवळिकीच्या स्वाभाविक अभिव्यक्ती असू शकतात. त्याकडे पाहताना पिढ्यांमधील मूल्यभेद लक्षात घेणे आवश्यक आहे.

भारतीय समाजात प्रेमाची अभिव्यक्ती कधीच अस्तित्वात नव्हती, असेही नाही. आपल्या साहित्यापासून शिल्पकलेपर्यंत, लोकपरंपरांपासून भक्तीपरंपरेपर्यंत प्रेमाच्या विविध रूपांचे उल्लेख आढळतात. मात्र सार्वजनिक जीवनात प्रेमाची शारीरिक अभिव्यक्ती कितपत स्वीकारली जावी, हा प्रश्न काळानुसार आणि समाजानुसार बदलत गेला आहे. शहरांचे स्वरूप बदलले, तरुणाईचे जग बदलले, संवादाची साधने बदलली आणि व्यक्तिस्वातंत्र्याविषयीची चर्चा अधिक व्यापक झाली. त्यामुळे आजच्या पिढीच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीकडे जुन्या चौकटीतूनच पाहणे पुरेसे ठरणार नाही.

प्रेम ही मानवी जीवनातील अत्यंत मूलभूत भावना आहे. आईचे लेकरावरचे प्रेम, मित्रांचे मैत्रीतील प्रेम, भावंडांचे प्रेम, पती-पत्नीचे प्रेम, प्रियकर-प्रेयसीचे प्रेम किंवा माणसाचे आपल्या मातीतले प्रेम-प्रेमाची रूपे अनेक आहेत. प्रेमाला अभिव्यक्तीची गरज असते. मात्र त्या अभिव्यक्तीबरोबर परस्पर संमती, सन्मान आणि परिस्थितीची जाणीवही महत्त्वाची असते. कोणत्याही व्यक्तीच्या खासगी क्षणाचा उपहास, छळ किंवा जबरदस्तीने हस्तक्षेप करणे योग्य ठरत नाही. आमच्या त्या प्रसंगातील कुतूहल हेही अखेरीस एका अनपेक्षित दृश्यामुळे निर्माण झालेले होते. त्या दोघांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा आमचा हेतू नव्हता.

आपल्या समाजात प्रेम आणि सार्वजनिक शिष्टाचार यांच्यातील सीमारेषा यावर अनेकदा चर्चा होते. एका बाजूला व्यक्तीला आपल्या भावनांची अभिव्यक्ती करण्याचे स्वातंत्र्य आहे, तर दुसऱ्या बाजूला सार्वजनिक जागा ही सर्वांची असते. त्यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सार्वजनिक संवेदनशीलता यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. प्रेम व्यक्त करणे आणि इतरांना अस्वस्थ करण्याच्या पातळीवर सार्वजनिक वर्तन करणे, या दोन गोष्टी एकसारख्या मानता येणार नाहीत. या फरकाची जाणीव समाजातील सर्वच घटकांना असणे गरजेचे आहे. चुंबनाचा इतिहास हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाइतकाच व्यापक आणि विविधतेने नटलेला आहे. चुंबन नेमके कधी आणि कुठे सुरू झाले, याबाबत संशोधकांमध्ये एकमत नाही. उत्क्रांतीशास्त्राच्या दृष्टीने चुंबनाचा संबंध पूर्वज प्राण्यांच्या परस्पर स्वच्छता राखण्याच्या वर्तनाशी असावा, अशी एक संकल्पना मांडली जाते. काही संशोधक त्याचा संबंध मातृत्व, बालसंगोपन आणि अन्नाच्या देवाणघेवाणीशी जोडतात. तर काही अभ्यासक चुंबनाला सामाजिक जवळीक, विश्वास आणि भावनिक बंध दृढ करण्याचे माध्यम मानतात. चुंबनाच्या उगमाविषयी कोणतीही एकच संकल्पना अंतिम सत्य म्हणून स्वीकारता येत नसली, तरी विविध संस्कृतींमध्ये हजारो वर्षांपासून चुंबनाचा वापर प्रेम, स्नेह, आदर आणि आत्मीयता व्यक्त करण्यासाठी होत असल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. पण वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये चुंबनाचा अर्थ वेगळा राहिला आहे. कुठे ते प्रेमाचे प्रतीक आहे, कुठे अभिवादनाचे, कुठे स्नेहाचे, तर कुठे धार्मिक किंवा सांस्कृतिक विधींचाही भाग राहिले आहे. म्हणजेच चुंबन ही केवळ प्रणयाची अभिव्यक्ती नाही. तिचे अर्थ आणि सामाजिक संदर्भ विविध आहेत. काळ बदलला तसे त्याकडे पाहण्याचे दृष्टिकोनही बदलले.

इतिहासाच्या पानांवर नजर टाकली, तर प्राचीन मेसोपोटेमिया आणि सुमेरियन संस्कृतींमध्ये चुंबनाचे उल्लेख आढळतात. काही प्राचीन सुमेरियन लिखित साहित्यामध्ये प्रेमीयुगुलांच्या चुंबनाचे वर्णन सापडते. प्राचीन इजिप्त, ग्रीस आणि रोम यांसारख्या संस्कृतींमध्येही चुंबनाला विविध सामाजिक आणि भावनिक संदर्भ होते. रोमन संस्कृतीत चुंबनाचे वेगवेगळे प्रकार ओळखले जात होते. काही चुंबने नातेवाईकांमधील स्नेह व्यक्त करण्यासाठी, काही सामाजिक अभिवादनासाठी, तर काही प्रणय आणि उत्कटतेची अभिव्यक्ती म्हणून वापरली जात होती. म्हणजेच चुंबन ही केवळ आधुनिक काळातील फॅशन नसून मानवी संस्कृतीच्या प्रदीर्घ प्रवासात विविध रूपांनी विकसित झालेली एक अभिव्यक्ती आहे. चुंबनाच्या परंपरेत आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याचे सांस्कृतिक वैविध्य. जगातील प्रत्येक समाजात प्रेम व्यक्त करण्याची पद्धत सारखी नसते. काही संस्कृतींमध्ये चुंबन हे प्रणयाचे महत्त्वाचे प्रतीक मानले जाते, तर काही संस्कृतींमध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठी इतर प्रकारच्या शारीरिक किंवा सांकेतिक अभिव्यक्तींना अधिक महत्त्व दिले जाते. काही समाजांमध्ये गालावर चुंबन घेणे हे केवळ अभिवादनाचे माध्यम असते, तर काही ठिकाणी आलिंगन, हस्तांदोलन किंवा नाकाने नाकाला स्पर्श करणे या पद्धतींना महत्त्व असते. त्यामुळे एखाद्या संस्कृतीत स्वीकारार्ह असलेली अभिव्यक्ती दुसऱ्या संस्कृतीत अस्वस्थता निर्माण करू शकते. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली, तर चुंबनाच्या बाबतीत समाजातील मतभिन्नता ही केवळ पिढ्यांमधील दरी नसून सांस्कृतिक जडणघडण आणि सामाजिक मूल्यांच्या विविधतेशीही संबंधित आहे.

याच संदर्भात २०१४ मध्ये केरळमध्ये सुरू झालेल्या 'किस ऑफ लव्ह' मोहिमेचा उल्लेख करणेही महत्त्वाचे ठरते. सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करण्यावरून होणाऱ्या नैतिक पोलिसगिरीला विरोध करण्याच्या उद्देशाने या मोहिमेला सुरुवात झाली होती. सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणे आणि त्याला अश्लीलतेच्या चौकटीत बसवून विरोध करणे, या मुद्द्यांवर देशभरात चर्चा झाली. या मोहिमेला काही तरुणांचा पाठिंबा मिळाला, तर काही संघटनांनी त्याला विरोध केला. कायद्याचा आधार घेत सार्वजनिक नैतिकतेचे समर्थन करणारे आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहणारे असे विविध दृष्टिकोन या चर्चेत समोर आले. या घटनेने सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करण्याचा प्रश्न केवळ वैयक्तिक वर्तनापुरता मर्यादित नसून, तो समाजातील स्वातंत्र्य, नैतिकता, सार्वजनिक शिष्टाचार आणि व्यक्तीच्या प्रतिष्ठेशी जोडलेला असल्याचे अधोरेखित केले.

अश्लीलतेच्या कायदेशीर संकल्पनेविषयी बोलताना भारतीय न्यायव्यवस्थेतील काही महत्त्वाच्या निर्णयांचा संदर्भही उपयुक्त ठरतो. सर्वोच्च न्यायालयाने रंजित उदेशी प्रकरणात अश्लीलतेविषयी विचार करताना साहित्य, अभिव्यक्ती आणि सार्वजनिक नैतिकता यांच्यातील संबंधांवर चर्चा केली. पुढे अवीक सरकार प्रकरणात समकालीन सामाजिक निकषांच्या आधारे अश्लीलतेचे मूल्यमापन करण्याच्या दृष्टिकोनाला महत्त्व प्राप्त झाले. सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृतीसंबंधी पूर्वी भारतीय दंड संहितेतील कलम २९४ लागू होत असे. या तरतुदीत अश्लील कृती आणि इतरांना होणारा त्रास या घटकांचा विचार केला जात असे. आता लागू असलेल्या भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदी आणि त्यांचा न्यायालयीन अर्थ परिस्थितीनुसार तपासणे आवश्यक आहे. कायद्याचा उद्देश केवळ समाजातील एखाद्या गटाच्या नैतिक अपेक्षांना प्राधान्य देणे नसून, सार्वजनिक सभ्यता, वैयक्तिक प्रतिष्ठा आणि मूलभूत स्वातंत्र्य यांच्यात संतुलन राखणे हा आहे.

अगदी सांगायचं झालं तर सन २००७ मध्ये अभिनेता रिचर्ड गेरे यांनी एका एड्स जनजागृती कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या गालावर चुंबन घेतल्याच्या घटनेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात शिल्पा शेट्टी यांच्यावर अश्लीलतेचे आरोप करण्यात आले होते. पुढे मुंबईतील सत्र न्यायालयाने त्यांच्याविरुद्धच्या कारवाईत पुरेशा आधाराचा अभाव असल्याचे नमूद करत त्यांना दिलासा दिला. न्यायालयाने शिल्पा शेट्टी यांनी चुंबन घेतले नव्हते, तर त्यांना चुंबन देण्यात आले होते, या बाबीचाही विचार केला. या प्रकरणाने सार्वजनिक ठिकाणी प्रेम किंवा स्नेह व्यक्त करण्याच्या कृतीकडे पाहताना संदर्भ, व्यक्तीची भूमिका आणि कायदेशीर घटक यांचा विचार किती महत्त्वाचा आहे, हे स्पष्ट केले. मात्र हा सत्र न्यायालयाचा विशिष्ट प्रकरणातील निर्णय होता. त्याला सर्वोच्च न्यायालयाचा सर्वसाधारण निर्वाळा समजणे योग्य ठरणार नाही.

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानेही दरवर्षी प्रेमाच्या सार्वजनिक अभिव्यक्तीवर चर्चा होते. काही जण त्याला तरुणाईच्या भावनांचा उत्सव मानतात, तर काही जण त्याच्या व्यापारीकरणावर किंवा सामाजिक परिणामांवर प्रश्न उपस्थित करतात. या सगळ्या मतभेदांच्या पलीकडे एक साधी वस्तुस्थिती मात्र मान्य करावी लागते की, प्रेम ही भावना कोणत्याही एका दिवसापुरती मर्यादित नसते. ती मानवी नात्यांच्या मुळाशी असते. तिचे स्वरूप, अभिव्यक्ती आणि सामाजिक स्वीकार मात्र काळानुसार बदलत राहतात. आणि म्हणूनच मरीन ड्राइव्हवर दिसलेले ते काही सेकंद आजही आठवले की हसू येते. कारण त्या क्षणात काही मोठे घडले नव्हते. पण आमच्या कवी मित्राचे 'धरणीमाय तापली' हे चार शब्द आठवणींच्या कप्प्यात कायमचे साठवले गेले.

कधी-कधी एखाद्या प्रवासाची खरी मजा आपण कुठे गेलो, यामध्ये नसते. तर वाटेत आपण कोणाला भेटलो, काय पाहिले, कशावर हसलो आणि कोणता क्षण मनात कायमचा साठवून आणला, यामध्ये असते. त्या दिवशी आम्ही मुंबई पाहिली. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे आम्ही आमच्या मित्रांना पुन्हा नव्याने पाहिले. आणि एका अनपेक्षित चुंबनाने सुरू झालेला तो विनोदी प्रसंग शेवटी प्रेम, स्वातंत्र्य, सामाजिक संकेत आणि मानवी भावनांवर विचार करायला लावणारी आठवण बनून राहिला. कारण 'धरणीमाय तापली' या चार शब्दांवर आम्ही त्या दिवशी कितीही हसलो असलो, तरी त्या छोट्याशा प्रसंगाने मनात काही प्रश्न सुध्दा निर्माण केले आहेत. त्यानुसार प्रेम व्यक्त करण्याची पद्धत बदलली आहे का, की प्रेमाकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलली आहे? कदाचित दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडत असाव्यात. प्रत्येक पिढी आपापल्या काळाच्या सामाजिक चौकटीत प्रेम अनुभवते आणि व्यक्त करते. पूर्वी भावना मनात ठेवणे, पत्रातून व्यक्त करणे किंवा भेटीच्या काही मोजक्या संधींमध्ये प्रेम व्यक्त करणे सामान्य मानले जात असे. पण आज मोबाईल, सोशल मीडिया, सार्वजनिक जागा आणि बदलती जीवनशैली यामुळे प्रेमाची अभिव्यक्ती अधिक उघड झाली आहे.

खरं म्हणजे 'प्रेम' ही केवळ दोन व्यक्तींमधील भावना नाही, तर ती माणसाच्या अस्तित्वाशी जोडलेली भावनिक गरज आहे. आपल्याला कुणीतरी समजून घ्यावे, आपल्या आनंदात सहभागी व्हावे, दुःखाच्या वेळी हात धरावा आणि आपले अस्तित्व कोणासाठी तरी महत्त्वाचे आहे, अशी जाणीव प्रत्येक माणसाला कुठल्या ना कुठल्या रूपात हवी असते. त्यामुळे प्रेमाला फक्त प्रणयाच्या चौकटीत बंदिस्त करणे योग्य नाही. प्रेमाचे अनेक रंग आहेत आणि प्रणय हा त्यातील एक रंग आहे. अगदी इतिहास आठवून बघा. चुंबनाची ही परंपरा जगातील अनेक समाजांमध्ये फार जुनी आहे. प्राचीन लिखाण, साहित्य, कलाकृती आणि विविध सांस्कृतिक परंपरांमध्ये चुंबनाचा उल्लेख वेगवेगळ्या अर्थांनी आढळतो. काही संस्कृतींमध्ये ते प्रणयाचे प्रतीक होते, काही ठिकाणी स्नेहाचे, तर काही ठिकाणी अभिवादनाचे किंवा नातेसंबंधातील जवळिकीचे प्रतीक होते. म्हणजेच चुंबन ही आधुनिक काळाने निर्माण केलेली गोष्ट नाही. आधुनिक काळाने मात्र त्याच्या सार्वजनिक अभिव्यक्तीला वेगळा सामाजिक आणि कायदेशीर संदर्भ दिला आहे.

भारतीय संस्कृतीविषयी बोलताना आपण अनेकदा आपल्या परंपरांचा उल्लेख करतो. भारतीय साहित्य, शिल्पकला, लोकपरंपरा आणि भक्तीपरंपरेत प्रेमाच्या विविध रूपांना स्थान मिळालेले आहे. प्रेम आणि कामभावना या मानवी जीवनातील नैसर्गिक भावनांचा भाग असल्याची जाणीव भारतीय विचारपरंपरेतही होती. मात्र त्याच वेळी सामाजिक शिष्टाचार, परिस्थितीचे भान आणि सार्वजनिक वर्तन यांनाही महत्त्व दिले गेले. त्यामुळे आधुनिक समाजात व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार करताना सामाजिक संवेदनशीलतेचाही विचार करणे आवश्यक ठरते. शिवाय आजच्या तरुण पिढीकडे पाहताना एक गोष्ट स्पष्ट जाणवते की, त्यांना भावनांविषयी बोलण्याची भीती तुलनेने कमी आहे. प्रेम, मैत्री, नातेसंबंध, आकर्षण, मानसिक जवळीक याबद्दल ते मोकळेपणाने बोलतात. प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीही अधिक खुल्या झाल्या आहेत. मिठी मारणे, हातात हात घेणे, एकमेकांच्या जवळ बसणे किंवा चुंबन घेणे, या गोष्टी काही तरुणांसाठी प्रेमाच्या स्वाभाविक अभिव्यक्ती आहेत. त्यामुळे त्याकडे पाहताना जुन्या आणि नव्या पिढीतील मूल्यभेद समजून घेणे महत्त्वाचे आहे.

शेवटी, प्रेम ही माणसाला माणसाशी जोडणारी सर्वांत सुंदर भावना आहे. तिचे स्वरूप काळानुसार बदलू शकते, तिच्या अभिव्यक्तीची माध्यमे वेगवेगळी असू शकतात आणि तिच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही बदलू शकतो. मात्र प्रेमामागील आत्मीयता, विश्वास, जिव्हाळा आणि आपलेपणाची भावना ही मानवी जीवनाला अर्थ देणारी आहे. समुद्राच्या लाटांप्रमाणेच आयुष्यातही अनेक चढ-उतार येत असतात. कधी उन्हाच्या झळा सहन कराव्या लागतात, तर कधी थंडगार वाऱ्याचा सुखद स्पर्श लाभतो. कधी सामाजिक संघर्षात उभे राहावे लागते, तर कधी मित्रांच्या सहवासात मनमुराद हसण्याची संधी मिळते. आणि कधी एखाद्या अनपेक्षित प्रसंगातून प्रेमाचा नवा अर्थ उमगतो. त्या दिवशी मरीन ड्राईव्हवर आम्ही पाहिलेले प्रेमीयुगुल कदाचित आजही आपल्या आयुष्यात पुढे गेले असेल. त्यांचे चुंबन नेमके कधी संपले, त्यानंतर ते कुठे गेले आणि त्यांच्या आयुष्यात पुढे काय घडले, याची आम्हाला कल्पना नाही. मात्र त्यांच्या त्या एका क्षणाने आमच्या आठवणींच्या विश्वात एक सुंदर जागा निर्माण केली, हे निश्चित. त्या संध्याकाळी समुद्राच्या लाटांनी किनाऱ्याला स्पर्श केला, थंडगार वाऱ्याने आमचा थकवा दूर केला आणि एका कवीच्या विनोदाने प्रेमाच्या अभिव्यक्तीला चिंतनाची जोड दिली. अखेर आयुष्य म्हणजे तरी काय? संघर्षाच्या उन्हातही प्रेमाचा गारवा शोधणे, आपल्या माणसांसोबत हसत राहणे आणि दुसऱ्याच्या आनंदात अनावश्यक हस्तक्षेप न करता त्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणे. कदाचित यालाच खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगणे म्हणतात.

तसंही व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानेही दरवर्षी याच प्रकारचे प्रश्न समोर येतात. प्रेमाचा दिवस म्हणून तरुणाई त्याकडे पाहते, तर काही सामाजिक आणि सांस्कृतिक गट त्याला विरोध करतात. काही ठिकाणी प्रेम व्यक्त करणाऱ्या तरुणांना त्रास देण्याच्या घटनाही चर्चेत आल्या आहेत. मात्र प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीवर मतभेद असले तरी हिंसा, धमकी किंवा जबरदस्तीने कोणावर नैतिकता लादणे हा वेगळा प्रश्न आहे. मतभेद असू शकतात. परंतु मतभेद हाताळण्याची पद्धत ही लोकशाही समाजाच्या संस्कृतीचे लक्षण असते. कायद्याच्या बाबतीतही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेतले म्हणून प्रत्येक प्रसंग आपोआप गुन्हा ठरतो, असा सरसकट नियम नाही. सार्वजनिक अश्लीलतेशी संबंधित कायदेशीर तरतुदींचा संदर्भ घेताना संपूर्ण परिस्थिती, वर्तनाचे स्वरूप आणि त्याचा सार्वजनिक परिणाम यांचा विचार केला जातो. न्यायालयीन निर्णयांमध्येही विशिष्ट प्रकरणातील तथ्यांना महत्त्व असते. त्यामुळे 'सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणे म्हणजे गुन्हा' असा अर्थ होत नाही. 

पण महत्त्वाचे म्हणजे कायदा आणि समाजनीती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखादी कृती कायद्याने गुन्हा ठरत नाही. म्हणून प्रत्येक परिस्थितीत ती सामाजिकदृष्ट्या योग्यच ठरेल, असेही होत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या कृतीबद्दल समाजातील काही लोकांना अस्वस्थता वाटते, म्हणून ती सुध्दा आपोआप बेकायदेशीर ठरत नाही. त्यामुळे कायदेशीरता, सामाजिक स्वीकार आणि वैयक्तिक नैतिकता यांच्यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. प्रेमाच्या बाबतीत आणखी एक मूलभूत गोष्ट म्हणजे संमती. कोणतीही शारीरिक जवळीक परस्पर संमतीनेच असावी, ही आधुनिक मानवी नात्यांची अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. प्रेम असो, मैत्री असो किंवा कोणतेही वैयक्तिक नाते असो. दुसऱ्या व्यक्तीची इच्छा आणि मर्यादा यांचा सन्मान करणे आवश्यक आहे. बाहेरून पाहणाऱ्यांना एखादा प्रसंग रोमँटिक वाटू शकतो, विनोदी वाटू शकतो किंवा वेगळा वाटू शकतो. परंतु त्या दोन व्यक्तींमध्ये नेमके काय चालले आहे, हे त्यांनाच माहीत असते. म्हणूनच आपल्या निरीक्षणालाही मर्यादा असायला हव्यात.

त्या दिवशी मरीन ड्राइव्हवर आम्ही जे पाहिले, त्यावर आम्ही हसलो, विनोद केला आणि आमच्या मित्राने त्यावर एक भन्नाट वाक्यही तयार केले. पण त्या जोडप्याविषयी कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्याचा आम्हाला अधिकार नव्हता. ते कोण होते, त्यांचे नाते काय होते, त्यांच्यातील भावना काय होत्या किंवा त्या क्षणी ते नेमके काय अनुभवत होते, हे आम्हाला माहीत नव्हते. तसंही एका क्षणाचे दृश्य म्हणजे संपूर्ण आयुष्याची कथा नसते. माणसाला पाहणे सोपे आहे, पण माणसाला समजून घेणे महाकठीण आहे. याच ठिकाणी विनोद आणि संवेदनशीलता यांच्यातील सूक्ष्म रेषा समोर येते. एखाद्या प्रसंगावर हसणे मानवी स्वभाव आहे. परंतु त्या हसण्यातून कोणाच्या सन्मानाला धक्का बसू नये, याची जाणीव असणेही आवश्यक आहे. आमच्या गटातील विनोद हा प्रसंगापुरता होता आणि त्या अनोळखी व्यक्तींच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा हेतू नव्हता. उलट, आज त्या घटनेकडे मागे वळून पाहताना त्या क्षणातील आमचे कुतूहल आणि त्यानंतर निर्माण झालेले विचार यांच्यातील फरक अधिक स्पष्ट जाणवतो.

माणसांच्या आयुष्यात प्रेमाची गरज असते, तशीच सन्मानाचीही गरज असते. प्रेमात जवळीक असते. पण त्या जवळिकीमध्ये दुसऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान नसेल तर प्रेमाचे रूप बदलू शकते. म्हणूनच प्रेमाची खरी कसोटी केवळ भावना व्यक्त करण्यात नाही, तर समोरच्या व्यक्तीच्या इच्छा, स्वातंत्र्य आणि मर्यादा समजून घेण्यात आहे. हातात हात घेणे सोपे आहे. पण आयुष्याच्या कठीण काळात तो हात धरून ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. चुंबन हा प्रेमाचा एक क्षण असू शकतो. पण विश्वास, जबाबदारी आणि साथ ही प्रेमाची दीर्घकालीन रूपे आहेत. म्हणूनच आजच्या तरुणाईला प्रेमाबरोबरच नात्यांची जबाबदारीही समजून घेण्याची गरज आहे. सोशल मीडियामुळे नात्यांची सुरुवात सहज होते. संवाद वेगाने होतो. छायाचित्रे, संदेश आणि भावनिक प्रतिक्रिया क्षणात शेअर होतात. पण नातेसंबंधांची खरी ताकद डिजिटल जगात नव्हे, तर प्रत्यक्ष आयुष्यातील विश्वास, संयम आणि परस्पर आदरात असते. प्रेमाचा फोटो सुंदर असू शकतो; पण प्रेमाची खरी परीक्षा संकटाच्या काळात होते.

आपल्या पिढीनेही तरुणपण अनुभवले आहे आणि आजची पिढीही अनुभवत आहे. फरक एवढाच की काळ बदलला, साधने बदलली आणि अभिव्यक्तीची भाषा बदलली. पूर्वी पत्र लिहिले जात होते. आज संदेश पाठवला जातो. पूर्वी भेटीसाठी दिवस ठरवावा लागायचा. आज व्हिडिओ कॉल एका क्षणात होतो. पूर्वी भावना लपवण्यावर भर असायचा. आज त्यांची उघड अभिव्यक्ती अधिक दिसते. त्यामुळे नव्या पिढीकडे पाहताना तिच्या बदललेल्या भाषेचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. पण बदल स्वीकारणे म्हणजे प्रत्येक बदलाचे समर्थन करणे असेही नाही. समाजात काही मूल्ये अशी असतात ज्यांची चर्चा प्रत्येक पिढीला नव्याने करावी लागते. व्यक्तिस्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी, प्रेम आणि मर्यादा, खासगीपणा आणि सार्वजनिक जागा, अभिव्यक्ती आणि शिष्टाचार अशा सगळ्यांचा समतोल साधणे हेच प्रगल्भ समाजाचे लक्षण आहे. एका टोकाला अतिरेकी नैतिक बंधने आणि दुसऱ्या टोकाला पूर्ण बेफिकिरी, या दोन्ही टोकांपेक्षा विवेकपूर्ण मध्यममार्ग अधिक संवादक्षम ठरतो.

म्हणून मरीन ड्राइव्हवरचा तो प्रसंग केवळ 'कोणीतरी चुंबन घेतले' एवढ्यापुरता मर्यादित नाही. तर तो आपल्याला एका बदलत्या समाजाचे चित्र दाखवतो. जुन्या पिढीच्या नजरेत आश्चर्य, नव्या पिढीच्या नजरेत सहजता, मित्रांच्या गटात विनोद आणि विचार करणाऱ्या मनात अनेक प्रश्न हे सारे एकाच क्षणात सामावले होते. म्हणूनच त्या क्षणाची आठवण आजही आली की हसू येते आणि त्याच वेळी विचारही सुरू होतो. कदाचित त्या दिवशी आमच्या मित्राने 'धरणीमाय तापली' असे म्हटले नसते, तर हा प्रसंग एवढा लक्षात राहिला नसता. पण त्या चार शब्दांनी एका क्षणाला स्मृती दिली. विनोद कधी कधी विचारांची दारे उघडतो. गंभीर भाषणातून जे सांगता येत नाही, ते एखादा साधा विनोद सहज सांगून जातो. त्या दिवशी आम्ही हसलो. पण नंतर विचार केला तेव्हा जाणवले की प्रेम, तरुणाई, स्वातंत्र्य, सार्वजनिक शिष्टाचार आणि मानवी सन्मान या सगळ्यांवर चर्चा करण्याची संधी त्या एका क्षणाने दिली.

शेवटी प्रश्न चुंबनाचा नाही, तर प्रश्न आहे माणसाच्या भावनांचा सन्मान करण्याचा. प्रश्न प्रेम व्यक्त करण्याचा नाही, तर प्रश्न आहे ते व्यक्त करताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आणि सार्वजनिक वातावरणाचा विचार करण्याचा. प्रश्न तरुणाईला थांबवण्याचा नाही, तर प्रश्न तिच्याशी संवाद साधण्याचा आहे. आणि प्रश्न जुन्या पिढीने नव्या पिढीला शिकवण्याचा नाही, तर दोन्ही पिढ्यांनी एकमेकांकडून समजून घेण्याचा आहे. 'त्या' संध्याकाळी समुद्राच्या लाटांसोबत मुंबईच्या आकाशात अंधार दाटत गेला आणि आम्ही आपल्या मार्गाने पुढे निघालो. मागे राहिला मरीन ड्राइव्ह, समुद्राचा वारा, मुंबईची गर्दी आणि एक छोटासा प्रसंग. पण मनात राहिले मित्रांचे हसू, कवी मित्राची मिश्किल नजर आणि ते अविस्मरणीय चार शब्द, 'धरणीमाय तापली!'

तसंही कधी-कधी प्रवास आपल्याला स्थळे दाखवतो. कधी माणसे दाखवतो, तर कधी स्वतःच्याच विचारांकडे नव्याने पाहायला शिकवतो. मुंबईच्या 'त्या' प्रवासाने आम्हाला तिन्ही गोष्टी दिल्या. सामाजिक चळवळीची ऊर्जा, महानगराचे विविधरंगी जीवन आणि एका अनपेक्षित प्रसंगातून प्रेमाकडे पाहण्याची नवी दृष्टी. म्हणूनच 'तो' दिवस केवळ आठवणीत नाही, तर एका प्रश्नासह मनातही जिवंत आहे. त्यामुळे प्रेम व्यक्त करण्यापेक्षा प्रेम समजून घेणे अधिक महत्त्वाचे नाही का? आणि कदाचित या संपूर्ण प्रसंगाचा सर्वात सुंदर अर्थ हाच आहे की, माणूस म्हणून हसताही यावे, विचारही करता यावा आणि दुसऱ्याच्या भावनांचा सन्मानही करता यावा. कारण सामाजिक बदल हा केवळ कायदे बदलल्याने नाही, तर माणसांच्या विचार करण्याच्या पद्धती बदलल्याने होत असतो. त्यामुळे वर्तमान काळात प्रेमाची भाषा बदलू शकते, काळ बदलू शकतो, सार्वजनिक जीवनाची रूपे बदलू शकतात. पण माणुसकी, परस्पर सन्मान आणि संवेदनशीलता या मूल्यांची गरज कधीच संपत नाही. हो ना? 

#धरणीमाय_तापली
#प्रेमाच्या_ओलाव्यात_धरणीमाय_तापली
#मुंबई_डायरी
#मरीन_ड्राईव्ह
#पुणे_ते_मुंबई
#सामाजिक_मोर्चा
#आठवणींचा_प्रवास
#प्रेमाची_भाषा
#प्रेम_आणि_स्वातंत्र्य
#तरुणाईचं_प्रेम
#प्रेमाचा_सन्मान
#कवी_मित्र
#विनोद_आणि_विचार
#माणुसकी
#संवेदनशीलता
#KissOfLove
#व्यक्तिस्वातंत्र्य
#सामाजिक_संकेत
#पिढ्यांमधील_संवाद
#सोशल_मीडिया_आणि_प्रेम
#व्हॅलेंटाईन_डेला_पलीकडचे
#व्हायरल_पोस्ट

रविवार, 13 जून 2021

कवीमनाचा माणूस...

शब्दांना अनुभवाची जोड देऊन कवेत घेताना वाचकांच्या मनाला भिडणारी जाणीवासंपन्न कविता लिहिणारे संवेदनशील, माणुसकीचं बोन्साय होत असताना हातातल्या कुंचल्याप्रमाणे माणसाचे बेगडी रंग ओळखून मानवतेसाठी झटणारे कवी, पोरांना दांडगा आत्मविश्वास देणारे कार्यकर्ते, लिहित्या हातांना बळ देणारा माणूस, जाती-धर्माच्या भिंती तोडणारा वाटसरू, प्रबोधन आणि परिवर्तनाच्या वाटेवरचा वाटाड्या, विद्रोह, व्यथा आणि वेदना टिपणारा सजग कलमवीर, संकटाच्या काळातही 'आत्मनिर्भर' राहिलेला माणूस झालचं तर 'कविताजीवी' माणूस, देश 'कँशलेस' नको तर 'कास्टलेस' करा हे ठणकावून सांगणारा साथी... आणि हो सदैव जमिनीवर राहाणारा अवलिया माणूस......
अशी कितीतरी मोठी ओळख असणारे आमचे मित्र, मार्गदर्शक, मितवा, वाटाड्या मा.श्री. Sunil Ubale  यांना वाढदिवसाच्या बक्कळ (अगदी ग्लोबल टेडर काढून) शुभेच्छा.....
असेचं लिहित राहा...नेहमी आनंदी राहा...
मनभरून जगा... तुमच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्नांना ट्रकभर सदिच्छा... पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
#HappyBirthday
कवितेचारंगारी
#कविताजगणारामाणूस

बोलत्या ओठांना बळ देणारा माणूस - प्रा.डॉ. पांडूरंग कंद


अरे..तुम्ही खूप छान बोललात. संदर्भही छान दिलेत. पण या विषयावर असंही बोलता आलं असतं. हे ही मांडता आलं असतं.  एखाद्या विषयाची तयारी करताना हे वाचा. मी काय म्हणतोय..तुम्हाला यावर्षी  अमुक-तमुक विषयांवर बोलायचंय. त्यासाठीचे संदर्भ ग्रंथ आणि काही पुस्तके मी पाठवितो...अशी बरीच वाक्य माझ्यासह अनेक तरूणांना आणि तरूणींना ऐकविणारा वैखारीच्या वर्तुळातला अवलिया माणूस म्हणजे..निखळ...मनस्वी आणि स्वच्छंदी मनाचे आमचे मार्गदर्शक अभ्यासू संशोधक, प्रेमळ प्राध्यापक मा.डॉ. पांडूरंग कंद सर होय. समाज, साहित्य, कला, संस्कृती, लाइफस्टाइल अशा विविधांगी क्षेत्रात आपल्या नव्या दृष्टीकोनातून ते नेहमी मांडणी करीत असतात. गावखेड्यातल्या बोलणाऱ्या पोरांना नेहमीचं बळ देवून त्याच्या पाठीमागे ते सदैव उभे आहेत. याची प्रचिती सहज कोणालाही येवू शकते. एखाद्याला मान-सन्मान देण्याची कला त्यांच्याकडून शिकली पाहिजे. 'हे असं करा किंवा असं करायला हवं...हे करता येईल...असं हक्काने सांगणारा माझ्या आयुष्यातला वाटाड्या, मार्गदर्शक, सोबती म्हणजे पांडूरंग कंद सर. त्याच्या पुढाकाराने आणि प्रेमळ वागण्यातून वाड्या- वस्त्यांसह गावखेड्यातल्या अनेक पोरांना बोलण्याचं बळ मिळो, सरांची झेप उंच जावो, याचं सदिच्छेसह Pandurang Kand सर यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा...!!
🎂🎁🧁💐🎈🎊🎉

भूमिका घेणारा माणूस...

पुणे विद्यापीठात एम.ए ला असताना प्रा.डॉ.भगवान गव्हाडे सर होते. ते आधुनिक गद्य, आधुनिक पद्य आणि भारतीय साहित्य शिकवायचे. शिकवताना सतत गझलेचा किंवा चित्रपटांचा संदर्भ द्यायचे. त्यांचा आवाज सुध्दा घरंदाज गायकी प्रमाणे मंजुळ आणि सुरेख होता. मनोरंजातून साहित्य शिकवण्याची त्यांची कला विद्यार्थी वर्गावर प्रभाव टाकत होती. त्यामुळे ते विभागातील शिक्षकांसह ते सर्व विद्यार्थ्यांचे लाडके झाले होते. त्यात भर म्हणजे विद्यापीठाच्या 'फँकल्टी हाऊस' ला ते एकटेचं राहायचे. (त्यांचे कुटुंब औरंगाबादला होते.) त्यामुळे रात्री-अपरात्री त्यांच्या सोबत आमचे दिग्दर्शक मित्र जयशिल मिजगर, प्रमोद आव्हाड, Kumar Muthe  प्रफुल्ल कांबळे Nitin Mane  Sandeep Kale  Manohar Lote Dnyaneshwar Bagnar Kiran Sonwalkar Satish Harpade अशी मोठी मैफील रंगायची अगदी खुलके बात...खुल्लम खुल्ला इजहार..सर ही रोमँटिक होऊन गझला म्हणायचे. साहित्य, समाज, कला, मनोरंजन, चळवळ, अभ्यासक्रम, प्रेम, चित्रपट, गाणी अशी चौफेर चर्चा रंगायची. विद्यार्थी आणि शिक्षक  याच्या पलिकडचं नातं गव्हाडे सर आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालं होतं. कोणत्याही विद्यार्थ्यांविषयी सरांच्या मनात आपुलकी आणि जिव्हाळा जाणवायचा. विद्यापीठाच्या बाहेर अनेक कार्यक्रम, मोर्चा, आंदोलनात सरांसोबत मी आणि जयशिलनं प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. अगदी शनिवार-रविवारचे चित्रपट पाहाण्याचाही योग अनेकदा जुळून आला. 'कविता' करण्यात त्यांचा विशेष हातखंडा. त्यातूनचं 'आदिवासी विमर्श' हा कविता संग्रह आकारास आला. कितीतरी संगोष्टी आणि चर्चासत्रे मी आणि लाडके मित्रवर्य  प्रा.डॉ.अरूणकुमार सोनकांबळे, Ravindra Nirgude Patil  यांनी गव्हाडे सरांसोबत अनुभवलीत. त्यांची साहित्यिक मांडणी नेहमीचं भावली. पिशपाँन्ड, ट्रँडिशनल डेज, गँदरींग मध्ये तर सरांची फुल्ल टू धम्माल. 'चलाओं ना नैनोसे बान रे...' या गाण्यावर प्राँ.डाँ.महेश दवंगे आणि गव्हाडे सरांनी Devram Dagale  ला सोबत घेऊन केलेला डान्स अजूनही प्रत्येकाच्या मनात आहे. प्रो.डॉ.तुकाराम पाटील सर सेवानिवृत्त होताना गव्हाडे सर खूपचं भावूक झाल्याचेही आठवतंय. पुढे गव्हाडे सर पुणे विद्यापीठ सोडून औरंगाबादला 'घरवापसी' करीत असताना लिपीक शिवाजी कोकणे आणि Abhijeet Chobhe prakash Prakash M. Maghade  सुध्दा  भावूक झाले होते. एम.ए च्या निरोप कार्यक्रमसाठी लघुपट बनविताना गव्हाडे सरांचे बहुमोल मार्गदर्शन जयशिल नि मला मिळाले होते. त्यामुळेचं पुढे काही लघुपट करता आले. जयशिलने तर पुढे ग्रामीण प्रेमाचा कानोसा घेणारा ह्रदयस्पर्शी 'पाटील' नावाचा मराठी सिनेमा केला. असो तर....
गव्हाडे सरांच्यामुळे त्या वयात 'दुनियादारी' कळाली. ते नेहमी 'आजचा दिवस माझा' म्हणत सकारात्मकता शिकवित राहिले. त्यामुळे ते आम्हाला आमचे 'मितवा' वाटायचे. 'क्लासमेंट' आणि 'फ्रेंडस'ची जाणीव सरांनी आम्हाला करून दिली. त्या बळावरचं काहींनी 'प्यारवाली लव्हस्टोरी' साकार केली. 'पुणे मुंबई पुणे' हा प्रवासही त्यांच्या सोबत करता आला. त्याचं प्रश्नांशी 'धडाकेबाज' भिडणं मनाला नवी उमेद देऊन गेलं. अभ्यासाचा 'टायमपास' करू नका, नाही तर 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' करावा लागेल, याचीही जाणीव सरांमुळे झाली. आयुष्याचा 'नटरंग' होऊ द्यायचा नसेल तर 'आयत्या घरात घरोबा' होऊ नका, असा सल्लाही ते देत होते. 'अशी ही बनवाबनवी' टाळली तर माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठ्ठा होतो, यावर त्यांची विशेष श्रध्दा आहे. वाचण्या- लिहण्यातले संदर्भ जर जगण्यात आणता आले तर आयुष्य फारचं सुंदर वाटायला लागतं. असं त्यांनी खूपदा सांगितलंय. आम्हाला साहित्याकडे पाहाण्याची वेगळी नजर प्रो.डॉ. तुकाराम पाटील, प्रो.डॉ.भालेराव  Sadanand Bhosale Balasaheb Sonawane शशिकला राय, Prerana Ubale प्रा.डॉ.महेश दवंगे यांनी दिली पण काव्यातून साहित्याकडे बघण्याची कला गव्हाडे सरांमुळे मिळाली. त्यांच्या सहवासाने आमच्या जगण्यात  'सैराट'पणा आला. अगदी जगणंचं 'लय भारी' वाटू लागलं. सरांचा सहवास असाचं मिळत राहावा असं वाटत असतानाचं त्यांनी 'घरवापसी'चा अनाकलनीय निर्णय घेतला. आम्ही आदरापोटी त्यांची 'मन की बात' समजून घेतली. आणि जड मनाने त्यांना निरोप दिला. तरीही संपर्क कायम आहे. सुख-दु:खाच्या अनेक गोष्टी, आयुष्यातले खचखळगे त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येतात. त्यांच्याशी बोललं की मन हलकं होतं. आजही ते त्याचं आपुलकी आणि प्रेमातून सल्ले देतात. मार्गदर्शन करतात. विचारपूस करतात. मधल्या काळात 'कोरोना'शी दोन हात करण्याची लढाई ते निष्टेनं अगदी चिवटपणे लढले. लोकांचे प्रबोधन करीत राहिले. मदत करीत राहिले. तसेच 'माझं कुटुंब माझी जबाबदारी'ही सांभाळत राहिले. असा हा मुलखावेगळा माणूस.भूमिका घेणारा मास्तर. वास्तव मांडणारा कवी. जगतो तेचं बोलतो म्हणणारा वक्ता. आमच्या आयुष्यात आहे. याचा हेवा वाटतोय. तर या अवलिया माणसाचा आज वाढदिवस आहे. त्यांची सगळी स्वप्ने, इच्छा आणि आकांक्षा पूर्ण व्हाव्यात. त्यांच्यातला माणूस असाचं गोड, मनस्वी आणि निखळ राहावा. आणि हो, आमच्या डोईवरचा हात असाचं कायम राहावा याचं सदिच्छेसह आदरणीय प्रा.डॉ.भगवान गव्हाडे Ajay Gavhade  सरांना वाढदिवसाच्या बक्कळ, मोक्कार, जबराट आणि ट्रकभर शुभेच्छा....!!
#जुगजुगजिओ
#सालगिराहमुबारक
#हँप्पीवालाबड्डे

मंगलवार, 15 सितंबर 2020

रांगेत या रांगेत...

*रांगेत  या......रांगेत..!!* 
====================
                  अनिकेतला म्हणजेचं मोठया भावाच्या मुलाला घेऊन उस्मानाबादला ‘जिल्हा रूग्णालयात‘ गेलो होतो. साथीचे आजार वाढल्यामुळे रूग्णालयात येणा-यांची संख्या नेहमीपेक्षा जरा जास्तचं दिसत होती. आठवडी बाजार किंवा यात्रा, जत्रा भरल्यासारखी तोबा गर्दी! जिकडं बघावं तिकडं माणसचं. लहान मुले, तरूण, महिला व जेष्ठ नागरिक असे सगळेचं रूग्ण उपचारासाठी आले होते. डाॅक्टरांच्या समोर ही भली मोठी रांग. त्यातून पाठीमागच्यांना डाॅक्टर ही दिसत नव्हते. त्यात ही पुन्हा विभागणी महिलांची व पुरूषांची वेगळी तपासणी रूम. तीला वैदकिय भाषेत ‘ओ.पी.डी‘ म्हणतात. इतर अनेक तज्ञ विभाग. पण एखादयाचं तज्ञ विभागात ‘डाॅक्टर‘ हजर. कान,नाक,घसा तज्ञांच्या बाहेर आठ-दहा रूग्ण उभे. मात्र डाॅक्टर राऊंडला गेल्याचे ‘सरकारी उत्तर‘ तयार.....
          प्रत्येक ठिकाणी ‘रांगेत या'...असं माणसं ऐकमेकांना सांगत होती. रांगे शिवाय दुसरं कायचं दिसत नव्हतं. बहुतेक सगळया विभागात रांगचं...रांग...ती हि लांबलचक..!! शेवटी प्रत्येक रूग्णाला रांगे शिवाय पर्याय नव्हता. रांग नि लोक असचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र रांगेत जेष्ठ नागरिकांचे हाल व्हायचे. म्हणून अबालवृध्द माणसं समोरच्याला ‘इंथ माझा नंबर आहे.' असं सांगून मिळेल त्या बाकडावर गर्दी करत होते. लहान मुलं रांगेत थांबून वैतागली होती. रांगेमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
     शेवटी पुतण्याचा नंबर आला. डाॅक्टरांनी तापसलं. औषधे लिहून दिली. काय-काय पथ्य पाळा. हे एका मिनीटात सांगून मोकळं केलं. रांग मोठी असल्यानं डाॅक्टर ही रूग्णांचे ऐकून औषधे लिहून देत होते. हल्ली सरकारी डाॅक्टर फक्त लिहूनचं देत असतात. या ऐकलेल्या वाक्याचा मीच साक्षीदार ठरलो होतो. रांगेतून सुटलो या आवेशात मी औषधे मिळण्याच्या ‘काऊंटर‘वर आलो.....तर तिथे ही पुन्हा भली मोठी रांगचं! आता मात्र चक्रावलो. या रांगेतून सुटका नाही. अशी मनाची तयारी केली. नि रांगेच्या शेवटी जाऊन थांबलो. सोबत लहान पुतण्या ही रांगेतचं!
             औषधे मिळण्याच्या काऊंटर पासून रूग्णालयाच्या आवारा प्रर्यंत रांगने जागा घेतलेली. रांगेतली माणसं केव्हा मोकळा होतोय. याचाचं विचार करीत होती. औषधे घेण्यासाठी येणारा प्रत्येक रूग्ण ‘रांग‘ पाहून पुन्हा आजारी पडल्यासारखा चेहरा करत होते. रांग मात्र वाढतचं चालली होती. मी विचार करीत होतो कि, रांग मागूनचं  वाढतेय. पण पुढून कमी का होत नाहीय? तेव्हा लक्षात आलं. की रांगेतही ‘वशिलेबाजी‘ सुरू होती. येणारा माणूस ‘रांग‘ पाहून आपल्या ओळखीचा माणूस शोधायचा व त्याच्या जवळ औषधे घेण्याची चिठ्ठी देत होता. ओळखीचा माणूस ही अशावेळी धावून येत होता. नि चिठ्ठी घेऊन समोरच्याला दिलासा देत होता....
                येणारा रूग्ण रांगेत कुणी आपला ओळखीचा. कुणी नातेवाईक. कुणी मित्र. कुणी पाव्हणा. कुणी गाववाला. तर कुणी इतर माणूस शोधत होते. त्यामुळे रांगेच्या मध्य भागात असणा-या प्रत्येकाकडे किमान तीन-चार चिठ्ठया गोळा झाल्या होत्या. म्हणूनचं पुढची रांग सरकतचं नव्हती. आणि मागची लांबचं लांब होत होती. हा सगळा प्रकार मी जवळून बघितला. नि गर्दीतल्या काही माणसांना सांगितला. हे ऐकून एक वयोवृध्द आजोबा पुढे आले. त्यांनी मधूनचं वशिला लावणा-यांना मागे लावले. तिथे येणा-या प्रत्येकांना आजोबा सांगत होते. ‘रांगेत या...रांगेत...!! पण आजोबांची ‘नजर‘ चुकवून काही ‘महाभाग‘ रांगेत मध्येचं ‘वशिला‘ लावून घुसत होते. तर काही लोक ‘इमाने इतबारे‘ ओळख काढून चिठ्ठी हातात देत होते. हि ‘वशिलेबाजी‘ थांबल्या शिवाय आपला ‘नंबर‘ लागणार नाही. याची ‘जाणीव‘ झाल्याने मी हि पुढे झालो. आजोबांच्या संगतीनं सगळयांना सांगत होतो कि, ‘रांगेत या...रांगेत...!! 
पण समाज कुठेही ‘पळवाटा‘ शोधत असतो. अशीच पळवाट रूग्णालयाच्या रांगेतही लोकांना सापडली होती. त्यामुळे ‘रांगेत या...रांगेत‘ या आजोबांच्या विनंतीला कुणीही दाद देत नव्हतं. शेवटी औषधे देणा-या कर्मचा-यांकडे मी वळालो. तर तो औषधे देण्यात गुंग झाला होता. प्रत्येक रूग्णाची चिठ्ठी वाचून पेनाने राईट नि गोल करत होता. राईट केलेली औषधे दिल्याचे सांगत होता. सोबतचं ‘गोल‘ केलेली औषधे ‘बाहेरून‘ घ्या म्हणत होता. हल्ली सगळीचं औषधे रूग्णालयात उपलब्ध नसतात. पाच पैकी किमान तीन तरी बाहेरूनचं घ्यावी लागतात.  त्यांच्या समोर जाऊन खिडकीतूनचं नमस्कार केला. नि त्यांना सांगितलं की रांग फारचं वाढली आहे. रूग्णालयाच्या आवारात पोहचली आहे. पुढं वशिलेबाजी सुरू आहे. मागचा मागेचं राहतोय. तेव्हा माझी विनंती आहे कि, रांगेत येणा-यानांच औषधे द्या. माझ्या बोलण्यावर ते संतापले. आणि मलाच म्हणाले की, ‘वशिलेबाजी सुरू आहे. त्याला मी काय करू? तुम्ही मला का सांगताय? लोकांनाचं रांगेनं यायचं कळत नाही का? आता मी औषधे देऊ? का रांग लावीत बसू? तुम्हाला काय जातंय सांगायला? इंथ रोजचं असं होतंय......‘त्या‘ सरकारी कर्मचा-याचं ते ‘रोखठोक‘ उत्तर ऐकून ‘रांगेत या..रांगेत..‘ असं सांगणारे आजोबांही ‘निराश‘ झाले. शेवटी तो तरी काय करणार? कारण तो ‘सरकारी कर्मचारी‘ आहे. त्यानं तसचं उत्तर देणं अपेक्षित आहे. त्याशिवाय तो ‘सरकारी माणूस‘ तरी कसा वाटणार. बहुतेक सरकारी कर्मचा-यांकडे कमी-जास्त प्रमाणात असाच ‘रूबाब‘ बघायला मिळतो. अर्थात याला अपवाद नाहीत असं नाही. पण त्यांची संख्या कमी आहे. हे मात्र सत्य आहे. 
                 खरं तर औषधांच्या ‘त्या‘ रांगेची काळजी घ्यायला तिथं एक ‘सुरक्षारक्षक‘ असायला हवा होता. पण सगळे सुरक्षारक्षक नको ‘त्या‘ ठिकाणी दिसले. आवारात गाडया नीट लावा, हे सांगण्यासाठी किमान पाच सुरक्षारक्षक बसले होते. पण रांग नीट लावा हे सांगण्यासाठी कुणीही सुरक्षारक्षक उपलब्ध नव्हता. औषधाच्या या रांगेजवळचं एक छोटीसी काचेची केबीन होती. त्यावर ‘ठळक‘ अक्षरात लिहिलं होतं कि, ‘मे आय हेल्प यू‘ याचा अर्थ ‘सर्वसामान्यांना‘ कळावा म्हणून मराठीत ‘बोल्ड‘ करून लिहिलं होत....‘आपणांस मदत हवी आहे का?‘ मी आशेनं ‘त्या‘ केबीनकडे बघितलं तर...आत मध्ये कुणीचं नव्हतं. कुणाकडे मदत मागणार. परंतु ‘त्याचं‘ केबीन समोर काही माणसं कुणी तरी येईल याची वाट पाहत उभी राहिलेली दिसली. 
                 तसं बघायला गेलं तर रांगेच आणि सर्वसामान्य माणसाचं जुनचं नातं आहे. नि त्या नात्यानं किमान शतकाची तरी वाटचाल केली आहे. रांग नि माणूस या समीकरणानं अनेक क्षेत्र व्यापली आहेत. ‘रेशन‘च्या दुकानात रांग. ‘राॅकेेल‘च्या वाटपात रांग. ‘राजीव गांधी‘ योजनेच्या पगाराची रांग. ‘रमाई आवास‘ योजनेच्या लाभासाठी रांग. ‘कर्जमाफी‘चे अर्ज भरण्यासाठी रांग. ‘विमा‘ भरण्यासाठी रांग. ‘स्कूल चले हम‘ म्हणणा-या पोरांच्या खिचडीची रांग. ‘शिष्यवृत्ती‘च्या चेक वाटपाची रांग. ‘वसतीगृह‘ प्रवेशासाठी रांग. ‘इंग्लिश मिडियम‘च्या प्रवेशाला रांग. ‘विद्यापीठा‘त प्रवेशाची रांग. ‘हागणदारी मुक्ती‘च्या योजनेचा चेक घेण्यासाठी ग्रामपंचायत बाहेर रांग. ‘पेन्शन‘ धारकांची रांग. ‘जात प्रमाणपत्र‘ काढण्यासाठी तहसील बाहेर रांग. ‘मोफत शिक्षणा‘ची पाठयपुस्तके मिळवण्यासाठी शाळेत रांग. ‘शिक्षकांच्या बदल्या‘साठी नेट कॅफे बाहेर रांग. ‘मनेरगा‘चा पगार घेण्यासाठी रांग. मध्यतंरी ‘नोटाबंदी‘ नंतर तर ‘रांग‘ फारचं चर्चेत आली होती. एटीएम बाहेर रांग. बॅकेत रांग. रात्र-रात्र रांग. आणि या रांगेनं काही ‘बळी‘ही घेतले. तेव्हा एक राष्ट्रीय नेते असं म्हणाले होते कि, रेशनच्या रांगेत ही लोक मरतातचं की! आणि या रांगेनचं ‘देशभक्ति‘ची नवी व्याख्या जन्माला घातली. रांगेत निमूटपणे उभे राहणारे ‘खरे देशभक्त‘ आणि रांग आहे म्हणून संताप व्यक्त करणारे ‘देशद्रोही‘ असं म्हटलं जातं होतं. तर अशी ‘भयानक‘ आहे रांग. कारण ती कधी काय जन्माला घालेल हे सांगता येत नाही. रांगेतूनचं राग, संताप, चिडचिड, निराशा जन्माला येते. झालचं तर रांगचं ‘व्यवस्था विरोध‘ वाढवते. रांगचं माध्यमांना ‘ब्रेकिंग न्युज‘ देते. मागे पैठणच्या एका शेतक-यांचा मृत्यु ‘सोयाबीन‘ नोंदविण्याच्या रांगेत झाला. नि त्यातून आरोपांचं ‘राजकारण‘ सुरू झालं. पुन्हा बातम्या...पुन्हा ब्रेकिंग न्युज....पुन्हा स्पेशल रिपोर्ट...पुन्हा ग्राऊंड रिपोर्ट...पुन्हा तेचं ते...
 पण ‘सरकार कुणाचंही‘ किंवा ‘कोणतंही‘ असो रांगेचे प्रश्न तेचं. रांगेची अवस्था तशीचं. रांगेचा संताप तोच. अक्रोश तोच....म्हणूनचं रांगेतूनचं योजना पुढे येतात. रांगेतून राजकारण जन्माला येत. रांगेतून घोषणा येतात. 90 च्या दशकातही रांगेतूनचं ‘गरीबी हटाव‘ घोषणा पुढे आली. लोकांनी भरपूर ‘मतं‘ दिली. पुन्हा रांग तशीचं. 2014 पुन्हा ‘गरीबी हटाव‘ ला आधुनिक नावं मिळालं ‘अच्छे दिन‘ पुन्हा त्यानांही भरपूर ‘मतं‘ मिळाली. पुन्हा रांग तशीचं. रांग अशीचं आहे. तीचा अंदाज बांधता येत नाही. तीला संपविता येत नाही. किंवा म्हटलं तर तीचा वेध ही घेता येत नाही. सारं काही अनाकलनीय...
       ...तर मी सांगत होतो औषधांच्या रांगेचं. त्या आजोबांचा नि त्याच्याचं मागे माझा नंबर येईपर्यंत तब्बल 2 तास गेले होते. शेवटी मला नि आजोबांना औषधे मिळाली. आम्हा दोघांच्याही चिठ्ठीवर दोन-दोन औषधे मिळाली. बाकीचे तीन ‘गोल‘ करून ठेवली होती. ‘गोल‘ केलेली बाहेरून घ्या. असं सांगून ‘सरकारी‘ कर्मचारी मोकळा झाला. आम्ही औषधांचं ‘काऊंटर‘ सोडलं. माझ्याकडे दुचाकी गाडी होती. म्हणून आजोबांना म्हटलं कुठं सोडू? ते म्हणाले एस.टी. स्टॅन्डला सोडा. मी त्याना गाडीवर बसविलं आणि निघालो... आजोबा म्हणाले एस.टी.नं गावाकडं जाण परवडतं. अर्धे तिकीट हाय. घरी जातो नि पोराला चिठ्ठी देतो. राहिलेली औषधे एैतवारच्या बाजारला आला की पोरगा आणिलं. लै येळ झाला बघ. लोकं कशी वागतात बघ की....आजोबांना बस स्टॅन्डवर सोडून घरी आलो. केस कापण्यासाठी गावातल्या दुकानात गेलो. तर तिथेही रांग. केस कापणारा म्हणाला...'सहा नंबर आहेत पुढं'.... निमूटपणे 'होय' म्हणून बसलो. शेवटी रांग काय पिछा सोडायला तयार नाही. असं समजून म्हणातल्या मनात हसलो....    
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
                                        
©️ *धनंजय मोहन झोंबाडे.*
📝📝📝📝📝📝📝📝